Home महामुंबई पालिका मुख्यालयात डेंग्यूला आमंत्रण

पालिका मुख्यालयात डेंग्यूला आमंत्रण

0

मुंबई महापालिकेच्या वतीने मलेरियाबरोबरच डेंग्यू विरोधी मोहीम हाती घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले.
मुंबई- मुंबई महापालिकेच्या वतीने मलेरियाबरोबरच डेंग्यू विरोधी मोहीम हाती घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले. या आदेशानुसार मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावून संभाव्य डेंग्यूचा आजार पसरण्यापासून अटकाव केला जात आहे. मात्र, हे आदेश बजावणा-या महापालिका मुख्यालयाच्या आवारातच महापालिका आयुक्तांच्या दालनाखालील बाजूस असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर चक्क चहाचे प्लॅस्टिक ग्लास, प्लॅस्टिकचे बाउल्स यांसह प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा झाल्या आहेत.

त्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून पाणी साचून डासांच्या अळ्या तयार होत आल्या तरी याची कोणतीही दखल महापालिकेकडून घेतली जात नाही. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांसह येथील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतींच्या प्रांगणात महापौरांच्या टपाल कार्यालय आणि राजशिष्टाचार कार्यालयाशेजारी इमारतीच्या नूतनीकरणाचे कंत्राट दिलेल्या कंपनीच्या कामगारांसाठी पत्र्याची शेड बांधण्यात आली आहे. ही पत्र्याची शेड चक्क नूतनीकरण करण्यात आलेल्या स्थायी समिती अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या दालनाच्या खालील बाजूस आहे. त्यामुळे या पत्र्याच्या शेडवर अनेक प्लॅस्टिकचे ग्लास, प्लॅस्टिकच्या वाटया तसेच बाटल्या पडलेल्या आहेत. यामध्ये पावसाचे पाणी साचून राहिले आहे.

मात्र, मागील अनेक दिवसांपासून हे पाणी साचले असूनही त्यांची विल्हेवाट लावून तो भाग स्वच्छ केला जात नाही.  या साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूचा आजार पसरवणा-या एडिस-इजिप्ती या डासाच्या अळ्या तयार होण्याची शक्यता आहे. सात दिवसांपेक्षा अधिक दिवस हे पाणी साचून राहिल्यास त्यामुळे या अळ्या तयार होऊन डेंग्यूचा आजार पसरण्याची भीती असते. मागील काही वर्षापासून मुंबईत मलेरियाच्या आजाराने डोके वर काढले होते. परंतु हा आजार नियंत्रणात आणल्याचा दावा करत महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी डेंग्यूच्या आजारावर आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे डेंग्यूचा आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिका-यांसह सर्व विभागीय सहायक आयुक्त तसेच उपायुक्तांची बैठक घेऊन त्यामध्ये सूचना केली होती.

मात्र, मुख्यालयात पंधरा दिवसांपूर्वी ही बैठक घेण्यात आली होती. पण याच मुख्यालयात आयुक्तांच्या कार्यालयाखालीच अशी अडगळ तयार होऊन त्या ठिकाणी डेंग्यूचा प्रसार करणा-या डासांचे अड्डे तयार होत असतानाही कुंटे यांचे मात्र तिथे लक्ष नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version