Home महाराष्ट्र कोकण गुंडासोबत काम करायचं नाही!

गुंडासोबत काम करायचं नाही!

1

गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या हाताखाली काम करणे हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपमान आहे. त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर काम करणार नसल्याची भूमिका मांडत माजी आमदार रमेश कदम यांनी आगामी निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देणार, असे जाहीर वक्तव्य केले.

चिपळूण- पक्षापासून बाजूला जाण्याचे दु:ख आहे. शरद पवार, अजितदादा पवार यांच्याविषयी नितांत प्रेम आहे. मात्र, आज पक्षाने जी माणसे नेमली आहेत, ती पक्षाला पुढे नेतील, असे नाही. गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या हाताखाली काम करणे हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपमान आहे. त्यामुळे त्यांची जागा त्यांना दाखवायची आहे. त्यांची मस्ती जोपर्यंत उतरवत नाही, तोपर्यंत पक्षाची गरज नाही. गुहागरचे पार्सल तुरंबवमध्ये जोपर्यंत पाठवत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. त्यासाठी कार्यकर्ता हाच आपला पक्ष आहे. त्यांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे, असे सांगून माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांच्या नावाचा उल्लेख न करता हितचिंतकांच्या मेळाव्यात जाहीर आव्हान दिले.

चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी महिनाभरापूर्वी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी २१ ऑक्टोबर रोजी भूमिका स्पष्ट करणार, असे जाहीर केले होते. त्यानुसार शहरातील राधाताई लाड सभागृहात पाच हजारांहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा जाहीर मेळावा झाला. या वेळी कदम यांनी राष्ट्रवादीच्या राजीनाम्याबाबत आपला निर्णय ठाम असल्याचे स्पष्ट केले. गुंड प्रवृत्तीच्या प्रदेशाध्यक्षांबाबत पक्ष दखल घेत नाही, त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर काम करणार नसल्याची भूमिका मांडत कदम यांनी आगामी निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देणार, असे जाहीर वक्तव्य केले.

विशेष म्हणजे या मेळाव्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, ज्येष्ठ नेते बाबाजी जाधव, नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, जि. प. अध्यक्षा मनीषा जाधव, सभापती दीप्ती माटे, सुचीता वेल्हाळ, सुशील वेल्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

राजकारणात इतरांनी संपत्ती कमवली असेल. मात्र, कार्यकर्ता हीच आपली संपत्ती आहे. हे प्रेम कमवण्याचे आपल्याला भाग्य लाभले आहे. ४० वर्षे राष्ट्रवादीमध्ये काम केले. त्या वेळी शरद पवार दैवत आपल्या पाठीशी होते. त्या वेळी आपल्याविरोधात चौकशा लावल्या. दुर्गेवाडी येथे हल्ला झाला. सीबीआय, सीआयडी पथके घरापर्यंत आली. तरीही आपण बोललो नाही. मात्र, आता कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे आपल्यातील कार्यकर्ता जागा झाला आहे. पक्ष वाढवण्यासाठी यांना पक्षाने प्रवेश दिला. चांगली पदे दिली.. मंत्री केले.. पालकमंत्री केले.. मात्र, पालकमंत्री असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. तीन वर्षे निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्रास दिला. त्यामुळे राजीनामा स्वार्थासाठी नाही, कार्यकर्त्यांसाठी आहे. पक्षाचा पालकमंत्री पक्षाविरोधात बंडखोरी करतो, मुलाचे पॅनल उभे करतो. याबाबत पक्षश्रेष्ठींशी बोललो, मात्र, ते पॅनल मागे घेतले गेले नाही. तरीही अशा व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मानहानी होत आहे, अशा आरोपांच्या फैरीच रमेश कदम यांनी झाडल्या.

नगर परिषद निवडणुकीत विजयी होऊ म्हणून प्रचार केला. कारण शहरात विकत घेतलेल्या जमिनी विकून त्यांचा कोटय़वधी रुपये कमाविण्याचा डाव होता. त्यांनी पाच गुंड पाळले आहेत. ते वाळूच्या गाडय़ा अडवतात.. बांधकामे रोखतात.. आणि लाखो रुपयांची मागणी करतात. पालकमंत्र्याने असे वागावे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. येथील निष्ठावंत कार्यकर्त्यांची कामे मागे पडली. तीन वर्षात चिपळूण न.प. ला निधी मिळाला नाही. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसांबरोबर काम करणे शक्य नाही. एक वेळ बाजूला राहीन, असे कदम यांनी स्पष्ट केले.

1 COMMENT

  1. Good Artical Tas bghayla gelo tar 50% Gund hey Rajkarnat ahyeth hey Amadar Ramesh Kadam Shabana sangalya nako atha wele ali ahey thumhi swatha tyana hoducn kadha ani tancha tyana rastha dakhava, hey jar tharawic Mantri karu shakele tar desha cha uddhar hoile

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version