Home महामुंबई गोराईकरांचे नाक मुठीतच!

गोराईकरांचे नाक मुठीतच!

0

गोराई डम्पिंग ग्राउंड बंद करून येथील लोकांची कच-याची समस्या सोडवण्यात महापालिकेला अपयश आले असले तरी पुन्हा एकदा कच-याच्या समस्येने येथील नागरिक हैराण झाले आहेत. 

मुंबई- गोराई डम्पिंग ग्राउंड बंद करून येथील लोकांची कच-याची समस्या सोडवण्यात महापालिकेला अपयश आले असले तरी पुन्हा एकदा कच-याच्या समस्येने येथील नागरिक हैराण झाले आहेत. उघडय़ा आणि गळक्या डंपरमधून वाहून नेल्या जाणा-या कच-यामुळे या भागात दुर्गंधी पसरत आहे. कंत्राटदार बदलूनही ही परिस्थिती कायमच आहे. ज्या समस्येकरता नागरिकांनी मोर्चा काढून महापालिकेला जागे केले, तीच समस्या सुटण्याऐवजी अधिकच वाढू लागल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता नव्या कंत्राटदाराला दोन वर्षाचे कंत्राट असल्यामुळे आणखी दोन वष्रे नाक मुठीत धरून राहायचे का, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.

गोराई डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यामुळे मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर आदी भागांमधील कच-याची त्वरित विल्हेवाट लावून तो एका जागेवर जमा करण्यासाठी गोराई येथे हस्तांतरण केंद्र उभारण्यात आले. या ठिकाणी या भागातील कचरा रिकामा केला जातो. तिथे दिवसाचा सुमारे ५०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या ठिकाणाहून कॉम्पॅक्टरमधून बंदिस्त स्वरूपात तो कचरा मुलुंड, देवनार आणि कांजूरमार्ग येथे विल्हेवाटीसाठी वाहून नेला जातो. त्यामुळे या भागातील कचरा वाहून नेण्यासाठी महापालिकेने ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट सेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काम दिले. मात्र या कंपनीकडून डम्पिंग ग्राउंडवर बंदिस्त कॉम्पॅक्टरमधून कचरा वाहून नेण्याची अट असूनही उघडय़ा आणि गळक्या डंपरमधूनच कचरा वाहून नेला जात असल्याने या भागात दुर्गंधी पसरू लागली. त्यामुळे येथील नागरिकांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करून या विरोधात आवाज उठवला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात काढलेल्या या मोर्चानंतर प्रत्यक्षात ही समस्या कमी होण्याऐवजी ती वाढून दरुगधीमुळे लोकांना नकोसे झाले आहे.

पूर्वीच्या कंत्राटदाराची मुदत १४ ऑक्टोबरला संपल्यामुळे नव्याने निविदा मागवण्यात आल्या. यामध्ये कविराज-एम. बी. बी या संयुक्त कंपनीला काम मिळाले. मात्र जोपर्यंत स्थायी समितीची मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत त्यांची निवड दोन वर्षाकरता करून लेखी करार करता येत नसल्यामुळे आयुक्तांनी आपल्या अधिकारात या कंपनीला २९ दिवसांसाठी काम दिले. मात्र या कंपनीकडे कोणत्याही प्रकारचे कॉम्पॅक्टर नसून, ही कंपनीही उघडय़ा डंपरमधूनच कचरा वाहून नेत आहे. त्यामुळे रस्त्यावर घाणीचे कचरा आणि कच-यातील सांडपाणी सांडून परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचे स्थानिक काँग्रेसचे नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.

याच कंपनीला कुर्ल्यातही ठेका देण्यात आला आहे. तेथेही उघडय़ा डंपरमधूनच कचरा वाहून नेला जात आहे. त्यामुळे दुर्गंधीबाबत कच-याची समस्या वाढण्याऐवजी ती अधिकच उग्र बनत चालली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. पहिल्या कंत्राटदाराचे कंत्राट संपल्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये, कचरा साचून दुर्गंधी पसरू नये, यासाठी स्थायी समितीची मंजुरी मिळेपर्यंत आयुक्तांच्या अधिकारात २९ दिवसांकरता त्या कंपनीला काम दिल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त प्रकाश पाटील यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version