Home कोलाज चारशे वर्षे टिकलेला गुरू विल्यम शेक्सपियर

चारशे वर्षे टिकलेला गुरू विल्यम शेक्सपियर

0

शेक्सपियरने एकूण ३८ नाटके, ‘सॉनेट’ या प्रकारातील १६८ कविता आणि २ खंडकाव्ये लिहिली आहेत. त्याने जशा शोकांतिका लिहिल्या तशाच सुखांतिकाही लिहिल्या आहेत.

आता सुरू असलेले २०१६ हे वर्ष जगप्रसिद्ध नाटककार, कवी आणि अभिनेता असलेल्या विल्यम शेक्सपियरच्या पुण्यतिथीचे ४००वे वर्ष आहे. जगात जिथे जिथे इंग्रजी भाषा शिकविली जाते त्या सर्व ठिकाणच्या अभ्यासक्रमात काही तरी भाग शेक्सपियरच्या साहित्यातून नक्की घेतलेला असतो. आजही इंग्रजी लेखनात त्याने ४०० वर्षापूर्वी लिहिलेली व्याक्ये जशीच्या तशी वापरली जातात. जगातील इतर अनेक भाषातही ही वाक्ये सुभाषितांसारखी रूढ झालेली आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार शेक्सपियरला त्याच्या मातृभाषेशिवाय किमान ७ परदेशी भाषा अवगत होत्या. त्या भाषांतील अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर त्याने आपल्या नाटकात केला आहे. इतर कोणत्याही ज्ञात लेखकांपेक्षा त्याचे शब्दभांडार मोठे होते. समीक्षक जेम्स बटलरच्या अभ्यासानुसार इंग्रजीतील प्रसिद्ध कवी जॉन मिल्टनच्या संपूर्ण काव्यलेखनात वापरलेले शब्द (एक शब्द एकदाच मोजायचा असे ठरविल्यावर) १७,३७७ भरतात. त्याहीपेक्षा जुना महत्त्वाचा कवी असलेल्या होमरच्या शब्दांची संख्या ९,००० भरते. दांतेची शब्दकळा केवळ ५,८६० शब्दांवर थांबते. परंतु कविराज शेक्सपियरचे शब्दभांडार होते तब्बल (किमान) २४,००० शब्दांचे! अर्थात शब्दांची संख्या आणि शक्ती हे काही शेक्सपियरच्या शतकानुशतके टिकलेल्या कीर्तीचे एकमेव कारण नाही. त्याच्या साहित्याला जे ‘जवळजवळ अमरत्वच’ लाभले आहे ते त्याच्या लेखनातून दिसणा-या मानवी स्वभावाच्या त्याच्या जबरदस्त आकलनातून. आपल्याकडे जसे म्हणतात,

‘व्यासोछिष्टमजगत सर्व’ (सर्व जग व्यासांच्या लेखणीने एकदा वापरून टाकले आहे.) तसे शेक्सपियरबाबतही म्हणता येते. त्याने मानवी जीवनात घडणारे नाटय़ इतक्या चपखल शब्दात, त्याच्या सर्व गुंतागुंतीसह शब्दबद्ध करून ठेवले आहे की वाचणा-याने केवळ थक्क होऊन जावे. एका व्यक्तीचा आवाका एवढा वैविध्यपूर्ण कसा असू शकतो म्हणून काही शंकाखोर लोकांनी अशीही मांडणी केली आहे की त्याचे सगळे साहित्य काही त्याने एकटय़ाने लिहिलेले नसावे.

आजही आपल्याला या महान लेखकाच्या साहित्यातून केवळ मनोरंजनच नाही तर उत्तम शिक्षणही मिळू शकते. म्हणून त्याने निर्माण करून ठेवेलेल्या साहित्याच्या महासागरातून दोन ओंजळी भरून घेण्याचा हा प्रयत्न!

शेक्सपियरने एकूण ३८ नाटके, ‘सॉनेट’ या प्रकारातील १६८ कविता आणि २ खंडकाव्ये लिहिली आहेत. त्याने जशा शोकांतिका लिहिल्या तशाच सुखांतिकाही लिहिल्या आहेत. त्याच्या लेखणीच्या स्पर्शाने या दोन्ही प्रकारातून त्याने अक्षर साहित्य निर्माण करून ठेवले आहे. शेक्सपियरचे एक वाक्य नेहमी उद्धृत केले जाते. ‘नावात काय आहे?’ पण शेक्सपियर या नावाच्या जादूने गेली ४०० वर्षे इंग्रजी येणा-या शेकडो पिढय़ांवर कायमची मोहिनी टाकली आहे हे मात्र खरे. त्याच्या नाटकात राजेरजवाडय़ांपासून अगदी विदूषक, चोर, सैनिक, सरदार, सामान्य नागरिक, एवढेच काय चेटकिणी, खुनी, भुतेखेते इथपर्यंत सगळ्या प्रकारची पात्रे येऊन जातात. युगानुयुगे माणसाला गुंतवून ठेवणा-या प्रेम, मत्सर, महत्त्वाकांक्षा, मैत्री, लोभ, संताप, राजकारण, मानवी स्वभावातील कुटिलता, विश्वासघात, फसवणूक अशा विषयांवर अत्यंत मर्मभेदी भाष्य केल्याने त्याच्या साहित्याचे अपील कधीच संपत नाही. त्याचे वैशिष्टय़ हेच की त्याने आपल्या प्रत्येक पात्राच्या मनोभूमिकेचा आणि सहज घडू शकतील अशा मनोव्यापारांचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केलेला दिसतो.

एका ठिकाणी तो म्हणतो, ‘मूढ व्यक्तीला वाटते आपण हुशार आहोत; पण सुजाण माणूस ओळखून असतो की (नियतीच्या कुटिल खेळापुढे) आपण केवळ मूढच ठरणार आहोत.’ प्रेमाविषयी नेहमी बोलले जाणारे वाक्य खरे तर शेक्सपियरचे आहे. ‘प्रेमात बुडालेल्या व्यक्ती आंधळ्या होतात.’ असेच हिंदी सिनेमात नेहमी येणारे वाक्य ‘भित्रा माणूस मरणाआधीच अनेकदा मरत असतो, मात्र मरणाचा अनुभव शूरवीराला आयुष्यात एकदाच घ्यावा लागतो.’सुद्धा मुळात शेक्सपियरचेच आहे.

दुस-या एका ठिकाणी शेक्सपियरने फार मार्मिक निरीक्षण नोंदवले आहे. तो म्हणतो, ‘काही लोक पातके करून वर चढतात तर काहींचा चांगुलपणाही त्यांच्या पतनाचे कारण ठरतो.’ आज आपण जेव्हा समाजकारणात, राजकारणात सज्जन लोकांची झालेली होरपळ पाहतो तेव्हा या ४०० वर्षापूर्वीच्या वाक्याचे महत्त्व सहजच लक्षात येते. जवळजवळ प्रत्येक मानवी भावनेवर शेक्सपियरची विधाने अजरामर झालेली आहेत. आता केवळ प्रेम या मानवी भावनेबद्दल त्याने लिहिलेली विधाने पाहा, तो एके ठिकाणी म्हणतो, ‘जे संधी मिळताच बदलते ते प्रेम नाहीच.’ दुस-या ठिकाणी तो म्हणतो, ‘उदासपणे टाकलेल्या उसास्यांच्या धगीतून निर्माण होणारा धूर म्हणजे प्रेम.’ अव्यक्त राहून गेलेल्या प्रेमाचे यापेक्षा सुंदर वर्णन काय असू शकेल? ‘प्रेम कधीच डोळ्यांनी पाहात नसते, त्याचे डोळे हृदयात असतात.’ असे जेव्हा शेक्सपियर लिहितो तेव्हा प्रेमासाठी आयुष्य बरबाद करून घेतलेल्या अनेक हृदयांवर एक हळवी फुंकर घातली जातेच ना? तो जेव्हा म्हणतो, ‘जे प्रेम व्यक्त करीत नाहीत ते प्रेम करीतच नसतात.’ असे एवढय़ा मोठय़ा साहित्यिकाचे विधान प्रेम व्यक्त करायला लाजणा-या कितीतरी लाजाळू लोकांना बळ देऊन गेले असेल. ‘प्रेम म्हणजे नुसते बेधुंद वेडेपण!’ असे जेव्हा तो म्हणतो तेव्हा ‘तुमच्यासाठी काही पण’ म्हणणा-या बेफाट प्रेमवीरांना केवढे कृतार्थ वाटत असेल? ते त्यांनाच कळू शकते.

शेक्सपियरने असेच काही उपदेश समंजसपणाबद्दलही देऊन ठेवले आहेत. त्याने जीवनात येणा-या प्रलोभनांबद्दल म्हटले आहे, ‘प्रलोभने समोर येणे वेगळे आणि तुम्ही त्याला बळी पडणे वेगळे.’ ‘आपल्या शत्रूला धडा शिकविण्यासाठी भट्टी कधीही एवढी तापवू नका की त्यात तुम्हीच जळून खाक व्हाल.’ आपल्याकडे वापरल्या जाणा-या ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ या म्हणीला समांतर असे त्याचे विधान पाहा. मोठय़ा पदावरील लोकांचे दु:ख अगदी नेमक्या शब्दात मांडताना तो म्हणतो, ज्या शिरावर राजमुकुट असतो ते नेहमीच अस्वस्थ असते.

मनाच्या स्वभावाबद्दलचे शेक्सपियरने चारशे वर्षापूर्वी केलेले हे विधान आज हृदयरोगतज्ज्ञांना सुद्धा आपल्या रुग्णांना सल्ला देताना उपयोगी पडते. दु:ख मनात ठेवू नका. ते व्यक्त करीत जा. जे दु:ख व्यक्त होत नाही ते थकून गेलेल्या हृदयात टोकाचा गुंता निर्माण करून त्याला एखाद्या दिवशी उद्ध्वस्त व्हायला भाग पाडते. दुस-या एका ठिकाणी तो म्हणतो, ‘अश्रूंना वाट मोकळी करून देणे, रडणे, म्हणजे दु:ख हलके करण्याचा सोपा मार्ग आहे. ‘एका ठिकाणी माणसाच्या मनात स्वत:च्या सामर्थ्यांविषयी येणा-या शंकेबद्दल सावध करताना शेक्सपियर किती अलंकारिक भाषेत म्हणतो, पाहा- ‘संशय म्हणजे फितूर झालेला मित्र होय. तो आपल्या सामर्थ्यांबद्दल आपल्याच मनात शंका निर्माण करून जीवनातील अनेक संधीपासून आपल्याला वंचित करीत असतो.’ अज्ञानाबद्दल तो म्हणतो, ‘अज्ञान हाच खरा अंधार, दुसरा अंधार नसतोच.’ ‘अज्ञान म्हणजे ईश्वरी शापच होय. ज्ञान हेच ते पंख आहेत जे आपल्याला स्वर्गापर्यंत सुखरूप घेऊन जातात.’

पैशाबद्दलही त्याने मिश्कील भाष्य केले आहे. तो म्हणतो, ‘कर्जदार किंवा सावकार, दोन्हीही होऊ नका. कारण कजार्मुळे आपण दोन गोष्टी गमावतो. मित्रही आणि वित्तही!’ ‘केवळ ५२ वर्षाच्या आयुष्यात शेक्सपियरने मानवी अनुभवातील प्रचंड अवकाश कवेत घेणारी तब्बल ३८ नाटके लिहिली होती. त्यात त्याने व्यावहारिक शहाणपण, राजदरबारातील चतुराई, प्रेमातील धुंदी, वार्धक्यातील कारुण्य, एकंदर ऐहिक जीवनाची व्यर्थता आणि जगण्याचा खरा आशय अशा अनेक विषयांना समर्थपणे हाताळले आहे. त्याच्या प्रत्येक साहित्यकृतीतून शिकण्यासारखे खूप आहे. या महान नाटककाराच्या आणखी काही शाश्वत विधानांचा आढावा पुढील आठवडय़ात घेऊ या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version