Home कोलाज ‘‘स्वातंत्र्यवीरायण’’ एक असामान्य प्रवास

‘‘स्वातंत्र्यवीरायण’’ एक असामान्य प्रवास

1

स्वातंत्र्यसैनिकांचे अग्रणी, हिंदू राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञ व हिंदू संघटक, समाजसुधारक, महाकवी आणि विज्ञाननिष्ठा यासंदर्भात आपले प्रखर विचार मांडणारे वि. दा. सावरकर यांची काल १३३वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषात साजरा करण्यात आली. ब्रिटिश सरकारच्या काळात स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता अखंड लढा देणा-या वीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग व योगदान इतक्या वर्षानंतरही प्रत्येक भारतीयांच्या आजही आठवणीत आहे याचा पुनर्प्रत्यय नुकताच आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘‘स्वातंत्र्यवीरायण’’: एक असामान्य प्रवास या नाटय़कृतीच्या आधारे वीरपुत्र सावरकर यांचा जन्म..चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’, अशी घेतलेली शपथ.. ते डबक्या स्वरात आता मी थकतोय असं म्हणत पुढील लढाई तरुणांकडे सोपावून मृत्यूला मिठी मारणा-या सावरकरांचा संपूर्ण जीवनपट चित्तथरारक प्रसंगांनी भरलेला होता. ही नाटय़कृती नसून जिवंत कथाच, कारण आज जरी सावरकर आपल्यासोबत नसले तरी त्यांचे विचार, तत्त्वज्ञान व वाईट प्रवृत्तीविरोधात लढण्याची वृत्ती आजही आपल्यासोबतच आहे, हे दिसून आले.

महाराष्ट्रात नाशिकजवळच्या भगूर गावी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी झाला. तीव्र बुद्धिमत्ता, आक्रमी व साहसी वृत्ती असलेले सावरकर वयाच्या १०व्या वर्षापासून इतिहास व धर्मशास्त्रावरील जाडजूड पुस्तके वाचू लागले. विनायकाने केलेल्या कविता तत्कालीन अग्रणी मराठी वृत्तपत्रांत छापून येत असत. मात्र कवीच्या वयावर वाचकांचा विश्वासच बसत नसे. सावरकरांच्या घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. गुलामी, ब्रिटिश राजवट यांचा थोडाही उपद्रव सावकरांपर्यंत पोहोचला नव्हता. पण.. इतिहासाची पाने वाचत असताना सावरकरांच्या मनात राष्ट्रवादाने आकार घेतला. उन्मत्त ब्रिटिश सत्तेशी झगडणा-या क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त सावरकरांना अस्वस्थ करू लागले. त्याच काळात रँडचा वध करून फासावर चढलेल्या चाफेकर बंधूंच्या बलिदानाने सावरकरांवर फार मोठा आघात झाला. त्याच रात्री देशभक्तीने तळमळलेल्या त्या अवघ्या १६ वर्षाच्या तरुणाने आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूस मारिता-मारिता मरेतो झुंजेन.. जर यशस्वी झालो, तर माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्याचा अभिषेक घालेन आणि हरलो तर माझ्या रक्ताचा अभिषेक तिच्या चरणांवर करेन. सावकरांची ही शपथ त्यांच्या कुटुंबीयांना अवस्थ करून सोडणारी होती. कारण यानंतर त्यांनी स्वातंत्र्याचा वसाच हाती घेतला होता. ‘लढेन व जिंकेन..’ अशी धारणाच जणू काही त्यांची झाली होती.

स्वतंत्र्यलढय़ातील एक पाऊल पुढे म्हणजे त्यांनी अभिवन भारत व मित्रमेळा या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. पुण्यात परदेशी कपडय़ांची होळी करून स्वदेशीचा स्वीकार करा, असा संदेश लोकांना दिला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी सावरकर १९०६ साली जून महिन्यात लंडनला गेले. त्याठिकाणी असलेल्या इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावकरांचा स्वातंत्र्यलढय़ातील पहिला साथीदार होता. मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिका-याची हत्या केली व हसतमुख फाशीवर चढला. त्याचवेळी त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकून घेतले. ते बॉम्बचे तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा खून अनंत कान्हेरे या तरुणाने केला. या हत्येप्रकरणी ब्रिटिश सरकारने अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या तीन सदस्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सावरकर नागरिकांना भडकवत असल्याचा आरोप करत त्यांना ब्रिटिश सरकार अटक करतात व नाटकाचा पडदा पडतो.

पडदा उघडल्यावर समोर दिसते ते सावरकर तुरुंगातील वेशभूषेत असतात. त्यांना ५० वर्ष अंदमानाच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात येते. शिक्षा सुनावण्यात आल्याने सावरकरांचे कुटुंब अक्षरश: हादरून गेलेले असते. कुटुंबीयांना सावकरांना भेटण्याचीही परवानगी नसते. स्वातंत्र्याचा लढा, कुटुंबाचा विरह व काळ्या पाण्याची शिक्षा अशा स्थितीत सावरकर दिवस काढत होते. तुरुंगातील एक ब्रिटिश जेलर सावरकरांना खूप त्रासही देत असे. पण ते ब्रिटिशच्या जाचाला न जुमानता त्यांना जशास तसे उत्तरही देत असे. उदाहरण द्यायचं झालं तर..एका प्रसंगात सावरकरांना ५० वर्षाची शिक्षा झाल्याने ब्रिटिश जेलर त्यांची खिल्ली उडवत असतो. पण सावरकर त्यांच्या खिल्लीला मनावर न घेता उत्तर देतात की, मला ५० वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली खरी, पण ५० वर्ष तुमचं सरकार तर टिकायला हवं.. सावरकरांच्या या सडेतोड उत्तराने जेलर काहीच न बोलता तेथून निघून जातो. पण या तुरुंगात ब्रिटिशांनी सावरकरांना खूप छळले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्यास सांगितले. इतके कष्ट करून जेवणातच आळ्या पडलेल्या असायच्या, तेच जेवण त्यांना खावे लागत असे. पण या मरणयातना सहन करतानाही त्यांच्या मनात फक्त एकच ध्येय होते, मातृभूमीला स्वातंत्र करण्याचे. तब्बल ११ वर्षाच्या या कालावधीत सावरकरांनी अनेक कविता व कादंब-या लिहिल्या. बाभळीच्या काटय़ांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली. माझी जन्मठेप व अंथाग हे दोन आत्मचरित्रं प्रचंड गाजली. ब्रिटिशांनी त्यांच्या पुस्तकांवरही बंदी घातली होती. त्यानंतर ब-याच वर्षानी सावरकरांची अंदमानातून सुटका झाली. ते पुन्हा घरी परतले.

ब-याच वर्षानंतर सावरकर व त्यांची पत्नी माई यांना विश्वास नावाचा मुलगा होतो. संसार अगदी चांगला चाललेला असतो. पूर्वी मंदिरात स्त्रियांना नसलेला प्रवेशही त्यांनी मिळवून दिला. पण त्यानंतर सावरकरांवर विविध आरोप झाले. मात्र, ते कधीच खचले नाहीत. कारण माई व मुलगा विश्वास हा त्यांच्या सदैव सोबतच होता. या संकटातून ते कालांतराने बाहेर पडले. त्यानंतर वय वाढत गेल्याने आजारपणात माईंचे निधन झाले. माईंच्या मृत्यूनंतर सावरकरही खचून गेले होते. त्यानंतर त्यांनी शेवटचा लेख ‘आत्महत्या की आत्मार्पण’ लिहिला व म्हटले की, देश स्वतंत्र होण्याचे स्वप्न साकार झाल्याने मी धन्य झालो आहे. सर्वाचे खूप प्रेम मिळाले. आता मी खूप थकलो आहे. पुढील लढाई तरुणांची असून त्यांनी ती लढाईची आहे. एकच सांगू इच्छितो की, लेखणी हाती आली म्हणून हक्क मिळवण्यासाठी बंदूक हाती घ्यायची वेळ आल्यावर हात कापू देऊ नका. अशाप्रकारे दोन्ही हात जोडून क्षीण आवाजात ते म्हणाले, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा.. हेच त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शेवटचे शब्द होते. नाटकाचा पडदा पडतो व सावरकर नसल्याचा भास पुन्हा एकदा प्रेक्षकांना होतो.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version