Home महाराष्ट्र कोकण मेवा चि.सौ.का. रुई… झाडाबरोबर लावले जाते लग्न !

चि.सौ.का. रुई… झाडाबरोबर लावले जाते लग्न !

0

असे म्हणतात,विवाह ही आयुष्यातील एक मोठी घटना असते. जीवनाला  कलाटणी देणारी..परिवाराच्या संस्कृतीला बळ देणारी! या विवाह संस्कृतीत अडलेल्या, नडलेल्यांना नव्हे तर  मृत्यूनंतरही कोणाचीही वधू म्हणून पुढाकार घेण्यास ती तयार असते.

असे म्हणतात,विवाह ही आयुष्यातील एक मोठी घटना असते. जीवनाला  कलाटणी देणारी..परिवाराच्या संस्कृतीला बळ देणारी! या विवाह संस्कृतीत अडलेल्या, नडलेल्यांना नव्हे तर  मृत्यूनंतरही कोणाचीही वधू म्हणून पुढाकार घेण्यास ती तयार असते. असे सांगितल्यास आजची पिढी हसेल; पण हे खरे आहे..आयुर्वेदात जिची ख्याती आहे ती सूर्यकन्या म्हणजेच चि.सौ.का. रुई! हिचा विवाह संस्कृतीत मोठा सन्मान केला जातो तो याचसाठी.

कोकणचे झाडापेडांचे नाते अनन्यसाधारण आहे. त्यामुळे रुईशी विवाह करण्याची परंपरा आश्चर्यकारक नाही. अजस्त्र वृक्ष होऊन सावली देण्याचे तिचे भाग्य नसले तरी खुरटया झाडी-झुडपात वावरताना जगण्याची नवी दृष्टी देत मोक्ष मिळवून देणा-या रुईचा सन्मान  करावा तेवढा थोडाच आहे. आमच्या मुलखात कुणाला विवाह चुकत नाही. अथवा चुकविता येत नाही.

तुमची इच्छा असो वा नसो. जिवंतपणी विवाह झाला नाही तर मृत्यूनंतर तरी विवाह लावून दिला जातो. आधुनिक युगातही ग्रामीण भागात आग्रहपूर्वक ही प्रथा जपणारे कमी नाहीत. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी रुईशी लग्न लावत विवाहाच्या विधी पूर्ण केल्या जातात.या परंपरेमागे संस्कृतीचे दाखले दिले जातात.विवाह केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही, अशी भावना ग्रामस्थांची असते.

लग्नाआधी एखादा तरुण मृत्यू पावला तर त्याचे दहन करण्याआधी त्याचे लग्न रुईच्या झाडाशी लावण्याची प्रथा आहे.. लग्नाची त्याची इच्छा अपुरी राहू नये आणि त्याला मोक्षापर्यंत नेण्यासाठी ब्रह्मचारीही सुटत नाहीत. आयुष्यभर जपलेले जीवन मृत्यूनंतर अंत्यसंस्कारापूर्वी त्याला रुईशी जमवून घ्यावेच लागते. ही प्रथा सर्वत्र आहेच.

त्यादिवशी एका तरुणाचे जिवंतपणीच रुईशी लग्न लावण्यात आले. तो मतिमंद आणि गतिमंदही होता. त्याच्याशी विवाह कोण करणार आणि एखाद्या मुलीचे आयुष्य अशा मुलाशी लग्न करून संकटात का घालावे? असा त्याच्या घरच्यांचा युक्तिवाद होता. यासाठी लग्नाचा थाट मोठा करण्यात आला. सर्व विधी झाले. ब्राह्मणांना विडा-दक्षिणा देण्यात आली.  सामान्य विवाहाप्रमाणे या रुईबरोबरच्या विवाहातही पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, मधुपर्क, नंतर कन्यादान वगैरे सर्व विधी केले गेले होते. हे असे का करावे? याबाबत ज्येष्ठ मंडळी संस्कृतीकडे बोट दाखवतात. असाच प्रसंग त्यादिवशी आमचा मित्र सांगत होता.

घरच्यांनी लग्नाला विरोध केला म्हणून त्यांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मुलगा-मुलगी दोन्हीही समज असणारी, सुशिक्षित. त्यांनी मृत्यूला कवटाळले. जेव्हा गावात हे समजले तेव्हा सारेच हळहळले. स्वत:च्या हिमतीवर लग्न करून नवीन जीवनाला संघर्षाने सुरुवात करण्याऐवजी कमजोर मनाने त्यांनी आत्महत्या करण्याचा पर्याय शोधला.

मुलगा गेल्यानंतर त्याचा विवाह रुईशी लावून सामाजिक प्रथा जपण्याचा प्रयत्न झाला. शोकाकुल स्थितीतही रुईशी लग्न लावण्यात आले. इथेच माणसाची प्रतिष्ठा आड येते आणि घडू नये ते घडते. पालकांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. असो, रुईची ही परंपरा नको नकोशी वाटणारी असली तरी कर्तव्य म्हणून ,दायित्व म्हणून जाणीवपूर्वक या प्रथा जपणारा मालवणी मुलूख याचसाठी तर वेगळा ठरतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version