Home महाराष्ट्र कोकण मेवा लगीन केल्यासारखा वाटता..

लगीन केल्यासारखा वाटता..

1

‘काय रे नामदेवा’! सूर्य मध्यावर इलो तरी बाकडो काय सोडनस नाय. राती जागरण झालेला दिसता! जागरण कसला झिलग्या निस्तो अंगात आगीचो डोंब उसाळलेलो. रात नाय अपरात नाय.

‘काय रे नामदेवा’! सूर्य मध्यावर इलो तरी बाकडो काय सोडनस नाय. राती जागरण झालेला दिसता! जागरण कसला झिलग्या निस्तो अंगात आगीचो डोंब उसाळलेलो. रात नाय अपरात नाय. ह्या लायटीवाल्यांनी जीव निस्तो नकोसो करून टाकल्यांनी. मनाक येता तेव्हा भारनियमन करतत. आता काल रातीच बघीतलस मा! एक वाजता लायट काढून टाकल्यानी. सध्या दिवस कसले?

अंगाची निस्ती ल्हाई ल्हाई होता. असलो उन्हाळो बुवा आतापर्यंत कधी अनुभवलो नाय. जीव आता जाता काय मग जाता, अशी अवस्था झाली आसा. तळयात बुडान ऱ्हवानसारख्या वाटता. लायट तुमका काढूची तर काढा. पण वेळ काळ बघून तरी काढा. अधिकाराचो असो गैरवापर करू नको म्हणाचा. झिलग्या तुका सांगतंय माणसांच्या सहनशिलतेक सुद्धा मर्यादा असता. मऊ थयसर खोऊ! ह्या बरा न्हय!

‘नामदेवा’ झाला तुझा बोलान! मग मी काय सांगतय ता माझा ऐक. काल रात्री लायट गेली तेका लायटवाले जबाबदार नाय. मारुती गाडी रस्तो सोडून गटारावर चढली आणि घराच्या कठडयात आणि लायटीच्या पोलात अडाकली. पोल वाकलो आणि लायट गेली. ता कायव आसाना. लायट गेली ह्या खरा मा! सगळयांका रातभर जागरण झाला. ह्या तर खरा. आपणाक रात्रीची गाडी चालवाक येना नाय तर चालव नये. कोणाचे म्हशी आणि कोणाक उठाबशी! म्हणतत तसली गजाल! पान खातलस तर बस. कसा.

झिलग्या मेल्या गजालीन घोव खाल्लो! तुझ्या ड्रेसाकडे माझो लक्षच नाय. काय रे! एकदम चिकनो दिसतस. यंदाची निवडणूक लाभाची आणि सुखसमृद्धीची गेलेली दिसता. आमकाच कोण भेटलो नाय. नामदेवा तुका वाटता तसा काय नाय. सध्या दिवस कसले सांग.

‘झिलग्या मेल्या त्या पल्लवी जोशीसारखे कसले तरी प्रश्न विचारू नको’ हयसर ‘सारेगमप’ कार्यक्रम नाय. नायतर पैठणीचो कार्यक्रम नाय. आदेश भावोजींचे गजाली ऐकाक ता कायता सहा वाजल्यापासून झी मराठी सुरू झाला की माझी बायल तहान-भूक आणि जेवणाखाण्याचा विसरान टी. व्ही.समोर फतकल मारून बसता ती अकरा वाजता उठता. तेव्हा मात्र मेले लायटवाले भारनियमन करूक इसारतत कसे ताच माका समाजना नाय!

नामदेवा! तुझ्या घरात चलता ताच माझ्या घरात. ताच शेजा-यांच्या घरात. त्या पैठणीन आणि सारेगमपवाल्यांनी निस्ता बघणा-यांका खुळवल्यानी आसा. घरोघरी त्याच परी! बरा माका एॅक सांग, तू माझ्या वांगडा येतस का नाय?

झिलग्या म्हणजे हयसर काय बेबंदशाही आसा! जो येता तो आमच्यावर घुरामता. धनुष्यबाण काढता. नायतर हात उगारतत. येतस का नाय म्हणजे? खय जावचा? कित्याक जावचा? काय सांगण्याची पद्धत आसा का नाय? नामदेवा! सध्या दिवस कसले आसत? सांगतय झिलग्या आंब्या-फणसाचे, मासळी-मटणाचे, उकाडया बिकाडयाचे.. आणि लग्नसराईचे. ह्या दोन महिन्यात पावसासारखी लग्ना झाली आणि पावस पडासर होयतच ऱ्हवतली, होवंदेत बापडाची. पळवा पळवी करण्यापेक्षा रितसर लगीन करून सुखा समाधानान संसार करा. पण झिलग्या तुका खरा सांगा आमच्या वेळच्या लग्नाची खरी मजा आता नाय.

लाखो रुपये खर्च करून मोठया दिमाखात लग्ना करतत. पण आमच्या वेळची ती मजा आताच्या समारंभाक नाय. सगळो भपको असता, बडेजाव असता. पण सगळा कसा कृत्रिम, ओढून-ताणून आणल्यासारखा वाटता. तेच्यात आंतरिक जिव्हाळो, प्रेम, आपलेपणा जाणवना नाय. अलीकडचे हे लग्न समारंभ एकमेकांवर कु रघोडी केल्या सारखे कृत्रिम वाटतत. आमच्या वेळाक कसा, लगीन ठरला काय सगळो वाडो कामाक लागा. सगळे कसे न बोलवता आपआपली कामा वाटून घेयत. नामदेवा, तुका आठवता होकलेक कसली कसली परीक्षा देवची लागा.

लगीन ठरवचा आणि ठरल्यानंतर ता पार पाडना साधी सुधी गोष्ट नव्हती. माझ्या येळाक माझ्या चुलतेन ठरलेला लगीन मोडल्यान कित्याक! म्हायती आसा. तिका गडबडीत पायाक हात लावन नमस्कार नाय करूक म्हणान! सगळी बोलणी झाली. लग्नाची तारीख मानपान ठरले. तवसर चुलती गप होती  आणि पोरगी बघुक गेलव, पसंत पडली. सगळयांच्या पाया पडली. पण आपल्या पाया पडली नाय म्हणान ऐनवेळाक मानापमानाचा नाटक केल्यान. खरा आसा तुझा नामदेवा, आता ते दिवस गेले. एकामेकांचा तोंड सुद्धा तेनी बघीतल्यानी नाय. ती इन्टरनेटवर लग्ना जमवन मोकळी होतत.

आता आवशी बापाशीची नजर चुकवन परस्पर लग्ना करून मोकळी होतत. तो मोबाईल राक्षस इलो आणि तरुण पिढी चेकाळल्यासारखी झालीहा! आमच्या वेळाक लग्न जमवण्यात एक आनंद होतो. वधू परीक्षा म्हणजे दिव्य होता. घरातल्या मोठया माणसांनी ठरवल्यानंतर पोरगी बघूक जायचा.

आपल्या तोला मोलाचा घराणा आसा की नाय ता बघायचा, सगळयांच्या पुढयातसून चालत जावन तिका तुळशीच्या पाया पडाक लावायचा, कित्याक तर ती लुळी पांगळी आसा काय बघायचा, चालताना धूळ उठवित चालता काय बघायचा, आधी उजवो पाय पुढे टाकता काय डावो पाय टाकता ता बघायचा, तेच्या वरसून सपाट पायाची आसा काय पोकळ पायाची आसा हेच्यावर शकून अपशकून ठरवायचे. तेव्हा दागिन्यांका महत्त्व नसायचा.

मुलीच्या चारित्र्याक महत्त्व असायचा. ‘जाता जाता हसला आणि हातात हात घालून फसला आणि आयुष्यभर घरात रडत बसला’ असो प्रकार नव्हतो.
मुलगी बघना म्हणजे रूप बघना नव्हता. ती सुलक्षणी, मर्यादशील आसा की नाय ता बघीतला जायचा. जेवढया कुटुंबवत्सल घराण्यातली मुलगो नायतर मुलगी असात ती पसंत केली जायची. तेव्हा एकच कुटुंबपद्धती होती. आताचे पोरी सांगतात.

घोवाक भाव भैन असता कामा नये. माका स्वतंत्र ब्लॉक होयो. सासू-सास-यांचो अडसर असता नये. मी आणि माझो घो. झिलग्या, आता माटवातली लग्ना इतिहास जमा झाली. परडा साफ करायचा. घराची डागडुजी, रंगकाम, खळा करायचा माटव घालयचो. दळण, कांडण, मसालो, जिन्नस निवडणा असली सगळी कामा शेजा-यापाजा-यांची बायल माणसा करीत. करंजे, लाडू फराळाचा सगळा घरात होय. होकलेकडे आणि नव-याकडे ख-या अर्थान लगीन घाई असायची.

आठ दिवस अगोदर आणि आठ दिवस नंतर जेवणावळी उठायचे. आणि पाचपरतावन झाला काय घरातली यजमाणीन सूप वाजवायची. काय पावणे आपआपल्या घराकडे परताक लागायचे. आता, ‘गंगाजमुना डोळयात उभ्या का? जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ या गाण्याची कॅसेट लागली काय माटव (हॉल) रिकामो झालो.

नामदेवा! माटवातल्या पंगतीतल्या जेवणाची मजा काय वेगळीच असायची. धावपळ करून वऱ्हाडी मंडळी दमलेली असायची. सगळीकडे वाटाण्याच्या सांब-याचो, फणसाच्या भाजीयेचो, लोणच्या, पापडाचो वास पसरलेलो असायचो. पोटात कावळे कावकाव करीत असतानाच पत्रावळी मांडले जायचे. सोजी, लाडू पत्रावळीत वाढले जायचे आणि डिगलोभर भात वाढलो जायचो. वाफाळणा-या भाताचा अळा करून झणझणीत वाटाण्याचा सांबारा त्या भाताच्या अळयात ओतायचा की हाता तोंडाची लढाई सुरू झाली.

गेले ते दिवस तुका आठवता नामदेवा. ही अशी लांबच्या लांब मांडवात पंगत बसलीहा. यजमानान पाणी सोडल्यान आणि कोणतरी आराडता हरहर महादेव! आणि सुरू होता ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे..’ हो श्लोक संपता न् संपता सुरू होता ‘हरीच्या घरी शेवया तुप पोळी। हरी वाढीतो ब्राह्मण वेळोवेळी, असे ब्राह्मण जेवोनी तृप्त झाले. विडा दक्षिणा देवोनि बोलविले। पुंडलिक वरदा हारी विठ्ठल’ मनाच्या श्लोकाबरोबरच जेवणाचे आग्रह.  त्या आग्रहामागे आपुलकी, माया, आपलेपणा, जिव्हाळो असायचो, तो आताच्या लग्न समारंभात अभावान जाणवता.

पंगतीतलो आनंद, आग्रह आणि हातात जेवणाचा ताट धरून ‘भिक्षा वाढ माई’ अशा अविर्भावात लायनीत उभ्या ऱ्हवना माका नाय आवाडना. झिलग्या शुभमंगल सावधान म्हणल्यान काय मगे जी मंगलाष्टका म्हणाक चढाओढ लागा तेका तोड नाय. आवशीच्यान सांगतय झिलग्या, आता ते जेवणावळी नाय आणि पाच परतावना नाय. गावठी कोंबडयाचा मटण गेला आणि हाडाचा ब्रॉयलर इला.

लगीन झाला दुस-या दिवास हनीमुनाक गेली. आमच्या येळाक हनीमुनाचो केदो कार्यक्रम. ताच ता हनीमून म्हणजे, ‘फळये सोबान’ रात्री उशिरा झोपलेली होकाल लाज धरून सगळयांच्या आधी उठान आंघोळ पांघोळ करून मी बाय तेतला न्हय म्हणाक मोकळी. आताच्या वरातीत निस्तो धांगड धिंगो. पाय असतत म्हणान उडये मारायचे आणि हात आसत म्हणान उडवायचे आणि फेटे बांधान मिरवायचा.

गॅसबत्तीच्या उजेडातली वरातीची मजा आता नाय. दांडपट्टो, लाठीकाठी प्रहार, बनाटी फिरवणा, नारळ फोंडणा, तलवार बाजी करणा असला काय नाय. मानपान रुसवे फुगवे होते पाच परतावनाच्या सुक्या मटणात आणि वंगवणी रश्यात पोटात गडप होयत. लगीन केल्यासारखा वाटा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version