छोटीशी सोनू

1

प्राणी कधी कळत नकळत आपल्या घरातील एक घटक बनून जातात ते समजतच नाही. सोनू या मांजरीची ही गोष्ट.

१८ मार्च २००७, दुपारची वेळ होती. बसमध्ये रोज सारखीच गर्दी. सगळे प्रवासी घाई-गडबडीत. कोणी उतरण्याच्या घाईत, तर काही बसायला जागा मिळेल की नाही या चिंचेत. काही प्रवासी तिकीट घेत होते.. पण या घाई-गडबडीत कोणी तरी विनातिकीट आरामात बसमध्ये फिरत होते. मी मोबाइलवर गाणं ऐकत बसले असताना सीटच्या खालून काही तरी हालचाल जाणवली. म्हणून वाकून बघितलं तर काय, एक मांजरीचं छोटंसं पिल्लू! बहुधा ते एका आठवडय़ांचं असावं. हे इथे कसं आलं? आता कुठे जाईल? काय होईल? हे सर्व विचार सुरू झाले. त्या पिल्लाला हळूच उचललं तर वाटलं की, एखादा कापसाचा गोळा हातात घेतला आहे. खूपच गोड पिल्लू होतं ते.

लहानपणापासूनच मला कुत्रा, मांजर पाळण्याची भारी हौस होती; पण घरच्यांनी प्राण्यांना पाळायला कधीच परवानगी दिली नाही. त्या पिल्लाची अवस्था पाहून माझं मन हेलावलं. त्याला घरी न्यायचं ठरवलं. त्या मांजरीच्या पिल्लाला दबकतच घरी आणलं. आईने दार उघडताच केबीसीमधल्या प्रश्नांपेक्षा जास्त प्रश्नांचा भडीमार सुरू केला. कुठून आणलं, कसं मिळालं वगैरे वगैरे. मी उत्तर देता देताच पिल्लाला बशीत दूध दिलं. त्याने ते पटापट संपवून घराचा फेरफटका मारला. मी आणि माझा भाऊ तिच्या मागे मागे फिरू लागलो. नंतर ती बाथरूममध्ये गेली. खड्डा करायची कृती करू लागली. सुसू करून खड्डा बुजवायची कृती करून बाहेर आली. हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. तिचं नाव आम्ही ‘सोनू’ असं ठेवलं. काळा, पांढरा आणि तपकिरी अशा रंगछटा असणारी ही सोनू सर्वाशी खेळू लागली.

पप्पा घरी आल्यावर खूप मेहनतीने सोनूला घरीच ठेवायची परवानगी आम्ही त्यांच्याकडून मिळवली. आईला प्राण्यांची आवड असल्यामुळे काम जरा सोपं झालं. आता सोनूला राहायला घर बनवायची तयारी सुरू झाली. एका टबमध्ये मऊ कापडांची गादी करून त्यात माझ्याकडे असलेल्या खेळण्यातला वाघ ठेवून त्याच्याजवळ सोनूला झोपवलं. रात्री टब पलंगाजवळ ठेवायचो, तर सोनू वाघाच्या डोक्यावरून उडी मारून माझ्या जवळ येऊन झोपायची.

ती आल्यापासून घरातलं वातावरण खूप बदललं. अ‍ॅनिमल थेरपीबद्दल ऐकलं होतं; पण सोनू आल्यावर प्रत्यक्ष अनुभव आला. सोनूच्या पायगुणाने आईची तब्येत सुधारू लागली. एकदा सोनू फ्रीजच्या खालच्या टबमध्ये जाऊन झोपली. आम्ही तिला घर भर शोधत होतो. खूप अस्वस्थ झालो. रडू लागलो. अर्धातास झाला, पण ती सापडेनाच. मग बघतो तर काय .. म्याँव म्याँव करीत फ्रीजच्या मागून निघून ती आमच्याजवळ आली. तेव्हा तिची झोपण्याची नवीन जागा कळली. कपाट, माळा ही तिच्या झोपायची आवडती ठिकाणं. ती भरपूर मस्ती करायची तरीही सर्वाची आवडती. पकडापकडी खेळातल्यासारखं घरभर आमच्या मागे पळणार. तिला पकडायला गेलो की, बाथरूममधून लपून बघणार. एका हातात मावणारी छोटुशी सोनू केव्हा मोठी झाली, कळलंच नाही. सोनू आता एक मांजर नाही, तर आमच्या कुटुंबाची सदस्य झाली आहे.

कॉलेजमधून थकून घरी आलं की, सोनू वेलकम करायला येते. तिची प्रसन्न मुद्रा पाहिली की सर्व तणाव नाहीसा होतो. घरात कोणीही आजारी असलं तर सोनू लगेच जवळ जाऊन बसते आणि म्याँव म्याँव करून विचारपूस करते. कोणीही नवीन व्यक्ती किंवा वस्तू घरी आली तर हेर सोनूच्या नजरेतून वाचू शकत नाही.
सोनू सगळ्यांची प्रेमाने वागते, फक्त माझं हेअर ड्रायर सोडून. ते दिसलं की, लगेच केस फुगवून पंज्याने त्याला फटके मारते. घाबरून उडय़ा मारते, म्हणून मला ते लपवून ठेवावं लागतं. अशा आणखीपण खूप मजेशीर गोष्टी आहेत.

तिच्यामुळे आमच्या आयुष्यात अनेक रंग भरले गेले. प्राणी हे प्रेमाचे भुकेले असतात. प्रेमाचीच भाषा त्यांना कळते. ते मुके असले तरीही बोलणारे आपल्यापेक्षा जास्त निष्ठावंत असतात. म्हणून त्यांना एक प्रेमाचं घर दिलं की, त्या घराला घरपण येतं.. जसं सोनुमुळे आमच्या घराला आलं. मला तिच्या रूपाने एक जीवश्च कंठश्च मैत्रीणच भेटली!

1 COMMENT

  1. मांंजर खरंच खूप छान प्राणी आहे. पण ज्यादिवशी कायमचं नजरेआड होतं तेव्हा मनाला न भरणा—या जखमा देऊन जातं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version