Home महाराष्ट्र कोकण जिल्ह्यात लवकरच काँग्रेसची पुनर्बाधणी

जिल्ह्यात लवकरच काँग्रेसची पुनर्बाधणी

1

मी नारायणराव राणे यांचाच चेला आहे. माझी काम करण्याची पद्धत व स्टाईलही त्यांच्यासारखीच आहे. 

सावंतवाडी – मी नारायणराव राणे यांचाच चेला आहे. माझी काम करण्याची पद्धत व स्टाईलही त्यांच्यासारखीच आहे. त्यांच्याच विचाराने प्रभावित होऊन मी काम करत आहे. संघटनेतून तयार झालेला कार्यकर्ता असल्याने जनसंपर्काचे महत्त्वही मला माहीत आहे. त्यामुळे यापुढेही जनतेत राहूनच काम करणार असून सक्षम विरोधक म्हणून जनतेत काँग्रेसची जागा निर्माण करणार आहे.

काँग्रेसच्या माध्यमातून लोकाभिमुख कार्यक्रम हाती घेऊन जिल्ह्यातील काँग्रेसची पुनर्बाधणी करून काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस येण्यासाठी सक्षम काम करणार असल्याची ग्वाही आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडीतील पत्रकार परिषदेत दिली.

जय-पराजय हा लोकशाहीचाच भाग आहे. त्यामुळे झालेल्या पराभवातून धडा घेऊन व झालेल्या चुकांचे आत्मचिंतन करून यापुढे पक्षवाढीवर भर दिला जाणार आहे. गद्दारांची यादी तयार असून त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाणार आहे. ज्यायोगे भविष्यात कोणीही तशी हिंमत करणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे ठासून सांगतानाच, विधानसभा निवडणुकीतील मताधिक्क्यानुसार व भविष्यातील कार्याचा विचार करून यापुढे मेरीटवरच पदे दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यात जनतेला अभिप्रेत असलेले कार्यच आपण करणार आहोत. कोणावर टीकाटिप्पणी करणे अथवा कोणाच्या टीकेला उत्तर देणे यासाठी माझ्याकडे वेळ नाही. ‘अरे ला कारे’ ही माझी भूमिकाही नाही. आपल्या पदाचा जास्तीत जास्त वेळ हा जनतेच्या हितासाठी करावा, या मताचा मी आहे. सद्यस्थितीत भातशेतीच्या नुकसानीचा विषय अत्यंत महत्त्वाचा असून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न सुरूआहेत.

जिल्ह्यात सध्या मोठय़ा प्रमाणात डेंग्यूचा प्रादुर्भाव झालेला असल्यामुळे जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून जि.प.च्या ५० ही विभागांत टप्प्याटप्प्यात डास प्रतिबंधक फवारणी करण्याचा आपला मानस असून काँग्रेसच्या माध्यमातून तसा भरीव कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. दीड महिना हा कार्यक्रम चालणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीतील पराभव आम्ही मान्य केला आहे.

या पराभवातून बरेच काही शिकण्याजोगे आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील राणेंमुळे पदे मिळवलेल्या, त्यांच्याच जीवावर मोठे झालेल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत गद्दारी केली. ज्यांना मानसन्मान दिला, त्यांनीच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केले. त्यामुळे अशा लोकांना बाजूला करून संघटनात्मक मोठे फेरबदल करण्याचे संकेतही त्यांनी या वेळी दिले. आम्हाला आमचे सच्चे कार्यकर्ते ओळखता आले, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

विधानसभा निवडणुकीत जो निकाल मिळाला त्यादृष्टीने निवडणुकीतील मुद्दे व घटना समोर ठेवून पक्षबांधणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी तालुक्याच्या तुलनेत शहरात मात्र अत्यंत कमी मते मिळाली. त्यामुळे सावंतवाडी शहरातील बुद्धिजीवी वर्गात विश्वास निर्माण करण्यात आमचे विचार व कार्यक्रम निश्चितच कमी पडले असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे यापुढे लोकांना अभिप्रेत असलेले काम करतानाच त्यादृष्टीने शहरात विविध कार्यक्रम राबवले जातील. तसेच लोकांमध्ये चालतील व लोक ज्यांना स्वीकारतील तेच चेहरे सावंतवाडीसारख्या शहरात भविष्यात पुढे आणले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. चार राहिले तरी चालतील, मात्र प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच यापुढे पक्षाचे कार्य हाती घेणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

कणकवलीच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत व्हावी, त्यांना ताकद मिळावी, यासाठीच माझ्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य घेतले गेले. भाजपसारख्या पक्षातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी मदत करतात. तसाच हा प्रकार होता. त्यामागे कोणावर अविश्वासाचा प्रश्नच नव्हता. मात्र,जिल्ह्यात स्वाभिमान संघटना वाढवण्यासाठी मागणी होत असून भविष्यात जिल्ह्यात पक्षसंघटनेबरोबरच स्वाभिमान संघटना वाढवण्याचाही आपला विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिन्याला किमान दोन लोकाभिमुख कार्यक्रम घेऊन यापुढे कोँग्रेस कार्यकर्ते काम करणार असून जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस लवकरच बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version