Home महामुंबई ठाणे ठाण्यात दणदणाटावरून गोंगाट

ठाण्यात दणदणाटावरून गोंगाट

0

उत्सव काळात ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्यास ध्वनिवर्धक यंत्रणा लाउडस्पीकर पुरवणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश ठाणे पोलिसांनी दिल्याने आयोजकांची पंचाईत झाली आहे.

ठाणे – गणेशोत्सव, दहिकाल्यासह उत्सवांत ध्वनिक्षेपकामुळे होणा-या दणदणाटावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. उत्सव काळात ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्यास ध्वनिवर्धक यंत्रणा लाउडस्पीकर पुरवणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश ठाणे पोलिसांनी दिल्याने आयोजकांची पंचाईत झाली आहे.

ठाण्यातील नाक-कान-घसा तज्ज्ञांनीही या वादात उडी घेतली असून पोलिसांनी आखून दिलेली ५५ व ६५ डेसिबल आवाजाची मर्यादा चुकीची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कानठळय़ा बसवणा-या आवाजासाठी डॉक्टरांनी दिलेली ही मात्रा पोलिसांना मानवणार की नाही, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

उत्सवप्रिय ठाण्यात डीजे आणि लाउडस्पीकरचा उत्सवकाळातील दणदणाट नवा नाही. अनेक लोकप्रतिनिधीच उत्सवाचे आयोजक असल्याने आवाजाची मर्यादा ओलांडणा-या मंडळांविरोधात तक्रार आल्यास फुटकळ कलम लावून त्यांना फुकाचा धाक दाखवतात. मागील वर्षी दहीहंडीत ठाण्यातील उत्सव आयोजकांनी ध्वनिमर्यादा ओलांडल्याची तक्रार दक्ष नागरिक प्रदीप इंदुलकर यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्याकडे केली होती.

त्यावेळी नौपाडा पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेलेल्या इंदुलकरांनाच पोलिसांनीच मारहाण केली होती. या घटनेनंतर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी इंदुलकरांना मारहाण करणा-या नौपाडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जे. डी. मोरे आणि पोलिस निरीक्षक शिरतोडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे ठाणे पोलिसांची नाचक्की झाली होती.

ठाण्याचे पोलिस सहआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी या संदर्भात नुकतीच अधिका-यांची बैठक घेऊन उत्सवकाळात खास आचारसंहिता आखून दिली. यात ध्वनिक्षेपकासाठी ५५ व ६५ डेसिबलची मर्यादा लाउडस्पीकरसाठी आखून देण्यात आली. त्यामुळे लाउडस्पीकर असोसिएशनने यंदा उत्सवावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलिस विरुद्ध लाउडस्पीकरवाले असा संघर्ष सुरू झाला आहे.

ठाण्यातील डॉक्टरांनी यात सहभाग घेत लाउडस्पीकरवाल्यांची बाजू लावून धरली आहे. शुक्रवारी आशीष भुमकर, विवेक जाधव, हितेश लाडवा, सुनील बुधलानी आदी कान-नाक-घसा तज्ज्ञांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या या निर्णयाचा समाचार घेतला. उत्सवकाळात लाउडस्पीकरसाठी ५५ व ६५ डेसिबलची मर्यादा आखणे चुकीचे आहे.

यासाठी कोणताही वैज्ञानिक आणि शास्त्रीय आधार नाही, असा दावा संबंधित डॉक्टरांनी केला आहे. असे नियम करणे म्हणजे हिंदू भाविकांवर अन्याय असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. दहीहंडीतील ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे कानांना कोणतीही इजा होत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. यासंदर्भात डॉक्टरांचे शिष्टमंडळ लवकरच पोलिस अधिका-यांची भेट घेऊन त्यांना आपले म्हणणे शास्त्रीय आधारावर पटवून देणार आहेत.

मंदिरातील पुजा-याचे कान निकामी होत नाही का?
आपले कान इतके सक्षम आहेत की दररोज ९० डेसिबलचा आवाज आठ तास ऐकल्यास इजा होत नाही. कानाच्या आतील भागात पडद्यामागे मटाराच्या आकारासारखा नाजूक भाग असतो. ९० डेसिबलपर्यंत हा आवाज सहन करण्याची या भागाची क्षमता असते. ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे हृदयाच्या स्पदंनाना (हार्ट बिटस ) परिणाम होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एखाद्याला आवाज सहन न होणे ही मानसिकता असू शकते. मंदिरातील घंटेचा आवाज १०० डेसिबलच्या पुढे असतो. मग पुजा-याचे कान निकामी का होत नाहीत, असा सवालही डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version