Home महामुंबई ठाणे ठाण्यात सफाई कामगारांच्या पगारावर ठेकेदारांचा डल्ला

ठाण्यात सफाई कामगारांच्या पगारावर ठेकेदारांचा डल्ला

1

ठाणे महापालिकेने कचरा वेचक म्हणून नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून कामगारांचे शोषण होत असल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. 

ठाणे – ठाणे महापालिकेने कचरा वेचक म्हणून नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून कामगारांचे शोषण होत असल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र आता गरीब सफाई कामगारांच्या पगारावर डल्ला मारून त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेतील रकमेतही कंत्राटदारांनी घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे.

महापालिका घनकचरा विभागातील मोठा घोटाळा मुंबईतील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शोधून काढला आहे. गेले वर्षभर पदरमोड करून सफाई कामगारांच्या पैशांवर गब्बर बनलेल्या कंत्राटदार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात महापालिकेचे १० कंत्राटदार असून त्यांनी एकीकडे बोगस कामगार दाखवून वेतन तर लाटलेच पण भविष्य निर्वाह निधीतही गडबड घोटाळा करून सरकारलाही फसवले आहे.

चेंबूरच्या महाविद्यालयातील बलजीत यादव, कुमार गौरव आदी ३० विद्यार्थ्यांनी माहिती अधिकारात माहिती मिळवून हा प्रकार उघडकीस आणला आहे. महापालिका क्षेत्रात एम. कुमार, अमृत एंटरप्रायजेस, शांता पाटील कंन्स्ट्रक्शन असे तिघे ठेकेदार तर रस्ते सफाईसाठी ओम दिगंबर व्यंकटेश्वर, विजय दळवी, सिद्धिविनायक एंटरप्रायजेस, अभिषेक कन्स्ट्रक्शन, अमृत एंटरप्रायजेस, कल्पेश एंटरप्रायजेस असे सात कंत्राटदार कायम आहेत.

२००८ पासून या कंत्राटदारांपैकी काहींनी कामगारांना दरवर्षी मिळणा-या २१ दिवस भर पगारी सुट्टीवर डल्ला मारून स्वत:च्या खात्यात पाच कोटी रुपये वळते केल्याचा आरोप बलजीत यादव याने केला आहे. शिवाय कामगारांना सुट्टीही दिलेली नाही.

पालिकेच्या प्रत्यक्ष १ हजार २८२ कर्मचारी कामावर असताना पालिकेच्या लेखी हा आकडा १ हजार ७५७ म्हणजे पावणेपाचशेहून अधिक आहे. महापालिका या जादा कामगारांना काम न करताच वेतन देत आहे. या घोटाळ्याला पालिका अधिकारी व राजकीय पाठबळ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कर्मचा-यांच्या दोनदा नोंदी
दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रत्येक कामगारांच्या दोनदा नोंदी असून त्याद्वारे भविष्य निर्वाह निधीत मोठा भ्रष्टाचार केला आहे. पालिकेत एक नोंद आणि भविष्य निर्वाह निधीत दुसरी नोंद करून किमान ८ ते १० हजार याप्रमाणे अनेक कामगारांचे पैसे लाटण्यात आले आहेत. पालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

1 COMMENT

  1. जोगेश्वरी येथील प्रताप नगर,शिवटेकडी,रामवाडी अश्या ठिकाणी हि कंत्राटदाराने कंत्राट घेतले, पण स्मशानभूमीच्या समोरील भागातील गटारे वाहून जातात आणि त्याचे पाणी मुंबईच्या हायवेच्या रस्त्यावर जमा होते .त्यामुळे तेथे ट्राफिक लागणे,रस्त्यावर खड्डे पडणे असे प्रकार घडत असतात. कित्येक कंत्राटदाराने आपली भूमिगत गटारे बुजवून ती गटारे पूर्णपणे जमीनदोस्त करून ठेवली आहे, त्यामुळे रस्त्यावरील वरच्यावरचा कचरा काढून कंत्राटदाराचे कामगार अर्धा,एक तासात संपूर्ण पगार घेऊन जातात. कित्येक कंत्राटदार २ एवजी ६ कामगार दाखवून उर्वरित ४ कामगारांचा पगार लाटतात. साधे नगरसेवक अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे पालिका आयुक्तांकडे तक्रार करून तरी कोणती साफसफाई करण्यात येणार आहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version