Home महाराष्ट्र कोकण डंपर दरीत कोसळून पाच ठार

डंपर दरीत कोसळून पाच ठार

1

संगमेश्वर तालुक्यातील कुळये-वाशी गडगडी धरणाजवळ विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना घेऊन जाणारा डंपर खोल दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला.

देवरूख- विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना घेऊन जाणारा डंपर खोल दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू तर सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी संगमेश्वर तालुक्यातील कुळये-वाशी गडगडी धरणाजवळ घडली. या डंपर मधून १९ विद्यार्थी तर १२ ग्रामस्थ प्रवास करीत होते. मृतांमध्ये दोन विद्यार्थी, एक डॉक्टर व एक सामाजिक कार्यकर्ता व एका तरूणाचा समावेश आहे.

कुळ्ये वाशी, फणसवळे, देवोळे येथील २५ प्रवासी संगमेश्वरहून सुटणा-या दुपारच्या वाशी फणसवळे एसटीची वाट पहात होते. मात्र दुपारची एसटी केवळ कुळ्ये गावापर्यंतच येवून तेथूनच परत फिरल्यामुळे या सर्व प्रवासी ताटकळले होते. याचवेळी एकाने धरणा जवळच असलेल्या खासगी डंपरला सर्व प्रवाशांना फणसवळे व देवोळे या गावात सोडण्याची विनंती केली. यानुसार डंपर चालक रोहित चाळके सर्व प्रवाशांना घेऊन दुपारी १२.४५ च्या सुमारास कुळ्ये येथून प्रवास सुरू केला.

कुळ्ये गावाच्या पुढे चढावावर डंपर चालकाला रस्ता समजून न आल्याने तो रस्त्याच्या खाली डंपर सरकला आणि डंपर दरीत कोसळला. डंपर एका झाडाला जावून अडकला. डंपर कोसळत असताना हौद्यात बसलेले सर्व विद्यार्थी खाली पडले त्याच्यावरून डंपर गेला मात्र सर्व विद्यार्थी खाली जाळीत अडकल्यामुळे त्यांना कोणतीच इजा झाली नाही. ज्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी शेवटपर्यंत डंपरला धरले होते ते दरीत पडले आणि त्याच्यावरच डंपर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये शांताराम सावंत ( ५५), डॉ. अनिल पवार (४५), समिक्षा कदम (१६), दीपाली मादगे (१५), योगेश जाधव (२२) यांचा समावेश आहे. यातील योगेश जाधव व दीपाली मादगे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

तर हा अपघात झाला नसता…

फणसवळे एसटी बस सुरू असती तर हा अपघात व दुर्घटना घडली नसती अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. शनिवारची सकाळची शाळा यातच बस नसल्याने नाईलाजाने विद्यार्थी व ग्रामस्थांना डंपरचा आधार घ्यावा लागला होता. अन् पाच जाणांना आपला जीव गमवावा लागला.

1 COMMENT

  1. खुप दुखद घटना आहे
    एसटीची फेरी उशिरा का होईना पण शेवट पर्यत फणसवळे पर्यत झाली असती तर कदाचित हे घडले नसते
    राज्य परिवहनाच्या गाड्या अर्ध्यातुनच माघारी फिरवणे चुकीचे आहे आणि कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे
    ग्रामिण भागात अजून एसटी ला चांगला पर्याय उपलप्ध नाही हे राज्य परिवहन मंडळाला माहित पाहिजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version