Home विदेश डेव्हिड हेडलीवर तुरुंगात हल्ला

डेव्हिड हेडलीवर तुरुंगात हल्ला

0

नवी दिल्ली – २६/११ हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलमन हेडली याच्यावर अमेरिकेतील तुरुंगात हल्ला झाला. शिकागोमधील तुरुंगात ८ जुलै रोजी हा हल्ला झाला असून, रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या हेडलीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

२६/११च्या खटल्यात माफीचा साक्षीदार बनलेला पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली हा शिकागोतील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. ८ जुलै रोजी तुरुंगातील दोन कैद्यांनी त्याच्यावर हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या हेडलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला करणारे दोन्ही कैदी हे सख्खे भाऊ असून त्यांना १० वर्षांपूर्वी एका पोलिसावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. मुंबईत २००८मध्ये झालेल्या हल्ल्यातील हेडली हा माफीचा साक्षीदार असून तो पाकिस्तान तसेच दहशतवादी संघटनांसाठी डबल एजंट म्हणून काम करत होता.

दरम्यान, बाबरी मशीद पाडल्याचा सूड म्हणून भारतातील मंदिरांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता आणि गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील हल्ला हा त्याचा भाग होता, असा खुलासा हेडलीने दोन वर्षापूर्वी केला होता. २६/११च्या हल्ल्यासंबंधित खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. एस. सानप यांच्यापुढे सुरू होती. खटल्यातील माफीचा साक्षीदार म्हणून हेडलीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवण्यात आली होती. २००४मध्ये गुजरात येथे कथित पोलीस चकमकीत ठार झालेली मुंब्रा येथील १९ वर्षीय तरुणी इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची (एलईटी) दहशतवादी होती, असेही त्याने म्हटले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version