Home महामुंबई ठाणे डोंबिवलीत बारबालांसोबत नाचणारे पोलीस निलंबित

डोंबिवलीत बारबालांसोबत नाचणारे पोलीस निलंबित

0

‘डान्सबार बंदी’ धाब्यावर बसवून येथील ‘इंद्रप्रस्थ’ बारमध्ये बारबालांसोबत नाचगाण्यात रमलेल्या डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

डोंबिवली- ‘डान्सबार बंदी’ धाब्यावर बसवून येथील इंद्रप्रस्थ’ बारमध्ये बारबालांसोबत नाचगाण्यात रमलेल्या डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनी बारबालांसोबत अश्लील हावभाव केल्याचा व्हीडिओ क्लिप पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनाच पाठवण्यात आली होती.

प्रसिद्धीमाध्यमांत झळकल्याने खाकी वर्दीला बट्टा लागला असून या कृत्याची गंभीर दखल पोलीस दलातील वरिष्ठांनी घेतली आहे. या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँचचे संजय बाबर आणि रशीद मुलानी हे दोघे एका बारमधील बारबालांशी अश्लील वर्तन करत असल्याचे या व्हीडिओ क्लिपमध्ये आढळले आहे. कल्याण-शिळ मार्गावरील एका डान्स बारवर रविवार १२ मार्च रोजी छापा टाकण्यात आला. त्यावेळी या बारमध्ये दोन पोलीस बारबालांसोबत अश्लील वर्तन करताना आढळून आले. त्याची व्हीडिओ क्लिप एका नागरिकाने कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून दिल्याने एकच खळबळ उडाली.

या दोन्ही पोलिसांविरोधात पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कारवाई केली आहे. कल्याण-शीळ रोडला सोनारपाडा गावाजवळ ‘इंद्रप्रस्थ’ बारमध्ये अनैतिक प्रकार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त कालिदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलिसांनी या बारवर रविवारी रात्री उशिराने छापा टाकण्यात आला.

यावेळी पोलिसांनी सुधाकर मनगोर (३२), रजत शेट्टी (३०), संतोष अंधारीकर (३६) , रवी दुबे (२४), सुरेंद्र शेट्टी (४३) , उमेश शेट्टी (७५) आणि प्रदीप काळे (२४) या बारचालकासह कॅशियर, म्युझिक ऑपरेटर आणि १७ बारबालांना ताब्यात घेतले.

या बारमध्ये मानपाडा पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँचचे संजय बाबर आणि रशीद मुलानी हे दोघे बारमधील बारबालांशी अश्लील चाळे करतानाचा व्हीडिओ पोलीस चौकशीत उघड झाला आहे.

या व्हीडिओ क्लिपची पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी चार दिवसांनंतर गंभीर दखल घेतली असून गुरुवारी सकाळी पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशामुळे ठाणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही वादग्रस्त पोलिसांना ठाण्याच्या अकार्यकारी शाखेत ठेवण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version