Home प्रतिबिंब तलफ तुम्हाला, त्रास आम्हाला!

तलफ तुम्हाला, त्रास आम्हाला!

1

पाऊस सुरू आहे. एका सार्वजनिक ठिकाणी माणसं आडोसा पाहून थांबली आहेत. अनोळखी असले तरी, त्यांच्यातला संवाद सुरू आहे. थांबणार आहे की नाही पाऊस? त्याच्या प्रश्नावर कुणाचे तरी उत्तर, येऊ द्या हो! मनसोक्त. खूप तापतंय, जरा थंड तरी होईल. तिसरा म्हणतो, स्टेशन गाठेपर्यंत तरी थांबायला हवा पाऊस. अशातच एक जण खिशातून सिगारेटचे पॅकेट काढतो, शिलगावतो आणि धूर सोडतो. राग सगळ्यांनाच येतो पण कुणीच काही बोलत नाही. सिगारेट पिण्यासाठी आपल्याकडे बंदी नाही, पण आपल्या धूम्रपानाचा त्रास इतरांना होतोय, हे साधे त्यांना कसे कळत नाही!
तलफ ही भल्याभल्यांना वेड लावते. ती साधी चहा-सुपारीची असेल तर काही हरकत नाही. पण सिगारेट पिणा-यांना वेळ-काळाचे काही भानच राहत नाही. रेल्वेस्टेशनवर सिगारेट पिता येत नाही, म्हणून जरासा आडोसा पाहून यांचे पेटवणे सुरू होते. ही तलफ भागवण्यासाठी कुठलाही क्षण ते वाया जाऊ देत नाहीत. सेंट्रल रेल्वेच्या दादर स्टेशनवर रात्री सा-यांचीच घरी जाण्याची धावपळ सुरू असते. स्मोकर्स तीही वेळ सोडत नाहीत. प्लॅटफॉर्म नं. एकच्या पाय-या उतरण्याआधी पुलावरच सिगारेट शिलगावली जाते. गाडीच्या येण्याची वाट बघत, त्यांचे धूर सोडणे सुरू असते. लोकलचा लाइट दिसताच विझवाविझवी करत, पायऱ्या उतरत मग गाडी गाठली जाते. आता हे धूरकरी म्हणतील, ‘पितो आम्ही आणि आमच्यावर जळता तुम्ही’! त्यांचेच म्हणणे खरे आहे. पितात ते आणि ज्यांचा या सिगारेटशी काडीमात्र संबंध नसतो तेच ‘जळतात’. विनाकारण पॅसिव्ह स्मोकींग करत त्या धुराच्या वेटोळ्यात अडकतात. धूर सहन न होणारे खोकतात. स्वत:ला सावरत फलाट गाठण्यासाठी पाय-या उतरतात.

मुंबईतले हे चित्र एकटया दादर स्टेशनच्या परिसरापुरतेच मर्यादित नाही. कुठल्याही रस्त्यावरून जा, कधीही तुम्हाला बिनपैशाने हा धूर पिता येतो. पिणा-यांना याचे काहीही वाटत नाही. स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर टपरीवरून स्मोकर्स सिगारेट घेतात. ती पेटवतात आणि मागे धूर सोडत चालत राहतात. आजूबाजूने चालणा-या महिला आहेत काय, लहान मुले आहेत का, याचे कुठलेही तारतम्य पाळत नाहीत. ही सारी शिकलेली, सुटाबुटातली असतात, पण रस्त्यावर सिगारेट पिताना ते मूर्खच असतात. म्हणूनच शहाणे माणसं, मुली, मुले त्यांच्या या विकृतीकडे फक्त बघत राहतात. त्यांना कुणीही हटकत नसतात. मूर्ख माणसांना हटकून काहीच उपयोग होणार नाही, हे शहाण्या माणसांना कळत असतं म्हणून!

सिगारेट पिण्यास बंदी असणारी काही सार्वजनिक ठिकाणं आहेत. रेल्वेस्थानक, विमानतळ, सरकारी कार्यालये, कापरेरेट ऑफिसमध्ये ही बंदी पाळली जाते. त्यामुळे अशा कार्यालयांमध्ये असणा-यांना त्याचा त्रास होत नाही. पण जिथे, जिथे बंदी आहे, त्या स्थळांच्या बाहेरचा परिसर ‘सिगारेट पिणा-यांपासून सावध राहा’ अशी पाटी लावावी इतका धोकादायक झाला आहे. अशा कार्यालयांच्या बाहेरच्या चहा-पानाच्या टप-या, चॅट सेंटर्स, बसथांब्यांचा परिसर स्मोकर्ससाठी सेफ झोन झाला आहे. धूम्रपानासाठी बंदी असणा-या कार्यालयातील कर्मचारी जरासा वेळ मिळाला की ही ठिकाणे गाठतात. तिथे उभ्या असणा-यांना त्रास होत असतो. सिगारेट पिणा-यांपासून सेफ झोन म्हणून त्यांनी शेजारी असणा-या कार्यालयात जाऊन थांबायचे का? असा प्रश्न आता पडायला लागला आहे.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये, असा नियम आहे. त्या नियमाचे पालन ज्या ठिकाणी तात्काळ दंड आकारला जातो, अशा ठिकाणी होते. रस्ते, बसथांबे, चहा-पाण्याच्या टप-या हे ठिकाणं सार्वजनिक स्थळ आहेत, हे या मूर्ख माणसांना ठाऊकच नसावे कदाचित. अशा ठिकाणी धूम्रपान करणा-यांवर काही कारवाई झाली, असेही ऐकिवात नाही. त्यांना अटकाव करण्यासाठी सर्वसामान्य माणसाने काय करावे, याविषयीची कुणीही काही सांगत नाहीत. अशा वेळी त्यांचा त्रास सहन करून आपणही त्या सिगारेटच्या धुरासोबत ‘जळत’ राहायचे, नको असतानाही हे विष उरी घ्यायचे याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. पर्याय नाही म्हणून सहन करायचे की या विरोधात काही ठोस निर्णय झालेच पाहिजेत, यासाठी चळवळ उभारायची हे सा-यांनी मिळून ठरवण्याची गरज आहे.

सर्वसामान्य माणसांची ताकद मोठी असते. ती सोशल साइट्सवरून व्यक्त होत असते. या सोशल साइट्सचा वापर करून या मूर्ख माणसांना रोखता येऊ शकेल. जी माणसं रस्त्याने, सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पितात, त्यांची मोबाइलवर छायाचित्रे काढावीत. ती फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅपवर टाकून ‘या वेडयांना कुणी ओळखते का?’ अशी टॅग टाकली तर किमान बदनामीच्या भयाने या माणसांना आवरता येईल. आता ही वेडी माणसे म्हणतील, ‘आमच्यासाठी स्मोकिंग झोन द्या.’ त्यांचेही बरोबर आहे. त्यासाठी त्यांनी लढावे, आम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही आमची लढाई लढली पाहिजे, ती जिंकायचीच आहे, हे ठरवूनच!

1 COMMENT

  1. आम्ही म्हणजे कोण? हे कोण ठरवणार ?
    आणि कायद्याने कोणाचे परवानगी शिवाय फोटो काढून facebook वर टाकायला आणि बदनामी करायला पण बंदी आहे …हेही लक्षात असू दे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version