तो अन् मी

1

तो सुरुवातीपासूनच माझ्या शाळेत होता, पण त्याला मी कधीच पहिलं नव्हतं. आमची ओळख झाली ती एका क्लासमध्ये. त्याच्या मैत्रीमुळे मला खूप काही शिकायला मिळालं. एक छान निखळ मैत्रीचं नातं आमच्यात होतं. पण नंतर आमच्या दिशा वेगळ्या झाल्या आणि..
त्याची आणि माझी ओळख मॅक्सम्युलर भवनमधली. आम्ही दोघंही मॅक्सम्युलर भवनमध्ये जर्मन शिकायला यायचो. एकच बॅच होती, मात्र आमची ओळख झाली ती गैरसमजाने. क्लासमध्ये आमचा तीन-चार जणींचा ग्रुप होता. त्यातल्याच एकीने मला सांगितलं होतं की, ‘तो’ ही साठय़े कॉलेजमध्येच बी. एस्सी.ला आहे. आम्ही बंक मारून कॉलेजमध्येच ‘टीपी’ करत असल्यामुळे तसे बरेच चेहरे ओळखीचे झाले होते. पण हा चेहरा कधी पाहिल्यासारखा वाटत नव्हता. कदाचित सायन्सचा विद्यार्थी असेल म्हणून पाहिलं नसेल, असं म्हणून मी सोडून दिलं. त्यानंतर कॉलेजमध्ये ज्या दिवशी बी. एस्सी.चा निकाल होता त्याच दिवशी नेमका ‘तो’ क्लासमधून हाफ डे गेला. तेव्हा खात्री पटली की, हा साठय़ेलाच आहे. नंतर ब-याच दिवसांनी ‘त्याच्या’शी बोलण्याचा योग आला. तेव्हा कळलं की, ‘तो’ फादर अ‍ॅग्नेलला इंजिनीअरिंगच्या फर्स्ट इअरला होता. गप्पांच्या ओघात समजलं आमच्यात ‘कॉमन’ गोष्टी ब-याच होत्या. ‘तो’ ही दहिसरलाच राहात होता. आणि मीही. पहिली ते चौथी (चौथीनंतर मी शाळा बदलली) आम्ही एकाच शाळेत, एकाच बॅचला होतो. पण आम्ही एकमेकांना कधी पाहिलंही नव्हतं. नंतर असं कळलं की आमच्या दोघांच्या काही ‘कॉमन’ ओळखीही होत्या.

हळूहळू आमची चांगलीच गट्टी जमली. मुळात आमची ‘वेव्ह लेन्थ’ जुळली. आम्ही एकत्र क्लासला येऊ-जाऊ लागलो. क्लासचे शेवटचे दिवस जवळ येऊ लागले. त्या वेळी आम्हाला वाटलं, आता आमची मैत्री इथेच संपणार. परंतु असं काहीच झालं नाही. घरच्यांच्या दबावामुळे त्याने इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला होता. पण इंजिनीअरिंग सोडून त्याला भवन्स कॉलेजमध्ये ‘इंडस्ट्रिअल केमिस्ट्री’ला प्रवेश घ्यायचा होता. दुर्दैवाने त्याला प्रवेश नाही मिळाला. आणि इतर कोणत्याच कॉलेजमध्ये फॉर्म न भरल्याने ‘त्याने’ अखेर साठय़े कॉलेजमध्येच बी. एस्सी.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. पुन्हा आमचं एकत्र येणं-जाणं सुरू झालं. या काळात आमची मैत्री खूपच वाढली. मुळात आम्हाला एकमेकांचे स्वभाव कळले. आम्ही त्या तीन वर्षामध्ये भरपूर मजा केली.

‘त्याच्या’कडून मला ब-याच गोष्टी शिकता आल्या आणि त्याने मला त्या शिकवल्याही. ‘तो’ अभ्यासात खूपच हुशार होता. मराठी माध्यमात शिकूनही त्याचं इंग्रजी अप्रतिम होतं. त्याने माझं इंग्रजी सुधारण्यासाठीही बरीच मदत केली. व्याकरणात एखादी चूक झाली तर तो चिडवत असे, परंतु असंही म्हणे, बाहेरचे लोक हसण्यापेक्षा मी हसलेलो कधीही चांगलं. कधी कधी स्टेशनपासून कॉलेजपर्यंत जाईपर्यंत ‘तो’ मला इंग्रजीतच संभाषण करायला सांगे. एकदा तर त्याने मला इंग्रजी व्याकरणाचं पुस्तकही आणून दिलं होतं. स्वत: सायन्सचा विद्यार्थी असूनही तो मला कॉमर्सच्या अभ्यासात मदत करत असे.

वेगळ्याच स्वभावाचा होता ‘तो’. गरिबांना, गरजूंना मदत करण्यासाठी तो नेहमी तत्पर असायचा. तसा स्वभावाने तो हळवाही होता. एकदा चर्चगेट स्टेशनला येत असताना एक म्हातारी बाई अगरबत्ती विकताना दिसली. तिच्याकडे बघून तरी ती चांगल्या घरातली दिसत होती. तिच्याविषयीच बोलत बोलत आम्ही पुढे गेलो. आणि अचानक ‘तो’ मागे गेला आणि त्या बाईकडून अगरबत्तीची बरीच पाकिटं त्याने विकत घेतली. मला कळलंच नाही त्याने असं का केलं. नंतर तो स्वत:हून म्हणाला, या आजीमध्ये मला माझी आजी दिसली. उद्या माझ्या आजीवरही अशीच वेळ नाही ना येणार? त्याचं हे उत्तर ऐकून खूपच आश्चर्य वाटलं. आणि बरंही वाटलं की माझ्या आयुष्यात असा विचार करणारा मित्र आहे. रस्त्यावरच्या मुलांना, गरिबांना तो खायलाही देत असे. आणि त्याची हीच सवय थोडय़ा प्रमाणात मलाही लागली.

त्याच्यातील सगळे गुण चांगले होते. देखणा, उंच होता. अभ्यासात हुशार होता. त्याची विनोदबुद्धीही चांगली होती. वाचनही बरंच असल्यामुळे अनेक गोष्टींचं त्याला ज्ञान होतं. अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हटलं तरी चालेल. आणि या सर्व गोष्टींचा ‘त्याला’ गर्वही होता. स्वत:च्याच प्रेमात असे तो. बरेचदा तो समोरच्याला तुच्छही समजत असे. आणि त्याच्यातली ही एकच गोष्ट मला खूप खटकायची. शेवटी तो त्याचा स्वभाव होता. आणि स्वभावाला औषध नसतं.

कॉलेज संपल्यानंतर आमचा संपर्क जवळपास तुटलाच. परंतु म्हणतात ना दुनिया गोल आहे, त्याची प्रचिती मला आली. ‘त्याने’ के. सी. कॉलेजमध्ये ‘मॅनेजमेंट स्टडिज’ला प्रवेश घेतला आणि मीही त्याच कॉलेजमधून जर्नालिझम करत होते. आम्ही पुन्हा भेटू लागलो. पण कॉलेजमध्ये होती तशी मैत्री आता नव्हती. काहीतरी बिनसत होतं. काय ते कळत नव्हतं. मग मात्र आमची मैत्री संपुष्टातच आली. मधल्या काळात आमचं दोघांचंही लग्न झालं. दोन वर्षापूर्वी ऑफिसमधून घरी जाताना अचानक ‘तो’ मला एलफिन्स्टन स्टेशनवर दिसला. तीन-चार वर्षाचा काळ लोटला होता. कसं वागावं कळलंच नाही. तरीही बोलले त्याच्याशी. परंतु आधी जी आपुलकी, प्रेम होतं ते आता आमच्या दोघांच्याही बोलण्यामध्ये नव्हतं. आमचं वागणं अगदी ‘फॉर्मल’ होतं. बोलण्या-बोलण्यातूनच कळलं की त्याचा घटस्फोट होतोय. वाईट वाटलं पण मी ऐकून घेण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हते. कारण आता आमचं नातंही तितकं मोकळं राहिलं नव्हतं. त्यानंतर आतापर्यंत आमची भेट पुन्हा कधी झालीच नाही.

खरंच काही नात्यांमुळे आयुष्यच बदलून जातं. एकंदरीतच ‘त्याच्या’मुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात खूपच फरक पडला. कुठेही एकटी फिरायला कंटाळणारी मी आता एकटी सिनेमाही पाहायला जाते. त्याच्यामुळे मी माझी स्वत:ची कंपनी ‘एन्जॉय’ करायला शिकले. आमचं नातं खूपच छान होतं. त्यात रुसवे-फुगवे नव्हतेच. आता नातं राहिलं नसलं तरी त्या सुखद आठवणी आजही माझ्यासोबत आहेत.

1 COMMENT

  1. मस्त वाटला वाचून …सुंदर.. पण प्रेम आयुष्यात फक्त त्रास च देऊन जाता आणि आठवणी मरेपर्यंत साथ नाही सोडत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version