Home मध्यंतर उमंग रंगुनी रंगात सा-या.. पण

रंगुनी रंगात सा-या.. पण

0

सण कोणताही असू द्या, आपण तो उत्साहात साजरा करायचाच, तरुणाईचा हा फंडा एकदम मस्त आहे. आता तर काय उद्या रंगपंचमीच आहे, त्यामुळे कॉलेजचा ग्रुप जमवून किंवा मित्र-मैत्रिणींसोबत रंगपंचमी खेळण्याचे प्लान सुरू झाले असतील. बुरा न मानो होली है! म्हणत मित्र-मैत्रिणीच्या अंगावर रंग टाकायचे, बँगमधून पाण्याची बाटली काढून ती अंगावर ओतायची, रस्त्यात ओरडत जायचं अशी धमाल, मजा, मस्ती तरुणाईची सुरू असते. अशी होळी किंवा रंगपंचमी सगळेच साजरे करतात. त्यात काय वेगळं; पण अशीही काही मंडळी आहेत जी रंगपंचमी, होळी थोडी वेगळी साजरी करतात. आनंदाचा, जनजागरूकतेचा असा रंग आपल्या मित्र-परिवारात उधळतात की त्यामुळे त्यांचं कौतुक करू तेवढं कमी.
‘होळी खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करा’, ‘रस्त्यावर मिळणा-या रासायनिक रंगांचा वापर टाळा’, ‘पाण्याचा वापर करू नका’, ‘येणा-या-जाणा-यांच्या अंगावर फुगे मारू नका’, ‘होळी आनंदात साजरी करा’ अशा प्रकारच्या सूचना रेडिओवर ऐकायला मिळतात, मालिकांमधले तुमचे आवडते अभिनेते, अभिनेत्री येऊन होळी कशी साजरी करावी यावर उपदेश देतात. व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियावर जनजागृती करणारे मेसेजेस येतात; पण काही जण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत त्यांना हवी तशीच होळी खेळतात. भरपूर पाण्याचा वापर, मोठमोठय़ा आवाजात डिजे लावून त्या गाण्यांवर थिरकणे, रस्त्यावर चालणा-या मुलींवर फुगे मारणे, बुरा ना मानो होली है.! म्हणत एकमेकांना रंग लावणे, असे उद्योग चालू असतात.

पण हल्ली असाही एक जागरूक तरुणवर्ग आहे, जो हे सगळे मेसेजेस फॉलो करून वाईट प्रकारे होळी, रंगपंचमी खेळण्याच्या पद्धतीत बदल घडू पाहतो आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीनं होळी खेळायची आहे. रंगांचा आनंद लुटायचा आहे; पण दुस-यांना त्रास देऊन नाही तर समाजासाठी काहीतरी करून. ही तरुण पिढी होळी, रंगपंचमी खेळण्याचे वेगळेच पायंडे पाडू पाहते, ही केवळ सुरुवात आहे. अजूनही होळीचं स्वरूप बदलायला वेळ आहे. त्यांच्याशी बोलताना काही वेगळ्या कल्पना पुढे येत होत्या.

आजच्या या जागरूक तरुणवर्गाला कशी साजरी करायची आहे होळी, रंगपंचमी याविषयी थोडक्यात.

होळी साजरी करणार त्यांच्यासोबत…

मी वीस वर्षाचा तरुण विद्यार्थी आहे. मला लहानपणापासून वाटायचं की कोणताही सण अशा लोकांसोबत साजरा करायचा की ज्यांच्या नशिबी ते सुख कधीच अनुभवायला आलं नाही. याबद्दल थोडासा विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की कोणत्याही सणांचं अप्रूप लहान मुलांना अधिक असतं. रस्त्यात हिंडताना अशी कितीतरी गरीब मुलं नजरेस पडायची की ज्यांना होळी, रंगपंचमी, दिवाळी, नाताळा हे सण नेमके काय असतात, त्यांचं महत्त्व काय हेच माहिती नव्हतं. बिचारी एकटीच कुठेतरी हिंडत, फिरत दुसरे सण कसे साजरे करतात हे पाहायची. दुरूनच आनंद घ्यायची. त्यांना असं पाहून माझ्याही मनात नेहमी प्रश्न यायचे यांनाही कधीतरी सण साजरे करावेसे वाटत असतीलच ना..! तेव्हा आपण त्यांच्यासोबत जाऊन सण साजरे केले तर..? पण हे सगळं डोक्यातच होतं; प्रत्यक्षात मात्र येत नव्हतं. एकेदिवशी माझ्या मित्राला मी माझा हा विचार ऐकवला, तो लगेच तयार झाला. त्यामुळे गेल्यावर्षीपासून आम्ही सण गरीब मुलांसोबत साजरे करतो. मरिन ड्राइव्ह परिसरात पाच ते सात-आठ वयोगटातली अशी छोटी छोटी मुलं आहेत. त्यांच्याशी मी आणि माझ्या मित्रांनी चांगली मैत्री केली. तेव्हापासून आम्ही ठरवलं की त्यांच्यासोबतच सण साजरे करायचे. या वर्षीपासून आम्ही आमची होळी त्यांच्यासोबतच साजरी करणार आहोत. त्यांच्यासाठी खाऊ, पुरणपोळी आणि जमल्यास नैसर्गिक रंग घेऊन जाऊ आणि त्यांच्या सोबत होळी खेळू. त्यांना या सणाचं महत्त्व पटवून देऊ. आपल्याला घर आहे, आपण सण,उत्सव आपल्या परिवारासोबत मित्र-मैत्रिणींसोबत साजरे करतो, वेगवेगळे प्लान करतो; पण यांच्यासोबत कोणीही नसतं. म्हणून मी माझ्या वयाच्या इतर तरुणवर्गालाही सांगणार आहे की तुमचा थोडासा वेळ आणि थोडे पैसे अशा मुलांसाठी देखील खर्च करा जेणेकरून त्यांच्याही जीवनात आनंद येईल. – श्रीकांत बायकर, केतन गंभीर

सणांचं करणार योग्य नियोजन

होळी, रंगपंचमी या दिवशी सुट्टी असते.अनेक तरुणाई एकमेकांना रंग लावून किंवा आणखी वेगळ्या प्रकारे होळी साजरी करत असते. पण यावर्षीपासून आम्ही ठरवलं आहे की होळी किंवा रंगपंचमी अशा प्रकारे साजरी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं. त्यामुळे आम्ही एक दिवसात पूर्ण होतील असे ट्रेक शोधले आहे. या एका दिवसात जवळचे गड-किल्ले, आदिवासी पाडे यांना भेट देऊन यायची आणि वेगळ्या प्रकारे सण साजरा करायचा. तसंही होळी किंवा रंगपंचमीमुळे प्रदूषण, पाण्याचा अपव्यय होणारच या गुन्ह्यांत आपली भागीदारी नको म्हणूनच आम्ही हा
निर्णय घेतला. – अर्चना हरमलकर

बागेत खेळणार रंगपंचमी

रंगपंचमी किंवा होळी साजरी करणं म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त नैसर्गिक रंग वापरून किंवा पाण्याचा वापर कमी करून होळी खेळावी. तरुणाई म्हटली की थोडी मज्जा-मस्ती ही होणारच. नाही नाही म्हटलं तरी थोडय़ा पाण्याचा वापर तर होणारच. म्हणून आमच्या ग्रुपनं असं ठरवलं, पाण्याची होळी खेळायची असेल तर कॉलेजच्या बागेत किंवा जिथे जास्त झाडं आहेत अशा ठिकाणी खेळायची. याचं कारण एक म्हणजे पाणी बागेत पडेल, किंवा रोपटय़ांवर पडेल, त्यामुळे पाणी वाया जाणार नाही. दुसरं म्हणजे आम्ही नैसर्गिक रंगाचा वापर करणार आहोत. नैसर्गिक रंग हे भाज्या, फळं, फुलं वापरून बनवले जातात, त्यामुळे त्यात पोषकतत्त्वे असतात. साहजिकच हे रंग अंगावरच काय पण आजूबाजूला जरी पडले तरी त्यातून कोणतंही प्रदूषण किंवा हानी होणार नाही. दुसरा विचार आम्ही असाही केला आहे की, रंगपंचमी, होळी या निमित्तानं एकमेकांना एक छोटंसं रोपटं द्यायचं आणि ते जगवायचं. कारण होळीनिमित्त अनेक झाडांची कत्तल होत असते. – लिला शिंदे, ( इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स)

बदल घडवण्याचा प्रयत्न

शाळेत असताना रंगपंचमी मी नेहमी खेळायचे. एका वर्षी त्या रंगामुळे माझ्या संपूर्ण शरीरावर अ‍ॅलर्जी झाली होती, तेव्हापासून ठरवलं की माझ्या आजूबाजूला जितके मित्र मंडळी रंगपंचमी खेळतात त्यांना सांगायचं की नैसर्गिक रंगांचा वापर करा. नैसर्गिक रंग हे रासायनिक रंगांच्या तुलनेत जरा जास्तच महाग असतात. त्या तुलनेत रासायनिक रंग कुठेही आणि अगदी स्वस्तात मिळतात, त्यामुळे शिकलेली लोकंसुद्धा कोणताही विचार न करता ते रंग खरेदी करतात. मी सायन्सची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे रासायनिक रंगात कोणती रसायनं वापरतात आणि मानवी शरीरावर त्यांचा काय परिणाम होऊ शकतो, हे मला चांगलंच ठाऊक आहे. काही रसायनांचा परिणाम संथ गतीनं होतो. लोकांना हे फारसं माहिती नसतं. त्यामुळे मी माझ्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना ते सांगण्याचा प्रयत्न करते. काही जणांना ऐकून कदाचित हे लेक्चर वगैरे वाटत असेल; पण माझा अनुभव आणि माहिती मी सांगण्याचं कर्तव्य करते. – विश्वयानी शेजवळ, रूईया कॉलेज

सोशल मीडियाचा उपयोग करणार

आज होळी आहे. पारंपरिक पद्धतीनं कित्येक ठिकाणी होळी पेटवली जाते. या होळीसाठी कित्येक झाडांची कत्तल होते, लाकूडफाटा जाळला जातो. हल्ली झाडांची कत्तल केली तर दंड होतो, त्यामुळे काही जण झाड तोडत नाही, पण झाडांच्या फांद्या गोळा करून होळी पेटवतात. ही परंपरा लगेच तर बंद होऊ शकत नाही. पण दोन-एक दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला होता की होळी पेटवताना त्यात आयुर्वेदिक कापूर घातला तर वातावरण शुद्ध होतं. त्यामुळे मी तोच संदेश सोशल मीडियाद्वारे पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूला अनेक लहान मुलं आहेत जी उद्याचं भविष्य आहेत, पाण्याचा अपव्यय न होता कशी होळी साजरी करावी हे देखील त्यांना सांगण्याचा यावर्षीपासून प्रयत्न करणार आहे.    -अंकिता राऊत,     ( राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी)

रंगपंचमी खेळण्याची पद्धत बदलली

पूर्वी आम्ही होळी खेळायचो ती म्हणजे पाण्याचा वापर करून, रसायनिक रंग वापरून. तेव्हा आपण काय करतो आहे, हे कळायचं नाही. एकमेकांच्या डोक्यात अंडी फोडणे, खूप भडक रंग अंगाला फासणे, घरातून पीठ आणून एकमेकांच्या अंगावर फासणे हे उद्योग बरेच चालायचे. यातून अन्नाची नासाडी व्हायची. नंतर कळायला लागलं की काही तासांच्या खेळासाठी आपण हजारो लिटर पाणी वाया घालवत आहोत. रंगपंचमी खेळताना पाण्याची उधळपट्टी तर होतेच; पण त्याच्यापेक्षा दुप्पट पाण्याची उधळपट्टी हे अंगावर लावलेले रंग घालवण्यासाठी केली जाते. एकीकडे महाराष्ट्रात पाण्यासाठी कित्येक लोकांना वणवण करावी लागते, पाण्यावाचून कित्येकांचे जीव जात आहेत, अशात आपण कसं र्निल्लजपणे वागू शकतो. म्हणूनच आम्ही ठरवलं या वर्षीपासून नैसर्गिक रंगानं आणि पाण्याचा वापर न करता रंगपंचमी खेळायची, कारण हे रंग अंगाला चिकटत नाहीत, झाडले तरी सहज निघून जातात. त्यामुळे पाण्याचा वापर कमी होईल. याचप्रमाणे आमच्या परिसरात देखील पाण्याचा वापर न करता होळी खेळण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. – सुशांत भोसले (महर्षी दयानंद विद्यालय)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version