Home मध्यंतर उमंग थिंक पॉझिटिव्ह!

थिंक पॉझिटिव्ह!

0

मनात दररोज चोवीस तासांत साठ हजार विचार येतात. यातील साठ ते सत्तर टक्के विचार हे नकारात्मक असतात. नकारात्मक विचारांना-सकारात्मक करणे गरजेचे असते.

सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच मनाशी युद्ध करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रसंग!

थॉमस अल्वा एडिसनने ९९९ प्रयोग केले. हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस ९९९ प्रयोग फसले, याबाबत तुला काय वाटते? थॉमस म्हणाला, ९९९ प्रयोग फसले असे म्हणू नका. ९९९ वेळा मी हे सिद्ध केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. सकारात्मक दृष्टिकोन.

नेपोलियन बोनापार्ट समुद्र किना-यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर पालथा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रद्धाळू सैनिकांना वाटलं, आपला सेनापती आडवा झाला, म्हणजे आज आपला पराभव होणार. आपली मुंडकी उडणार. सैनिक भयभीत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छाती झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युद्ध आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे तेथे आपला विजय होणार, कारण आल्या आल्या या भूमीने मला आलिंगन दिले आहे, मी तुझी आहे, मी तुझी आहे.. सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टिकोनामुळे.

टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे. जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे, त्यामुळे मन समाधानी होतं. पण, तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं. सकारात्मक दृष्टिकोन मनाला प्रसन्न करून अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो. त्यामुळे कामाला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो.

तर नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कामाची गती मंदावते, चुका होतात, हानी होते व यातूनच औदासिन्य येतं.  गौतम बुद्धांजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला, ‘भगवान, मला गावक-यांनी शिवी दिली.’ बुद्ध म्हणाले, ‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’

तो म्हणाला, ‘भगवान, नंतर त्यांनी मला मारलंसुद्धा.’ भगवान म्हणाले, ‘या मारामुळे तुला काही जखम झाली का?’, शिष्य म्हणाला, ‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’ गौतम बुद्ध म्हणाले, ‘बरं झालं, तुझा मृत्यू झाला नाही.’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुद्धांच्या चरणांजवळ बसला.

भगवान बुद्धांना हेच सांगायचे होते की, जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती, पण ती घडली नाही यामुळे समाधानी राहा. मी अस्वस्थ आहे, पण लोक माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत, असा विचार मनाची तत्कालिक अस्वस्थता ब-याच प्रमाणात नियंत्रित करतो. माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले. काही वेळा अपयश हे महान यशाचे पण, सूचक असते. म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी राहा. कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत! डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंखही आहेत!!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version