Home प्रतिबिंब दंगल पेटते तेव्हा..

दंगल पेटते तेव्हा..

1

मुझफ्फरनगर अजून धुमसतंय.. तिथल्या हिंसाचाराबद्दल, गोरगरिबांच्या संसाराच्या राखरांगोळीबद्दल, खुनाखुनीबद्दल वाचत होतो तेव्हा मनात उमटलेल्या भावनांना असं शब्दरूप आलं..

दंगल पेटते तेव्हा

होते राखरांगोळी
घरांची, काबाडकष्टांनी उभारलेल्या
संसारांची, इच्छा-आकांक्षा, स्वप्नांची
मस्त धडाडून पेटतात
झोपडया, घरे, गल्लीबोळ
छान खरपूस भाजून निघतात
जाळात भिरकावले जाणारे
अश्राप गोरगरिबांचे देह
धर्म-जातपात विचारायला
उसंत नसते..
अवघ्या देहात
असतो भिनलेला
द्वेष, विखार
डोळ्यांत धगधगणारे
लालभडक खुनी निखारे
सोडत नाहीत
लहान रांगणा-या मुलांनाही
दांडक्याला थोडेच
फुटलेल्या कवटीचे वय कळते
किंकाळ्या, आक्रोश
दाबणा-या आरोळ्यांचा
सामूहिक उन्माद
एखाद्या त्सुनामीसारखा
वस्तीवर, गावावर
कोसळतो तेव्हा
सुसाट सरावैरा
पळून जातात
भावभावना, संवेदना
पिसाट वा-यासारखा
कोलाहल फक्त अवतीभवती
आणि आपण अल्पमतात
हातातून निसटू पाहणा-या
माणुसकीला घट्ट पकडण्याच्या
खटाटोपात क्षणोक्षणी क्षीण होत..

मुझफ्फरनगर अजून धुमसतंय.. तिथल्या हिंसाचाराबद्दल, गोरगरिबांच्या संसाराच्या राखरांगोळीबद्दल, खुनाखुनीबद्दल वाचत होतो तेव्हा मनात उमटलेल्या भावनांना असं शब्दरूप आलं..

प्रशासनाने आता तिथला हिंसाचार थांबलाय असं म्हटलं असलं तरी ऑगस्टच्या शेवटच्या आठवडयात पेटलेल्या दंगलीने घेतलेल्या बळींचा आकडा ४४ वर पोहोचला आहे. या दंगलीला जातीय वा धार्मिक म्हणण्याची गरजही नाही इतक्या उघडपणे दोन समाजांमधील तेढ पद्धतशीरपणे भडकवून गेले पंधरा दिवस हा वणवा धगधगत ठेवण्यात आला होता. वणवा म्हणण्यासारखीच परिस्थिती या काळात संपूर्ण जिल्ह्यात होती. पोलिस, निमलष्करी दलांचा फौजफाटा एका ठिकाणी धावला की दुस-या ठिकाणी झुंडशाहीचा उन्माद. तिकडे लष्कराने लक्ष दिले की तिस-याच ठिकाणी हिंसाचार. आताही मुझफ्फरनगर शांत होतंय म्हणताना शेजारच्या बागपत जिल्ह्यात काहीतरी कुरबुरी सुरू झाल्या आहेत. चिघळवल्या जात आहेत.

या दंगलीचे कारण होते एका मुलीची छेडछाड. बहिणीची छेडछाड करणा-या त्या मुलाची दोन भावांनी हत्या केली आणि काही वेळाने या दोघांची त्या मुलाच्या समाजातील एका गटाने हत्या केली. छेडछाड करणारा मुलगा आणि ते दोघे भाऊ अर्थातच वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे या प्रकरणात धार्मिक रंग मिसळले गेले. ठिणगी पडली, दंगल सुरू झाली. तरीही पहिल्या दिवशी हा हिंसाचार एवढा तीव्र नव्हता. त्यात धार्मिक विद्वेषाचे जहाल तिखट मिसळले ते राजकारणी आणि धर्माध नेत्यांनी. ही दंगल भडकू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सभा, बैठकांना मनाई केली. तीनच दिवसांनी आयोजित एकोपा सभेत स्थानिक राजकीय पुढा-यांनी या प्रयत्नांवर पाणी नव्हे हिंसाचाराची आग भडकावी म्हणून आणखी तेल ओतले.

जिल्हा प्रशासनाला बाहुबलाच्या धाकावर बाजूला सारत या एकोपा सभेचा ताबा या गणंग पुढा-यांनी घेतला आणि जहाल भाषेत उपस्थितांच्या धार्मिक भावना भडकवल्या. तेव्हापासून परिस्थिती हाताबाहेर जायला सुरुवात झाली आणि भांबावलेल्या अखिलेश यादव यांच्या सरकारनेही शहामृगासारखे वाळूत डोके खुपसले. लष्कराला पाचारण करेतो दंगलीचे लोण संपूर्ण जिल्ह्यात पसरले होते, दोन्ही समाजातील माणसे मारली गेली होती, लहान मुले, महिला, म्हातारेकोतारे कुणीही या दंगेखोरांच्या तावडीतून सुटले नाहीत. अखिलेश यांच्या सरकारने पोलिस आणि निमलष्करी दलांना सक्रिय करेतो संपूर्ण जिल्ह्यात यथेच्छ धुडगूस सुरू होता.
परिस्थिती इतकी वाईट होती की काही भागांतील गावेच्या गावे तिथल्या अल्पसंख्याक समाजाने रिकामी केली. गाडग्यामडक्यांचा संसार जागेवरच सोडून शेतांमध्ये

आश्रय घेतला, गाव सोडले. अनेक गावांमध्ये दिसणारे हे चित्र जणू भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीची आठवण करून देणारे होते, असे उत्तर प्रदेशच्या एका वरिष्ठ अधिका-यानेच सांगितले होते. दोन्ही समाजांवर ही वेळ ओढवली ती राजकीय स्वार्थासाठी भडकवल्या गेलेल्या धार्मिक भावनांमुळे. भाजपची कुणी साध्वी प्राची या तर एका जाहीर सभेत तावातावाने, गळ्याच्या शिरा ताणून ‘प्रतिशोध’ घेण्याची भाषा करताना एनडीटीव्ही, इंडिया टुडे वाहिन्यांसह अनेक वाहिन्यांवरून अनेकांनी याच काळात पाहिल्या. लाल कुंकुमाने कपाळ माखलेल्या या साध्वी जाहीरपणे धार्मिक तेढ वाढवत असताना त्यांच्याच सभेत विळे-कोयते, लाठयाकाठया घेतलेल्या ‘आंधळ्या’ झुंडीचा थयथयाट सुरू होता.

हे सगळे तुम्हाला भयावह वाटत नाही का? येथे बळी गेले आहेत ते निरपराधांचे आणि त्यांची वाताहत घडवून आणणारे धार्मिक आणि राजकीय पुढारी सुरक्षित आहेत. त्यांना कायद्याने अद्याप तरी बोट लावलेले नाही. मुजफ्फरनगरमध्ये बाजारपेठा, शाळा-कॉलेज, दैनंदिन व्यवहार गेले पंधरा दिवस बंद आहेत, गाव-घरदार सोडून दोन्हीकडचे सर्वसामान्य देशोधडीला लागले आहेत.

निवडणुका येऊ घातल्या आहेत म्हणून ही दंगल उत्तर प्रदेशसारख्या मोठय़ा राज्यात भडकवण्यात आली, जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशा देशाच्या अनेक भागांत, राज्यांत जातीय-धार्मिक तणाव वाढवण्याचे प्रयत्न होतील, दंगली घडवून आणल्या जातील, असे राजकीय निरीक्षकांचे, अभ्यासकांचे मत आहे. आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही असाच इशारा नुकताच दिला आहे. या जाणत्या मंडळींनाही असेच वाटत असेल तर हे सारेच भयसूचक आहे.

रुपयाचे अवमूलन होत असताना, मंदीमुळे अर्थव्यवस्था ढेपाळली असताना, जमा कमी आणि खर्च हाताबाहेर अशी जनतेसकट देशाचीही अवस्था झाली असताना, देशाला जातीय दंगलींच्या वणव्यात लोटून राजकीय स्वार्थाची पोळी भाजू पाहणा-या मंडळींची कारस्थाने यशस्वी झाली तर माणुसकीवर, धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असणा-या, शांतपणे जगू पाहणा-या ‘अल्पसंख्याकांनी’ काय करायचे?

कोण देणार याचे उत्तर?

1 COMMENT

  1. अगदी मनातले लिहिलेत. एका भयाण पोकळीकडे जाणारी अवस्था धार्मिक तणावातून निर्माण होताना दिसते आहे. आम्हा वाचकांना याची जाणीव करून दिल्याबद्दल आपला आभारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version