Home प्रतिबिंब दत्तकांचे अनाथालय!

दत्तकांचे अनाथालय!

5

ज्यांना मूल दत्तक घ्यायचे आहे, त्यांनी अनाथालयात अर्ज केलेत. सगळ्या अटींची पूर्तता केल्यावरही मूल मिळालं नसलेल्या जोडप्यांची संख्या आहे एक हजार. हे मूल मिळालं असतं तर त्या हजार जोडप्यांची घरं मुलांच्या हसण्या-रडण्याने गजबजली असती. तेवढयाच अनाथ मुलांच्या आयुष्याला आकार देणारी मायेची ऊब मिळाली असती; पण ती हजार जोडपी तीन वर्षापासून ताटकळत बसली आहेत..लहान मुलांनी आपलंही घर फलावं-फुलावं, अशी स्वप्नं सा-यांचीच असतात. पण अनेकांना काही कारणांमुळे ही स्वप्न सजवता येत नसतात. त्यांना अपत्य होत नाही. त्यासाठी अनाथ मुलाला दत्तक घ्यावं आणि आपलंही घर मुलाच्या हसण्या-रडण्याच्या आवाजानं भारून जावं, असं काही दाम्पत्यांना वाटतं. अशी दाम्पत्य आपल्याला मूल दत्तक घ्यायचं आहे, असा अर्ज अनथालयात करतात. त्या मुलालाही आई-वडिलांपासून न मिळालेलं प्रेम मिळणार असतं. त्या दाम्पत्यालाही मुलाच्या कौतुकात रमायचं असतं. दोघांचीही गरज सारखीच. ती गरज पूर्ण करणारी मध्यस्थ संस्था असते अनाथालय. पण या अनाथालयातून मूल दत्तक मिळवण्यासाठी तब्बल एक हजार दाम्पत्ये ताटकळली आहेत.

आई-वडिलांच्या मायेचं पांघरूण मिळावं असं प्रत्येक मुलाला वाटत असतं. असंख्य बालकांना मात्र या प्रेमापासून, मायेपासून वंचित राहावं लागतं. बालसुधार गृहात किंवा अनाथालयात बालपण घालवावं लागतं. कुणी मायबाप आपल्या पोटच्या गोळ्याला जन्मता:च नाकारतात. त्याला कुठेतरी उकीरडयावर, रेल्वेस्थानकावर, बसस्थानकावर, रुग्णालयात सोडून देतात. अशी मुलं कुणाला तरी दिसतात. त्यांना पोलिसांत दिलं जातं. कायदेशीर कारवाई करून ती मुलं पालन-पोषण करणा-या अधिकृत स्वयंसेवी संस्थांकडे दिली जातात. काही दुर्घटनांमध्ये लहान मुलांचे आई-वडील मृत्युमुखी पडतात. त्या एकाकी पडलेल्या मुलांनाही अशाच संस्थांकडे पाठवलं जातं. या संस्था मुलांची काळजी वाहतानाच ज्या जोडप्यांना मूल दत्तक पाहिजे असते, त्यांना देतात. अर्थात त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करून. अशी प्रक्रिया पूर्ण करणारी अनेक जोडपी रांगेत आहेत, पण त्यांना मूल मिळत नाही. ही मुलं दत्तक देताना भारतीय जोडप्यांना प्राधान्य देण्याऐवजी विदेशी नागरिकांकडून मोठी देणगी मिळण्याच्या अपेक्षेने प्राधान्य दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या बालकांसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थांची अपेक्षापूर्तीची ही हाव बरी नव्हे.

भारतीय समाजव्यवस्थेत वेगवेगळ्या कारणांनी मुलांचा कोंडमारा होत असतो. एक आई बाळाला जन्म देते आणि रुग्णालयातून पळून जाते. एखादी माता बाळंत होते आणि मूल उकिरडयावर फेकून देते. पसार होते. तिचा शोध घेतल्यानंतर ती सापडत नाही. ते मूल रडतं आणि आवाजाच्या दिशेने समाजमन धाव घेते. मूल उकिरडयावर टाकण्याची ही क्रूर मानसिकता असतानाच, दुसरीकडे एखाद्या जोडप्याला मूल पाहिजे असतं; पण त्यांना मूल होत नसतं. जे विज्ञान समजू शकतात, ते दाम्पत्य मूल न होण्याची कारणं शोधतात. मुलाला जन्म देणं आपल्या हातात नाही, हे कळल्यावर सामजस्यानं मूल दत्तक घेण्याचा मार्ग स्वीकारतात. याच मूल न होण्याच्या कारणावरून काही रूढीवादी माणसं एकमेकांवर दोषारोप ठेवत आयुष्यभर झगडत राहतात. काही जण स्वत: वैद्यकीय तपासणी न करताच पत्नीला दोष देऊन तिचा छळ करतात. अशी विचित्र अवस्था समाजात पाहायला मिळते. मूल न होण्याची कारण वैद्यकीय तपासणीतून सिद्ध झाल्यानंतर त्यात अडून बसण्यात काहीही तथ्य नसतं. हे समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्याकडे असते, त्यांचा जगण्याचा मार्ग सुकर होतो, जे मूल झालेच पाहिजे, ते होत नसल्याचे आरोप एकमेकांवर लादतात, त्यांचं आयुष्य भांडणातच खर्ची जातं.

भांडणाचे दूरगामी परिणाम आपल्या जगण्यावर होत असतात. ती भांडणं टाळून अनेक दाम्पत्यांनी आपला संसार फुलवण्यासाठी मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्या दाम्पत्यांना अनाथालय चालवणा-या संस्थांनी ताटकळत ठेवणं, प्रतीक्षा करायला लावणं चुकीचं आहे. त्यांनी सर्व अटींची, कागदपत्रांची पूर्तता केली असल्यास त्यांना मूल दत्तक देण्यास हयगय करू नये. त्यांच्या सुखात त्या मुलांचा आनंद आहे, हे अनाथालय चालवणा-या संस्थांनी विसरू नये. मूल देण्यात टाळाटाळ करणा-या अशा स्वयंसेवी संस्थांवर कारवाई करून, त्यांच्या लुबाडणुकीला आळा घातला पाहिजे.

अनाथालयात राहणा-या मुलांचे जसजसे वय वाढते, तसतसे त्यांचे बालपणही कोमेजून जाते. त्या फुलांना कोमजण्यापूर्वी त्यांना मायेची ऊब देणा-यांच्या कुशीत दिले पाहिजे. एक हजार जोडप्यांचे हात मुलाला कुरवाळण्यासाठी आसुसलेले असताना, त्यांच्या या स्वप्नांना भंग करण्याचा क्रूर डाव कुणी मांडू नये.

5 COMMENTS

Leave a Reply to Krishna Rambhau Matale Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version