Home प्रतिबिंब चर्चेतला चेहरा सन्मान संस्कृती जोपासू या!

सन्मान संस्कृती जोपासू या!

1

‘मुझको थोडा लिफ्ट करादे’ म्हणत भारतात स्थायिक झालेला अदनान सामी हा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. त्याच्या व्हिसाची मुदत संपली असली तरी तो गेल्या दोन महिन्यांपासून भारतात आहे. त्याला भारत सोडून जाण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट विभागाने दिले आहेत. अदनान हा पाकिस्तानी असल्याचे नेहमी सांगितले जात असले तरी त्याचा जन्म इंग्लंडमधला आहे. वडील पाकिस्तानी व आई भारतीय होती. अदनानने भारतीय शास्त्रीय संगीताचाही चांगला अभ्यास केला आहे. जगात भारतीय शास्त्रीय संगीत व पाश्चात्त्य संगीताचा अभ्यास असलेल्या काही मोजक्या कलाकारांमध्ये त्याचा समावेश होतो. अदनानने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्येही काम केलेले आहे. भारतात मात्र त्याला प्रचंड प्रसिद्धी व यश लाभले. असे असले तरी आतापर्यंत त्याच्या बोलण्या-वागण्यातून भारताविषयी त्याच्या मनात कधीही चुकीच्या भावना असल्याचे दिसून आले नाही. भारतात त्याला जे मिळाले त्याविषयीची कृतज्ञतेची भावना त्याच्या बोलण्यातून नेहमीच जाणवत असते. भारतीय कलाकारांबरोबरही त्याचे मैत्रीचे संबंध आहेत. अशा वेळी केवळ त्याचा व्हिसा संपला असल्याचे कारण देत त्याचा सार्वजनिक अपमान करण्याचे कोणतेही कारण दिसून येत नाही. अदनान सामीचे जीवन अनेक वादळांनी भरलेले आहे. वैयक्तिक आयुष्यात त्याने अनेक चढउतार पाहिलेले आहेत. असे असतानाही त्याची भारतीय संगीतावरच्या निष्ठेविषयी शंका उत्पन्न होईल, असे कधी घडले नाही. एक कलाकार म्हणूनही तो कायम विनम्र राहिल्याचेच दिसून आले आहे. कधीही कोणत्याही वादग्रस्त विधानासाठी तो ओळखला जात नाही. माध्यमांमध्येही एक संवेदनशील व्यक्ती असाच त्याचा प्रभाव राहिलेला आहे. अदनानने आपल्या अनेक व्यक्तिगत गोष्टींतही लोकांना नेहमी सहभागी करून घेतले आहे. आपल्या मुलाला पंधरा वर्षानंतर तो भेटला तेव्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडला होता. एखादा कलाकार आपल्या देशाव्यतिरिक्त इतर देशात अधिक लोकप्रिय होण्याच्या घटना काही नव्या नाहीत. संगीताला कोणत्याही जाती-धर्माचे, प्रांताचे बंधन नसते. भारताचे व पाकिस्तानचे शत्रुत्व हे वेगळ्या पातळीवरचे आहे. त्याचे उपाय वेगळे आहेत. त्याचा व संगीताचा असा संबंध लावणे योग्य होणार नाही. स्वत: अदनाननेही त्याविषयी साधी नाराजीही व्यक्त केलेली नाही. त्याचा व्हिसा संपणे हे टेक्निकल कारण समोर करून, त्याला भारत सोडून जाण्यास सांगण्यासाठी शासकीय यंत्रणा आहे. त्याचे राजकारण होऊ नये, कलावंत कुठलाही असो, त्याला सन्मान देणे आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीला तडा जाऊ नये.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version