Home महामुंबई दादर-माटुंग्यातील इमारती ‘हेरिटेज’मधून न वगळल्यास राजीनामा

दादर-माटुंग्यातील इमारती ‘हेरिटेज’मधून न वगळल्यास राजीनामा

0

दादर-माटुंगा भागातील इमारतींवरील हेरिटेज टॅग १५ ऑगस्टपूर्वी न काढल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, असा इशारा काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी दिला आहे. 

मुंबई – दादर-माटुंगा भागातील इमारतींवरील हेरिटेज टॅग १५ ऑगस्टपूर्वी न काढल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, असा इशारा काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी दिला आहे. तसेच दादर-माटुंगा रेसिडेंट्स असोसिएशनतर्फे १५ ऑगस्टपासून वडाळा येथील फाइव्ह गार्डन येथे धरणे आंदोलन करण्यात येईल, असेही कोळंबकर यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

दादर-माटुंगा भागात अनेक जुन्या इमारती असून, त्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र हेरिटेजमुळे दुरुस्ती करणे शक्य नसून, रहिवाशांचा जीव टांगणीला आहे. रहिवाशांचा विचार करत दादर-माटुंगा विभागातील इमारतींवरील हेरिटेज टॅग काढण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांतर्फे करण्यात येत आहे.

या भागातील इमारतींचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, यासाठी महापालिका आयुक्त, मुख्य सचिव व कायदे सचिव यांच्याशी चर्चा करू, असा निर्वाळा विधान परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी दिला आहे.

तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता व काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनीही १५ ते २० दिवसांत या प्रकरणी मार्ग काढला जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र १५ ऑगस्टपर्यंत या भागातील प्रश्न मार्गी न लागल्यास जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोळंबकर यांनी दिला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version