Home संपादकीय तात्पर्य ‘स्वाभिमान’चे दातृत्व

‘स्वाभिमान’चे दातृत्व

1

मुंबईत वास्तव्याला असलेल्या आणि गणपतीच्या सणासाठी हमखास गावी जाणा-या कोकणवासीयांना ब-याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या वर्षी रेल्वेच्या आरक्षणाची गत कशी झाली हे माहीतच आहे. मुंबईतली हे नोकरदार कोकणवासी वर्षातून एकदा या सणाला आवर्जून गावाकडे जातात. कोकण रेल्वे त्यांच्यासाठी अत्यंत माफक दरात आणि कमीत कमी वेळेत सोडणारे माध्यम. परंतु आरक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा निरक्षर लोकांना त्याचा फटका बसतो. रेल्वे चुकली तर खासगी बस वाहतूकदार अशा अडल्या नडल्या प्रवाशांची मोठी लूटमार करतात. त्यांच्याकडून मनमानी करून मोठी रक्कम उकळतात. अशा या सा-या लुटालुटीच्या आणि निराशेच्या वातावरणात स्वाभिमान संघटनेने कोकणवासीयांना आश्चर्यकारकरित्या सवलतीची घोषणा जाहीर केली आहे. स्वाभिमानचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांनी २४ ते २८ ऑगस्टच्या दरम्यान ७२ बसगाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. २४, २५ आणि २६ ऑगस्ट असे तीन दिवस आठ बसगाड्या सोडल्या जातील, तर २७ आणि २८ असे दोन दिवस दररोज २४ बसगाड्या सोडल्या जातील. कोकणवासीयांची अडचण विचारात घेऊन स्वाभिमान संघटनेने यातल्या प्रत्येक गाडीतून कोणत्याही गावी जाणा-या व्यक्तीला फक्त १०० रुपये आकारले जातील, असे जाहीर केले आहे. गाव लांब असो की जवळ असो, १०० रुपयांत गणपतीच्या सणाला घराकडे जाता येईल. एवढेच नाही तर गावाकडे जातानाचे तिकीट काढताना परतीच्या प्रवासाचीही केवळ नोंद केली तरी त्याच १०० रुपयांत या प्रवाशाला परत मुंबईतसुद्धा येता येईल. म्हणजे १०० रुपयांत जाणे आणि येणे दोन्हीकडचा प्रवास होईल. ही अभूतपूर्व सवलत आहे. मात्र परत येतानाची नोंद करणे गरजेचे आहे. २१ तारखेला या प्रवासाची नोंद सुरू होईल. त्याची ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत आणि या योजनेला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आणखी गाड्या सोडण्यात येतील, असे नितेश राणे यांनी जाहीर केले आहे. त्यांनी जाहीर केलेल्या या योजनेबद्दल कोकणवासी त्यांना दुवा दिल्याशिवाय राहणार नाहीत. या योजनेतील प्रवास कुठलाही असो, त्याला १०० रुपयेच आकारणे कसे परवडते, असा प्रश्न कोणालाही पडेल. पण नितेश राणे यांनी त्या पैशाचा विचारच केलेला नाही, त्यांनी फक्त सोयीचाच विचार केलेला आहे आणि या प्रवासात जो काही कमी-जास्त खर्च होईल तो स्वत:च्या पदरून खर्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यातून मिळणा-या प्रत्येक प्रवाशामागचे १०० रुपये हे एकत्रित केले जाणार असून त्यातून एक निधी उभारून कोकणवासीयांना निरनिराळ्या पद्धतीने मदत दिली जाणार आहे. या योजनेचे स्वरूप पाहिल्यानंतर तिला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल, अशी खात्री वाटते.

1 COMMENT

  1. माननीय श्री. नितेश राणे साहेबांनी आता पर्यंत जो काही विषय उचला आहे, तो नेहमी तरुणांच्या थेट हृदया नेहमीच अग्रेसर राहिला आहे.कोकणाचा विकास हा श्री.नारायण राणे साहेबांमुळेच शक्य झाला आहे.श्री निलेश राणे साहेबां सारखे आणि तुमच्या सारखे व्यक्तीमत्व आम्हाला आणि कोकणाला लाभले आहे हे आमचे भाग्य आहे.
    मुंबईतला मोठा तरुण वर्ग हा तुमच्या सोबत नेहमी होता, नेहमी राहिल आणि नेहमी असणार.
    !आम्हाला गर्व आहे तुम्ही आमच्या सोबत असल्याचा.!
    जय स्वाभिमान!
    सिद्धेश बावकर
    परळ-शिवडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version