Home महाराष्ट्र कोकण दापोलीतील १६ इमारतींना ‘रेड अ‍ॅलर्ट’

दापोलीतील १६ इमारतींना ‘रेड अ‍ॅलर्ट’

0
संग्रहित छायाचित्र

मोठया शहरांमधील रहिवासी इमारत दुर्घटनेच्या प्रकरणानंतर आता दापोली नगरपंचायतही अ‍ॅलर्ट झाली आहे. 
दापोली– मोठया शहरांमधील रहिवासी इमारत दुर्घटनेच्या प्रकरणानंतर आता दापोली नगरपंचायतही अ‍ॅलर्ट झाली आहे. दापोली शहर व बाजारपेठ परिसरातील अत्यंत जुन्या व कोणत्याही क्षणी धोका पोहोचतील अशा एकूण १६ इमारती पूर्णपणे पाडून टाकाव्यात अथवा रिकाम्या कराव्यात अशा स्वरूपाचा ‘रेड अ‍ॅलर्ट’ देणा-या नोटिसा न. पं. च्या बांधकाम विभागाकडून बजावण्यात आल्या आहेत. न. पं. चे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता व कर्मचा-यांनी केलेल्या पाहणीनंतर या इमारतींना ‘रेड अ‍ॅलर्ट’ बजावण्यात आला आहे. मात्र या नोटिसा बजावण्यात आल्यानंतरही अनेक कुटुंब धोक्याच्या छायेखालीच राहात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दापोली शहरात काही भागात व बाजारपेठ परिसरात काही इमारती धोकादायक अवस्थेत असून, त्या कोणत्याही क्षणी कोसळतील अशा स्थितीत असल्याचे नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाला आढळून आले आहे. ज्या इमारती दुरुस्तीसाठी अथवा धोकादायक अवस्थेत असल्याने पाडून टाकण्याच्या अवस्थेत आल्या आहेत अशा एकूण सुमारे ५० इमारतींची नोंद नगरपंचायतीने केली आहे. धोकादायक इमारतींचे अद्याप ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले नसले तरी या इमारती जुन्या व जीर्ण झाल्याने धोका असल्याचा प्राथमिक निष्कर्षाप्रत येऊन या इमारतींना महाराष्ट्र नगर परिषदा व नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ (१) मधील तरतुदीनुसार या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती नगरपंचायतीच्या माहितगारांनी दिली. शहर बाजारपेठ परिसरातील काही इमारती सुमारे शंभर वर्ष जुन्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या नोटिसीमध्ये धोकादायक पडायला आलेल्या इमारतींमधून आपले सामान व कुटुंबीय यांना अन्यत्र स्थलांतरीत करावे व ही धोकादायक पडायला आलेली इमारत त्वरीत पाडून टाकावी, असा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. लवकरच काही इमारतींची दुरुस्ती आवश्यक असल्याने तशी वर्गवारी करून दुरुस्तीसाठी आवश्यक त्या सूचना देणा-या नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बी. सी. गावीत यांच्याकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या धोकादायक इमारतींमध्ये पुढील इमारतींचा समावेश आहे. विकास मधुसुदन देवळेकर १७/२ व इतर बाजारपेठ, विजय लक्ष्मण पवार व इतर ३०४/२ कोकंबाआळी, संतोष फुलचंद मेहता ३१/३ व इतर बाजारपेठ, शहीद अली चांदमियाँ डिमटीमकर २७५/३ मच्छीमार्केट, इब्राहिम हुसेन चिकटे १६१/२, दिलीप प्रभाकर वालावलकर ४२/२ पैकी पोस्टआळी, रंजना रामकृष्ण घाडगे २६३/३ डॉ. काणे हॉस्पिटलजवळ यांच्यासह १६ इमारतींचा समावेश असल्याची माहिती न. प. कार्यालयाकडून देण्यात आली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version