Home क्रीडा दिल्ली, गुजरातमध्ये ‘फायनल’

दिल्ली, गुजरातमध्ये ‘फायनल’

0

विजय हजारे वनडे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दिल्ली आणि गुजरात संघ भिडतील. उपांत्य फेरीत शनिवारी दिल्लीने हिमाचल प्रदेशचा ६ विकेट आणि ५३ चेंडू राखून पराभव केला.

बंगळूरु/अलुर- विजय हजारे वनडे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दिल्ली आणि गुजरात संघ भिडतील. उपांत्य फेरीत शनिवारी दिल्लीने हिमाचल प्रदेशचा ६ विकेट आणि ५३ चेंडू राखून पराभव केला. अन्य लढतीत गुजरातने तामिळनाडूवर ३१ धावांनी विजय मिळवला. दिल्लीच्या विजयात उन्मुक्त चंद चमकला. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने गुजरातची आगेकूच कायम ठेवली.

पहिल्या उपांत्य लढतीत दिल्लीने हिमाचल प्रदेशचे २०१ धावांचे आव्हान ४१.१ षटकांत ४ विकेटच्या बदल्यात पार केले. ‘वनडाऊन’ उन्मुक्त चंदच्या झटपट ८० धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर दिल्लीला विजय मिळवताना फार प्रयास पडले नाहीत.

चंदच्या ८६ चेंडूंतील खेळीत ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. उन्मुक्तला सलामीवीर शिखर धवनची (३९) चांगली साथ लाभली. हिमाचल प्रदेशने तब्बल ७ गोलंदाज वापरले. मात्र रोनित मोरे, बिपुल शर्मा आणि निखिल गंगटालाच (प्रत्येकी १ विकेट) यश मिळाले. उन्मुक्त चंदला सामनावीर घोषित करण्यात आले.

हिमाचल प्रदेशच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आले तरी दिल्लीच्या गोलंदाजांनी प्रतिस्पध्र्याना ५० षटकांत (९ बाद) २०० धावांत रोखले. सुबोध भटी, पवन नेगी आणि नितीश राणाने (प्रत्येकी एक विकेट) ठराविक अंतराने हिमाचल प्रदेशच्या विकेट घेतल्या. कर्णधार बिपुल शर्मा (५१) आणि प्रशांत चोप्रामुळे (३३) त्यांना द्विशतकी मजल मारता आली.

अलुरमध्ये झालेल्या दुस-या उपांत्य लढतीत गुजरातच्या २४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलच्या (४३-६) अचूक मा-यासमोर तामिळनाडूचा डाव ४७.३ षटकांत २१७ धावांत संपला.

सलामीवीर अभिनव मुकुंदने (१०4) एकाकी लढत देताना नाबाद शतक ठोकले. मात्र अन्य सलामीवीर दिनेश कार्तिक (४१) त्याला अन्य सहकाऱ्यांची साथ लाभली नाही. कसोटीपटू मुरली विजय खातेही खोलू शकला नाही. अप्रतिम गोलंदाजी करणा-या अक्षरला (१०-१-४३-६) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

तत्पूर्वी, गुजरातचीही सुरुवात खराब झाली. कर्णधार आणि सलामीवीर पार्थिव पटेल डावातील तिस-या चेंडूवर खाते न खोलता बाद झाला. मात्र मधल्या फळीतील चिराग गांधी (७१) आणि मनप्रीत जुनेजाच्या (७४) दमदार फलंदाजीमुळे गुजरातला ८ बाद २४८ धावा असे चांगले आव्हान उभे करता आले. तामिळनाडूतर्फे ऑफस्पिनर आर. अश्विनने तीन दोन विकेट घेतल्या.

अंतिम फेरी सोमवारी

विजय हजारे वनडे ट्रॉफीची ‘फायनल’ सोमवारी (२८ डिसेंबर) दिल्ली आणि गुजरातमध्ये होईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version