Home कोलाज भारतीयांना लाज कधी वाटेल?

भारतीयांना लाज कधी वाटेल?

1

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१५च्या अहवालात भारतात सर्वाधिक क्षयरोग रुग्ण असल्याचे म्हटले आहे. खरे तर महासत्तेच्या गप्पा मारणा-या भारतावर हा मोठा ठपका आहे. मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आणि भारतीयांच्या आरोग्य आणि स्वच्छतेविषयक दुर्गुणांमुळे सगळया भारताला याची लाज वाटली पाहिजे; पण भारतीयांना लाज कधी वाटणार? कारण निदान लाज वाटली तरी तिथून पुढे नव्याने वाटचाल करता येईल. चुका सुधारता येतील.

जगातून प्लेग, क्षय, मलेरिया, डेंग्यू यांसारखे पारंपरिक रोग विकसित देशांतून हद्दपार झाले असताना भारतात हे रोग आजही ठाण मांडून आहेत आणि ते नुसतेच ठाण मांडून नाहीत तर क्षयरोग्यांची संख्या भारतात जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१५च्या अहवालात ही बाब समोर आली आहे. जगातील २२ देशांना क्षय रोगाने वेढा घातला असून त्यात भारतात क्षय रुग्णांची संख्या मोठी आहे.

गेल्या काही दशकांपासून वैद्यकशास्त्राने प्रगती केल्यामुळे प्लेग, क्षय, मलेरिया, डेंग्यू यासारखे पारंपरिक रोग विकसित देशातून पूर्णपणे हद्दपार झाले आहेत. वैद्यकशास्त्राच्या प्रगतीबरोबरच चांगली आहार, विहार पद्धत, शारीरिक-मानसिक व्यायाम, मुबलक प्रमाणात मिळणा-या सोयी-सुविधा, चांगले राहणीमान आणि जीवनशैली, शिस्त आणि व्यक्तिगत-सामाजिक जबाबदारी यामुळे पाश्चिमात्य देशांनी आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

भारत नेहमी युरोप आणि अमेरिकन संस्कृतीचे अनुकरण करत आला आहे. त्यांच्या चालीरिती, वेश, खाणे-पिणे उसने घेतो; पण शिस्त आणि जबाबदारी मात्र उसनीही घेत नाही. भारताची प्रतिमा जागतिक पातळीवरचा एक सुदृढ आणि आर्थिकदृष्टया बलशाली देश म्हणून होत आहे. निदान असे म्हटले जाते.

बढाया मारणारे संस्कृतीरक्षक आणि राजकारणी असे नेहमीच म्हणत असतात आणि कसेही जगण्याची सवय बनलेल्या भारतीयांचा अहंकार यामुळे विधानांमुळे सुखावत राहतो. आरोग्याच्या सोयी-सुविधा आणि वैद्यकीय सुविधा मिळूनही सवयी न बदलल्यामुळे प्लेग, क्षय, मलेरिया, डेंग्यू हे रोग-आजार वारंवार डोके वर काढत असतात.

कधी सुरत तर कधी उत्तर प्रदेश, बिहार असे राज्य मात्र वेगवेगळे असते. त्याला भारतीयांच्या आरोग्य आणि स्वच्छतेविषयीच्या सवयी कारणीभूत आहेत. या सगळयाला भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या, स्वच्छतेच्या सवयी आणि सामाजिक भानाचा अभाव या गोष्टी कारणीभूत आहे.

जलप्रदूषणामुळे वर्षाला तीन कोटी भारतीय आजारी पडतात, असे केंद्रीय मंत्र्याने संसदेत अलीकडेच सांगितले. या जलप्रदूषणाला देशातील धार्मिक पर्यटन, रासायनिक प्रदूषण कारणीभूत आहे. आज शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणाईला हातात अत्याधुनिक असा स्मार्ट फोन लागतो. सगळयाच गोष्टी आधुनिक लागतात.

पण धार्मिक कर्मकांडेही सुरू असतात. धार्मिक आणि रासायनिक प्रदूषण प्राणघातक असल्याचे माहीत असूनही त्याविरोधात ते एकत्र येत नाहीत. धार्मिक पर्यटनावेळी होणारे नद्यांचे प्रदूषण अनेक साथीच्या आजारांचे कारण ठरते. त्वचेपासून पोटाच्या विकारांपर्यंत सगळया गोष्टी घडतात.

मुंबईचे उदाहरण घेतले तर मुंबईसारख्या मोठया महानगरात देशभरातून आलेले लोक आपल्या सवयी आणि परंपरांनुसारच जगू पाहतात आणि मुंबईच्या बकालपणात भर टाकतात. शहरातील श्रीमंत असो की, गरीब कचरा टाकणे, थुंकणे, पान-तंबाखू खाऊन थुंकणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे या सगळया गोष्टी राजरोसपणे सार्वजनिक ठिकाणी होत असतात. ही मुंबईची स्थिती आहे तर मग निमशहरी आणि ग्रामीण भागाची स्थिती किती बिकट असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.

शहराच्या बकालपणाबरोबरच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. अतिगरीब लोक जे शहरात झोपडयांमध्ये आणि ग्रामीण भागात राहतात ते सगळयाच विधी घराबाहेर करतात. या सगळयामुळे घाण वाढते आणि या घाणीमुळेच प्लेग, क्षय, मलेरिया, डेंग्यू हे साथीचे रोग-आजार आजही ठाण मांडून आहेत.

क्षयावर उपचार सुरू करणा-या डॉक्टरांना त्याची लागण होते आणि त्यात त्यांचा मृत्यूही होतो, हे त्याहून भयंकर आहे. लोकांना चांगल्या सोयी-सुविधा दिल्या तरी चांगल्या आहार, विहाराचा अभाव, चांगल्या आरोग्यविषयक सवयी आणि स्वच्छतेच्या अभावी आजही ही रोगट परंपरा सुरू आहे.

गेल्या काही वर्षात भारतीय औषध निर्मिती कंपन्यांबरोबर परदेशी कंपन्यांनीही भारताकडून मोठया प्रमाणात नफा कमवायला सुरुवात केली आहे. आज भारत ही प्रत्येक क्षेत्रासाठी एक मोठी बाजारपेठ आहे. तशी ती औषध निर्मिती कंपन्यांसाठीही मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून त्यांना सगळयात जास्त नफा मिळतो. या औषध निर्मिती कंपन्यांच्या नफ्याला भारतीयांच्या आरोग्यविषयक आणि स्वच्छतेविषयक सवयीच कारणीभूत आहेत.

भारतीय माणूस शहरी असो की, ग्रामीण त्याला स्वच्छतेचे, आरोग्याचे महत्त्व वाटत नाही आणि पटतही नाही. मोबाईल, घरात केबल, डिश टीव्ही, अत्याधुनिक टीव्ही संच, अत्याधुनिक फ्रिज, अशा सगळयाच गोष्टी अत्याधुनिक असतात आणि मानसिकता मात्र बेफिकीर आणि बेजबाबदारीची असते.

आजचा दिवस साजरा केला की झाले, अशी त्यांची अवस्था असते. हीच त्यांच्या जगण्याची पद्धतही झाली आहे. त्यांना ना इतिहासाची फिकीर ना भविष्याचा वेध घेण्याची तळमळ आणि जे काही मोजके लोक सार्वजनिक हिताचे नियम पाळतात, सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याचा विचार करतात त्यांना वेडयात काढले जाते. त्यांना मूर्ख ठरवतात आणि समजतात. विचार करणारे आणि आचरणात आणणा-या अशा व्यक्ती संख्येने कमी असल्या तरी त्यांच्या चांगल्या आचार-विचारांचा फायदा हा समाजाला होत असतो, हे ते सोयीस्करपणे विसरतात.

अलीकडे न्यायालयाच्या दणक्यानंतर जेनेरिक औषधांची दुकाने उघडली असली तरी त्यांची संख्या खूप कमी आहे. त्याची संख्या वाढवता आली तर अतिगरीब आणि गरिबांना जी औषधे घेणे पैशाअभावी शक्य नसते आणि ती खर्चिक असतात म्हणून ती घेण्यास टाळाटाळ करतात, ती करणार नाही आणि औषधे घेतली जातील.

व्यक्तिगत आणि सामाजिक शिस्त आणि जबाबदारीमुळे भारतानंतर स्वातंत्र्य मिळालेले देश आज फक्त या दोन गुणांच्या जोरावर जागतिक पातळीवरील समृद्ध देश बनले आहेत. भारतीयांनी आपल्या सवयी आधुनिक समाज आणि संस्कृतीबरोबर जुळवून घेत बदलल्या पाहिजेत तरच जागतिक स्पर्धेत भारत एक समाज आणि संस्कृती म्हणून टिकू शकेल आणि पुढे जाऊ शकेल.

देशावर आजही पारंपरिक रोग ‘जपून’ ठेवणारा सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला देश म्हणून ठपका लागतो आणि तरीही ही गोष्ट आपल्याला लाजीरवाणी वाटत नाही. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि ज्या पालिका, महापालिकांवर आरोग्याच्या सोयी-सुविधा पुरवण्याची, देखभालीची जबाबदारी असते त्यांनीही ती योग्य प्रकारे पूर्ण केली पाहिजे.

व्यक्ती ही समूहाने जगते, विकसित होते. तिचा विकास अधिक सदृढ आणि टिकून राहण्यासाठी त्याच प्रकारच्या आचार आणि विचारांचा समाज आणि समूह आजूबाजूला लागतो. भारताची लोकसंख्या ही नुसतीच लोकसंख्या झाली तर त्याच्याकडे ना कौशल्य असेल ना स्वावलंबन ना स्वाभिमान. अशी लोकसंख्या जगासाठीही डोकेदुखी ठरेल. अशी लोकसंख्या केवळ झुंडशाहीच्या इशा-यावर नाचत बसेल. त्यांचे जगणे हे सामाजिक हितासाठी न होता त्यांच्याकडून उपद्रवमूल्याचे काम करून घेतले जाईल जे आजही घडत आहे.

समाजात राहताना सगळया घटना या क्रिया आणि प्रतिक्रिया अशा प्रकारे एकमेकांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे एखाद्या घटनेला स्वतंत्र असे महत्त्व देता येऊ शकत नाही. त्या घटनेचा व्यक्ती आणि समाज असाच जोडून विचार करणे आवश्यक आहे. भारतीय समाजाची सांस्कृतिक, आध्यात्मिक विविधता आणि परंपरा खूप मोठी आहे. ती तशीच टिकून राहावी, अशी इच्छा असेल तर भारतीय सांस्कृतिक घटकांची वाटचाल ही शिस्त आणि जबाबदारीनेच व्हायला हवी.

भारतीयांनी हे गुण आत्मसात केले नाहीत तर भविष्यात काही वर्षानंतर जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या अहवालात भारताचे नाव सर्वाधिक क्षयरोगी असलेला देश असा पुन्हा होईल. तो तसा होऊ नये, असे वाटत असेल तर आज भारतीय समाजाला, राजकीय पुढा-यांना आणि तरुणांना आज या जागतिक अहवालाबद्दल लाज वाटली पाहिजे. कारण लाज वाटली तर पुढे सुधारणा करता येईल. पुढची वाटचाल योग्य मार्गाने करता येईल. भारतीयांना आपल्या सामाजिक अस्वच्छतेविषयी, असंवेदनशीलतेबद्दल, सवयींबद्दल लाज वाटेल तो सुदिन ठरेल!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version