Home संपादकीय तात्पर्य दुपदरीकरणाचा प्रवाशांनाच फायदा

दुपदरीकरणाचा प्रवाशांनाच फायदा

0

एमयूटीपी-३ या योजनेंतर्गत केंद्र सरकारने पनवेल-कर्जत या मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे ठरवले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून उपनगरी गाडय़ा धावू लागतील. सध्या कल्याणमार्गे जाणा-या गाडय़ांपैकी काही गाडय़ा सीएसटी-पनवेल-कर्जत या मार्गावरून चालवण्यात येतील. उशिरा का होईना, रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने जेव्हा केव्हा हा मार्ग तयार होईल, तेव्हा सीएसटीहून कर्जतकडे जाणा-यांचा अर्धा तास वाचणार आहे. मध्य रेल्वेवर सध्या सीएसटी ते कर्जतदरम्यान ११६ किलोमीटरच्या अंतरात २१ फे-या धावतात. त्यातील ५ फे-या धीम्या असून उर्वरित १६ जलद आणि अर्धजलद आहेत. धीम्या मार्गावरून हे अंतर पार करण्यासाठी २ तास १८ मिनिटे तर जलद गाडीने १ तास ५३ मिनिटे लागतात. या मार्गावर गाडय़ांचे प्रमाणही कमी असल्याने कायम गर्दी असल्याचे चित्र पाहावयास मिळते. येत्या काळात हा मार्ग विकसित झाल्यास त्याचा कर्जतकरांना चांगलाच फायदा होणार आहे.

मुंबई शहरात लोकसंख्येचा स्फोट झाल्याने घरे मिळणे मुश्कील झाले आहे. असलेल्या घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणा-या नाहीत. अनेक जण कल्याण, कर्जतकडे सरकलेले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून या परिसरात मोठय़ा प्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. विशेषत: कर्जतचा विचार केल्यास या परिसरात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये व इतर महाविद्यालये असल्याने हा परिसर गेल्या दीड तपांपासून गजबजलेला आहे. त्यातच आता या परिसरात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले आल्याने वर्दळही वाढलेली आहे. त्याच्या तुलनेत लोकलच्या फे-या त्यातल्या त्यात कमी असल्याने कर्जतहून मुंबईकडे निघणा-या गाडय़ांमध्ये मोठीच गर्दी असल्याचे पाहावयास मिळते. सीएसटी-कर्जत या मार्गावर दुपदरीकरण करणे शक्य नसल्याने त्याचा ताण नियमित प्रवास करणा-या प्रवाशांवर पडत आहे. येत्या काळात तो नसेलही. रेल्वेच्या अनेक अर्थसंकल्पात याबाबत भाराभर घोषणाही झालेल्या आहेत. पण रेल्वेकडून त्यास मनासारखा प्रतिसाद मिळत नसल्याने या परिसरातील प्रवाशांची अवस्था तोंड बांधून मुक्क्याचा मार खाण्यासारखी झालेली होती. आता त्यांना या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या बातमीने काहीसे हायसे वाटले असेल. बिल्डर मंडळींनाही त्यामुळे आनंद झालेला आहे. पुण्याहून मुंबईला येताना कर्जत हे रेल्वे स्थानक लागते. वडय़ामुळेही हे स्थानक परिचयाचे आहे. लांबपल्ल्याच्या गाडय़ांना घाट चढण्यापूर्वी काहीशा विश्रांतीसाठी हे स्थानक उपयोगी आहे. असे हे कर्जत गाव आता कात टाकते आहे. हिरव्या पर्णराईने वेढलेल्या गावात आता सिमेंट काँक्रिटचे जंगल तयार होत आहे. त्यामुळे दररोज कामानिमित्त मुंबईला जाणा-यांसाठी रेल्वेची सोय अधिक सुलभ कशी होईल, यासाठी प्रयत्न आवश्यक होते. ते आता दुपदरीकरणाने मार्गी लागतील. रेल्वेने हे काम हाती घेतल्यानंतर दिवा-वसई-पनवेल या गाडय़ांच्या फे-याही वाढवण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षापासूून या परिसरात मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाल्याने भविष्याचा विचार करून रेल्वेने आतापासूनच याकरिता पावले टाकण्याची आवश्यकता आहे. जव्हारहून एक मालगाडीचा मार्ग कसा-याकडे येतो. तो अधिक विकसित केल्यास मोखाडा व अन्य आदिवासी तालुक्यांना जोडता येऊ शकते. इंग्रजांच्या काळात रेल्वे आल्याने दळणवळणाची सोय झाली. शहरात लोकसंख्या वाढल्यानंतर जागेची घनता काही वाढत नाही. शहरांत आता जागा शिल्लक नसताना खेडय़ाकडे वळणा-यांना जर रेल्वेच्या मुबलक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास शहरांवरील ताण कमी होऊ शकतो. त्यासाठीचे पाऊल आता रेल्वे प्रशासनाने उचलले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version