Home मध्यंतर सुखदा नको न्यूनगंड!

नको न्यूनगंड!

1

घरी अखंड बडबड करणा-या बच्चेकंपनीच्या तोंडाला शाळेत तोंडी परीक्षेच्या वेळी कुलूप लागतं. याचं प्रमुख कारण असतं न्यूनगंड. मुलांना नीट विश्वासात घेऊन हा न्यूनगंड दूर करता येतो.
‘‘घरात चोवीस तास टकळी चालू असते. पण शाळेत तोंडाला कुलूप! तोंडी परीक्षेत चक्कनापास!’’

‘‘खरं आहे हो. काल माझ्या मुलीची तोंडी परीक्षा होती. चांगली तोंडपाठ कविता. घरात तिच्या बाहुलीला शिकवते, पण सरांना चक्क थाप मारली, ‘घसा दुखतोय.’ तिची परीक्षा आता परवा घेणार.’’

बरेच पालक तर तोंडी परीक्षा व्यवस्थित पार पडण्यासाठी मुलांना चॉकलेट, आइस्क्रीमचं आमिष दाखवतात, पण उपयोग शून्य. मुलाने एकदा का बोलायचं नाही, असं ठरवलं की संपलं सारं! नेमकं काय बरं होत असेल मुलांना? आयत्या वेळी त्यांच्या तोंडाला कुलूप कसं? वक्तृत्व स्पध्रेत भाग न घेणं, चार पाहुणे घरी आले की एकदम गप्प होऊन जाणं अशा समस्या अनेक मुलांमध्ये दिसून येतात. तोंडी परीक्षांना सामोरं जायची भीती ही अगदी कॉलेजच्या मुला-मुलींतही दिसते. सारा अभ्यास झालेला असतो, पण प्रश्न समोर आला की काहीच आठवत नाही.

हा त्यातलाच एक प्रकार! एक बाई सांगत होत्या, ‘‘माझ्या मुलींना अजिबात स्टेजची भीती नाही. त्या अगदी लहान असल्यापासून मी जबरदस्तीने त्यांना भाषणात भाग घ्यायला लावत असे. सुरुवातीला मुली स्टेजवर रडल्या. काही न बोलता आल्या. पण मी काही कमी नाही. शाळेत, सोसायटीत जिथे जमेल तिथे मुद्दामहून त्यांना स्टेजवर सोडून येत होते. मला मी बरोबरच वागते आहे, असंही वाटत होतं, पण अचानक परवा मला असं जाणवलं की मी फार चुकीचे वागले. झालं असं की, माझी ऑफिसमध्ये बदली झाली. परवा त्या ऑफिसमधला शेवटचा दिवस होता.

गेली दहा र्वष मी त्या ठिकाणी काम करत होते. माझ्या सा-या सहका-यांनी मला दोन शब्द बोलायला सांगितले. ना तिथे स्टेज, ना माईक.. काही काही नाही. सारं अनौपचारिक. सारे माझे सहकारी, माझ्या हाताखाली काम करणारे. पण आपल्यासमोर एवढी गर्दी, भले ती ३० ते ३५ जणांचीच असेल, पण सा-यांचं लक्ष माझ्याकडे एकवटलेलं. सा-यांच्या नजरा माझ्यावर हे पाहून पाय अक्षरश: लटपटले. अचानक खेचत मुलींना स्टेजवर नेणारी मी मला आठवली. तो कार्यक्रम कसाबसा आटोपला. पण मनापासून कोणाशी तरी बोलावंसं वाटत होतं.’’ सा-यांना पडणारा हा प्रश्न सोडवायचा कसा? पालक-मुलांची या विषयाला धरून एक दोन-तीन तासांची कार्यशाळा घेतली. त्यात काही प्रयोग केले. तुम्हीही करून पाहा.

प्रथम मुलांना मांजरीचे मुखवटे आणि पालकांना वाघाचे मुखवटे दिले. एक मांजर आणि वाघ समोरासमोर येणार आणि भांडणार. भांडताना अट एकच, मांजर वाघासारखी डरकाळी देणार आणि वाघाला मांजरीचा आवाज! पहिलीच जोडी भांडायला समोर आली आणि हशा पिकला. मांजरीला वाघाचा किंवा वाघाला मांजरीचा आवाज विनोदी वाटणारच. जरी हे पाहताना हसायला येत असलं तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, प्रत्येकाला त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असा आवाज आहे. इथे आपण आवाज म्हणजे बोलण्याची ढब किंवा पद्धत म्हणू या. काही जण अतिशय शांतपणे बोलतात.

काही दिसायला अतिशय शांत, प्रेमळ, गरीब वाटतात, पण त्यांचं बोलणं मात्र एकदम शेपटी फिस्कारलेल्या मांजरीसारखं आक्रमक असतं. काहींचा आवाज आणि बोलण्याची शैली चारचौघांना जणू काही भुरळ घालते. आपोआप त्यांच्या बोलण्याकडे आपण खेचले जातो. त्यांच्या शब्दांवर नकळत विश्वास ठेवावा वाटू लागते. काही जण असे असतात ज्यांना सद्य घडामोडी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण कोणताही विषय असो, त्या विषयामध्ये या विशिष्ट व्यक्तींचा अभ्यास असो वा नसो, ही काही माणसं आपली मतं मांडत राहतात. अशा लोकांचा गट आपल्याला ट्रेनमध्ये, ऑफिसमध्ये, ठिकठिकाणी दिसतो. आता ही सारी

उदाहरणं इथे देण्याचं कारण इतकंच की, ही सारी संभाषणकलेतील वैशिष्टय़ं आहेत. ही सारी वैशिष्टय़ं आपण आपल्या मुलांना निरनिराळ्या उदाहरणांतून योग्य वेळी स्पष्ट करायला हवीत. मित्रामित्रांमध्ये भांडणं झाली आणि आपली बाजू बरोबर असेल तर वाघाची डरकाळी द्यायला काहीच हरकत नाही, पण आईवडिलांसमोर ही डरकाळी कधीच नको. वर दिलेली उदाहरणं मुलांना समजावताना त्यांच्या वर्गातली, मित्रमैत्रिणींची उदाहरणं देता येतात. बोलण्याची ठरावीक पद्धत योग्य आणि ठरावीक अयोग्य, अशा बंधनात न अडकवता त्यांना उदाहरणं द्या.

त्यांना कोणाचं बोलणं आवडतं, कोणाचं नाही, त्यांनी योग्य-अयोग्य बोलण्याचे निकष काय लावले आहेत हे प्रथम जाणून घ्या. त्यानंतर त्यात काही चूक होत असेल तर समजवा. दुस-यांच्या बोलण्याच्या पद्धती पाहताना ‘मी’ कशी बोलते किंवा बोलतो? माझ्या बोलण्याने माझे मित्र, आईवडील यांना बरं वाटलं की ते दुखावले जातात? दुखावले जात असतील तर माझं म्हणणं त्यांना न दुखावता कसं पटवून देता येईल? या अनेक लहानमोठया गोष्टींचे विचार करायला प्रवृत्त करा. आपोआपच मुलांना स्पष्ट, नेमकेपणाने बोलण्याची कला अवगत होते. त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.

मुलं सर्वासमोर बोलण्याचं टाळतात. त्याची मुख्यत्वे दोन कारणं. एक तर आपल्याला कोणीतरी हसेल. म्हणजेच आत्मविश्वासाचा अभाव. अशा वेळी आपण त्याच्या बोलण्यातील वैशिष्टयांची जाणीव करून दिली की ही भीती कमी होते. या काही एका दिवसात घडून येणा-या गोष्टी नाहीत, पण आपल्या पाल्याच्या बोलण्यातलं आपल्याला नेमकं काय आवडतं, कुठे बदल केला पाहिजे, तोंडी परीक्षेत जसं तुला घरी छान उत्तर देता येतं तसंच द्यायचं आहे, शिक्षकसुद्धा घरातल्या मोठयांसारखेच असतात, असं सांगितलं गेलं पाहिजे. आत्मविश्वास कमी असलेल्या मुलांना त्यांच्या बोलण्यातील चुका जरूर दाखवल्या पाहिजेत, पण शब्दाचा चुकीचा उच्चार किंवा चुकीची वाक्यरचना ऐकून जे साहजिक आपल्याला हसू येतं, ते निक्षून टाळलं पाहिजे. कारण, आपल्या हसण्यातील सहजता ही आत्मविश्वासाचा अभाव असणा-या मुलाला मोठया प्रमाणात दुखवू शकते.

दुसरं कारण म्हणजे, आपलं म्हणणं, आपले विचार, आपली मतं आपण दुस-यांना पटवून देण्याची गरज मुलांना वाटत नाही. आजूबाजूची मुलं एक तर प्रभावी, क्वचित प्रसंगी अतिशहाणी किंवा अतिशय बावळट, कोणाचंच न ऐकणारी अशी वाटतात. अशा मुलांच्या आवडीनिवडी इतर मुलांपेक्षा भिन्न असल्याचं सुरुवातीपासूनच कळतं. मित्र मैत्रिणींच्या गराडयापेक्षा ते एकएकटे राहणं पसंत करतात. त्यांची बौद्धिक क्षमता भिन्न असते. त्यांच्या क्षमतेच्या मुलांच्या सहवासात आल्यावरच ती बोलतात. गटचर्चा झाल्यावर किंवा वादविवाद स्पध्रेमध्ये, थोडक्यात निष्कर्ष किंवा सारांश काढण्याचं अशा मुलांना सहज जमतं. आधी सा-यांचं म्हणणं, मतं, विचार काळजीपूर्वक ऐकणं, निरीक्षण करणं या सा-याचा फायदा त्यांना होत असतो.

कोणत्याही संभाषणासाठी आवश्यक असलेला हा गुण आहे. जसा संभाषणात न्यूनगंड घातक तसाच अहंगंडही घातक! मोठया माणसांत मधेमधे बोलणारी, आपण आईवडिलांइतकंच मोठे झालो अहोत, असं मानून बोलणारी मुलांची प्रवृत्तीही थांबवायला हवी. तेव्हा आतापासूनच आपल्या बरोबरीने आपल्या पाल्याच्या संभाषणाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version