Home महामुंबई वांद्रे-दहिसर ट्रॅफिकजाम

वांद्रे-दहिसर ट्रॅफिकजाम

0

वांद्रे ते दहिसर हा पश्चिम द्रुतगती महामार्ग मुंबईतला प्रमुख रस्ता असला तरी या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उड्डाणपुलामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचा प्रवास त्रासदायकच होत आहे. 

मुंबई – वांद्रे ते दहिसर हा पश्चिम द्रुतगती महामार्ग मुंबईतला प्रमुख रस्ता असला तरी या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उड्डाणपुलामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचा प्रवास त्रासदायकच होत आहे. या मार्गावर उड्डाणपुले बांधण्यात आली आहेत. मात्र यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढल्याचे चित्र आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीच्या उदासीन धोरणामुळे मुंबईकरांना आणि पर्यायाने मुंबईत येणा-या पर्यटकांना खड्ड-यांतूनच प्रवास करणे भाग पडत आहे.
या मार्गावर कांदिवली पुलावरील खड्ड-यांमुळे उमेश शिंदे या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतरही या विभागांना जाग आलेली नाही.

या पुलांवरून वाहतूक करण्यासाठी मुंबईत प्रवेश करणा-या वाहनांकडून टोल वसूल केला जातो. परंतु उड्डाणपुलावरील निमुळत्या प्रवेशामुळे होत असलेली वाहतूक कोंडी आणि पुलावर, तसेच रस्त्यावर असलेले खड्डे यामुळे हा टोल भरावा तरी कशाला, असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.

नॅस्कोजवळील सव्‍‌र्हिस रोड
नॅस्कोपासून ते पुढे गोरेगावपर्यंतचा सव्‍‌र्हिस रोड भल्यामोठ-या खड्ड-यांनी व्यापलेला आहे. हा रस्ता आहे की सेवासुविधा पुरवणा-या कंपन्यांनी खोदून ठेवलेला भाग आहे, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र ‘बॉटलनेक’मुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खड्ड-यांनी भरलेल्या सव्‍‌र्हिस रोडचा पर्याय निवडतात. मात्र त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळते.

अंधेरी
गोल्डस्पॉट जवळील या उड्डाणपुलावर सहज जाता येईल, असे होत नाही. संभाजीनगरपासून या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली असते. मात्र पुलावर खड्डेच खड्डे आहेत. एमएसआरडीसीच्या अधिका-यांचेही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

विलेपार्ले
एअरपोर्ट सिग्नलवरून जाणा-या उड्डाणपुलाच्या खाली अत्यंत संथगतीने वाहतूक सुरू असते. मात्र पुलावर तसेच पुलाच्या खालील बाजूस खड्डेच खड्डे चोहीकडे असेच चित्र दिसते. मात्र पुलावरून खाली उतरल्यानंतरही खड्ड-यांना चुकवतच पुढे जावे लागते.

आरे
गोरेगाव येथील आरे पुलाआधीच्या रस्त्यावर मोठ-या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. कासवगतीने गाडी चालवत वाहनचालकांना उड्डाणपुलाचा मार्ग धरावा लागतो.

मालाड
मालाड पुलाच्या खाली पठाणवाडी सिग्नल परिसरात खड्ड-यांचे जंजाळच पसरले आहे. पुलावरून जाणारे सुखावलेले असले तरी रस्त्यांवरून जाणा-या वाहनांना बोटीतल्या प्रवासाचा अनुभव घ्यावा लागत आहे.

पानबाई इंटरनॅशनल स्कूलसमोर खड्डा
सांताक्रूझ पुलावर उतरल्यावर सुसाट वेगाने गाड-या हाकणा-यांना पानबाई इंटरनॅशनल स्कूलसमोरील भागात असलेला खड्डा दुष्टीस पडत नाही. त्यामुळे अनेकदा या खड्ड-यात आपटण्याची वेळ येते.

कांदिवली
कांदिवली पूल झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी टळेल असे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात येथील बॉटलनेक वाहनचालकांची प्रमुख समस्या ठरत आहे. त्यातच खड्ड-यांची भर. पुढे कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स जवळील उड्डाणपुलावर खड्डे नाहीत. मात्र, त्यापुढील पुलावर खड्डेच खड्डे झाले आहेत. मेट्रो मॉलसमोरील रस्त्यांवर पेव्हरब्लॉक आणि सिमेंट काँक्रिटीकरणाच्या जोडणीमुळे, तसेच असमांतर पातळीमुळे खड्डेसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

खार-सांताक्रूझ
या पुलावर प्रवेश करण्यासाठी टीचर्स कॉलनीपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र या पुलावर प्रवेश केल्यानंतर खड्ड-यांचे दर्शन घडते. हे खड्डे चुकवत वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. या पुलावर तब्बल दहा ते बारा छोट-यामोठ-या आकारांचे खड्डे आहेत.

जोगेश्वरी पुलावर विटांनी भरला खड्डा
जोगेश्वरी पुलाच्या खाली मोठ-या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या असते. जोगेश्वरी पुलाच्या उत्तरेकडील दिशेला उतारावर मागील अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात वाहनांची ठोकर होते.

चालकाचा अंदाज चुकल्यास गाडी खड्ड-यात जाते. हा खड्डा धोकादायक ठरत असताना केवळ विटामातीचा भुगा या खड्ड-यात भरण्यात आला आहे. कायमस्वरूपी त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version