Home संपादकीय अग्रलेख ‘नमो’समोर शिवसेनेचे लोटांगण

‘नमो’समोर शिवसेनेचे लोटांगण

1

कुठल्याही प्रश्नावर वेळोवेळी डरकाळ्या फोडणारा हा पक्ष आज शरीफ यांना निमंत्रण देण्याच्या व त्यांच्याशी चर्चा करण्याच्या प्रश्नावर अगदी मूग गिळून गप्प आहे. पाकिस्तान किकेटपटूंना भारतात खेळू देणार नाही, तो सामना होऊ देणार नाही, पाकिस्तानी कलाकारांचे, संगीतकारांचे कार्यक्रम येथे होऊ देणार नाही, अशा डरकाळ्या फोडणा-या शिवसेनेचे आता अगदी मांजर झाले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणा-या शपथविधीला इतर अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्याबरोबरच ‘सार्क’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. यातील काही देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण देण्यावरून वाद आणि वादंग निर्माण झाले असताना व त्याबाबत बरीच टीका होत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे या शपथविधी समांभाला उपस्थित राहतात की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. पाकिस्तानमधील कट्टरवाद्यांचा तसेच तेथील लष्कराचा शरीफ यांच्या भारतभेटीला विरोध असल्याने ते या शपथविधीला न येता एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला पाठवतील, असे वाटत होते. परंतु अखेर दस्तुरखुद्द नवाझ शरीफ हे आजच्या समारंभाला हजर राहण्यासाठी येत आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख प्रथमच भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहत आहेत, ही विशेष बाब होय. त्यांच्याबरोबर त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्री सरताझ अझीझ हे असणार आहेत. नवाझ शरीफ हे दिल्लीतील शपथविधी समारंभाला येणार नाहीत, अशी दाट शंका होती. परंतु एक वर्षापूर्वी शरीफ पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला भारताशी चांगले संबंध ठेवायचे आहेत, अशी घोषणा केली होती. शरीफ यांना काश्मीर आणि अन्य प्रश्न सोडवायचे असल्याने व भारत पाकिस्तान चर्चेसाठी त्यांची नेहमीच तयारी असल्याने शपथविधी समारंभाच्या निमित्ताने मिळणारी ही संधी पक्के राजकारणी असलेले शरीफ कशाला दवडतील? या पार्श्वभूमीवर, शरीफ यांनी दिल्लीत यायचे ठरवले तर नवल नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेसुद्धा शरीफ यांनी उपस्थित राहावे, अशी शिफारस केली आहे. आपल्या या भेटीबाबत शरीफ यांनी आपल्या सहका-यांशी आणि वरिष्ठ लष्करी अधिका-यांशी चर्चा केली. शपथविधीच्या दुस-या दिवशी म्हणजे २७ मे रोजी द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. या आधी दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये तसेच सचिव पातळीवर अनेक वेळा चर्चा झाल्या; पण, काश्मीर व इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यातून काही निष्पन्न झाले नाही. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की, पाकिस्तानने भारताशी चर्चा करण्याची कितीही तयारी दाखवली असली व शांततेचे कितीही गोडवे गायले असले तरी पाकिस्तानचे दाखवायचे दात वेगळे असतात व खायचे दात वेगळे असतात. पाकिस्तानचे दुटप्पी धोरण, सीमेवरील पाकिस्तान सैनिकांकडून होणा-या कुरापती, सतत होणारा गोळीबार, भारतीय जवानांच्या हत्या, पाकिस्तानची चिथावणी आणि पाकस्थित दहशतवादी संघटनांकडून भारतात होणारी दहशतवादी कृत्ये, या बाबी लक्षात घेता संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने पाकिस्तानशी फारशा वाटाघाटी केल्या नव्हत्या. पाकिस्तान सैनिकांनी जेव्हा जेव्हा आगळीक केली व भारतीय जवानांची हत्या केली तेव्हा सरकारने पाकिस्तानला कडक शब्दात ताकीद दिली. परंतु भाजपने लोकसभेत अशा प्रकरणांमध्ये सरकारला धारेवर धरले व सरकार बोटचेपेपणाचे धोरण स्वीकारत असल्याची टीका केली. पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारण्यात यावे, असाही सूर लावला. आता भाजप सत्तेवर आल्याबरोबर त्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शपथविधी सोहळ्यासाठी बोलावले, एवढेच नव्हे तर पाकिस्तान पंतप्रधानांशी चर्चाही होणार आहे. शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारले पाहिजेत, हे चांगले धोरण आहे. पण आपण करतो ते सर्व चांगले आणि  तीच गोष्ट इतरांनी केली तर ते देशविघातक हे धोरण सुसंगत नाही. पाकिस्तानशी चांगल्या वातावरण निर्मितीसाठी व उपखंडात शांतता नांदण्यासाठी भाजपचे नवे सरकार सहकार्याचा हात पुढे करत आहे; पण, हा हात पुढे करताना पाकिस्तानचे अजूनपर्यंतचे नापाक मनसुबे व इतिहास लक्षात घेऊन भारताने सावध पावले टाकली पाहिजेत. या सर्व हालचालीत आश्चर्य वाटते ते शिवसेनेचे. शिवसेना हा ‘रालोआ’मधील एक महत्त्वाचा घटक पक्ष. कुठल्याही प्रश्नावर वेळोवेळी डरकाळ्या फोडणारा हा पक्ष आज शरीफ यांना निमंत्रण देण्याच्या व त्यांच्याशी चर्चा करण्याच्या प्रश्नावर अगदी मूग गिळून गप्प आहे. पाकिस्तान किकेटपटूंना भारतात खेळू देणार नाही, तो सामना होऊ देणार नाही, पाकिस्तानी कलाकारांचे, संगीतकारांचे कार्यक्रम येथे होऊ देणार नाही, अशा डरकाळ्या फोडणा-या शिवसेनेचे आता अगदी मांजर झाले आहे. पाकिस्तान आपल्या जवानांचे सीमेवर रक्त सांडत असताना पाकिस्तानी खेळाडूंशी कसले खेळता, असे विचारणारी आणि वानखेडेची खेळपट्टी खणून काढणारी शिवसेना शरीफ यांना देण्यात आलेल्या निमंत्रणाबाबत तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प का आहे? शिवसेना असे दुटप्पी वर्तन करत असताना ‘रालोआ’तील एक घटक पक्ष ‘एमडीएमके’ श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांना निमत्रंण देण्यात आल्याबद्दल संतप्त झाली असून या पक्षाचे नेते वायको यांनी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेऊन आपला विरोध नोंदवला. विशेष म्हणजे या पक्षाचा एकही खासदार निवडून आलेला नाही. असे असूनही या पक्षाने आपला विरोध तीव्रपणे दर्शवला आहे. पण १८ खासदार निवडून आलेले असूनही सेनेने शरीफ यांच्या प्रश्नावर आपली तलवार म्यान केली आहे. याचे एक कारण म्हणजे शिवसेनेचे डोळे आता मंत्रीपदाच्या खुच्र्याकडे लागले आहेत व या खुच्र्या त्यांना खुणावत आहेत. दुसरे कारण म्हणजे ज्या महाराष्ट्रातील युतीत शिवसेनेचे अजूनपर्यंत वर्चस्व व दरारा होता तो या लोकसभा निवडणुकीत खूपच कमी झाला आहे. आता महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व वाढले आहे. ही बाब शिवसेना नेत्यांच्या लक्षात आल्याने त्यांना आता नमते घेतल्यावाचून पर्याय उरलेला नाही. शिवसेना आता सगळ्याच बाबतीत बॅकफूटवर आहे. मुंबई महापालिकेत सध्या शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे; परंतु, निवडून आलेल्या काही भाजप खासदारांनी नुकतीच मुंबईच्या विकास प्रकल्पांबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा केली. या चच्रेत भाजपने युतीतील आपला सहकारी शिवसेनेला अंधारात ठेवले. भाजप आज आपला आवाज चढवते आहे, याचे कारण अजूनपर्यंत युतीमध्ये शिवसेनेने मोठय़ा भावाची व दरडावण्याची भूमिका बजावली. भाजपने दरवेळी नमती भूमिका घेतली. निवडणुकीपूर्वी भाजप नेते नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनौपचारिक भेट घेतली. तरीसुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आकांडतांडव केले व भाजप नेत्यांना अपमानास्पद वागणूक दिली. शेवटी भाजपच्या अन्य नेत्यांना उद्धव ठाकरे यांची समजूत काढावी लागली. भाजप नेत्यांनी हे सगळे सहन केले. पण आता निवडणूक निकालानंतर परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात तर भाजपच्या जागा वाढल्याच आहेत; पण, शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या त्या मोदी लाटेमुळेच मिळाल्या, असेच भाजप नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. म्हणूनच भाजपने शिवसेनेला खडसावले आहे की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रित करणे, हा परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे व त्यात कुणी लुडबुड करू नये. शिवसेनेवर अशाच थपडा खाण्याची वेळ या पुढे येणार आहे. ‘घी देखा, लेकिन बडगा नही देखा’, असेच भाजप नेते आता म्हणत असतील.

1 COMMENT

  1. प्रहार वाले अजून सुधरायला तयार नाही . स्वताचे काय चुकले ते आधी बघा मग नंतर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version