Home क्रीडा नागपूरची खेळपट्टी खेळण्यायोग्य नव्हती- बीसीसीआय अडचणीत

नागपूरची खेळपट्टी खेळण्यायोग्य नव्हती- बीसीसीआय अडचणीत

1

नागपूरची खेळपट्टी खेळण्यायोग्य (पुअर) नव्हती, असा शेरा आयसीसीचे सामनाधिकारी जेफ क्रो यांनी दिल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अडचणीत आले आहे.

नवी दिल्ली- नागपूरची खेळपट्टी खेळण्यायोग्य (पुअर) नव्हती, असा शेरा आयसीसीचे सामनाधिकारी जेफ क्रो यांनी दिल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अडचणीत आले आहे. याबाबत बीसीसीआयला १४ दिवसांत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

आयसीसीच्या खेळपट्टी निरीक्षण पद्धतीनुसार, विदर्भ क्रिकेट असोसिएशनची (व्हीसीए) खेळपट्टी खूपच खराब होती, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सामनाधिकारी जेफ क्रो यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी व्हीसीएच्या जामठा खेळपट्टीबाबत चिंता व्यक्त केली आहे. क्रो यांनी त्यांचा अहवाल बीसीसीआयकडे सुपूर्द केला आहे. बीसीसीआयच्या उत्तरानंतर आयसीसीचे महाव्यवस्थापक (क्रिकेट) जेफ अलार्डिस आणि आयसीसीचे मुख्य सामनाधिकारी रंजन मदुगले ही दुकली तिस-या कसोटीतील ‘व्हीडिओ फुटेज्’च्या आधारे अंतिम निर्णय घेईल.

सध्या समालोचकाच्या (कॉमेंटेटर) भूमिकेत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या माजी कसोटीपटू मॅथ्यू हेडनसह इंग्लंडचा मायकेल वॉनसह भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी खेळपट्टीच्या रागरंगाबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र भारताचा कर्णधार विराट कोहली आणि टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांनी व्हीसीएच्या क्युरेटर्सची बाजू घेतली. कॉमेंटेटरनंतर आयसीसीच्या सामनाधिका-यांनी नागपूरच्या खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली तरी दक्षिण आफ्रिका संघ व्यवस्थापनातर्फे खेळपट्टीबाबत कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांचे ‘होम असोसिएशन’ असलेल्या जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीवर पहिल्याच दिवसांपासून चेंडू हातभर वळायला लागले. भारताच्या फॉर्मात असलेल्या आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि अमित मिश्राने खेळपट्टीचा फायदा उठवत भारताला मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

1 COMMENT

  1. राज्यस्थान ची उंट गाडी कोकणात चालत नाही का? कोकणातील रस्ते चांगले नाहीत.ज्यांनी भारत हरणार म्हणून बीट लावली तेच ठणाणा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version