Home मध्यंतर उमंग नाते जुळले मनाशी मनाचे..

नाते जुळले मनाशी मनाचे..

0

मध्यंतरी लग्न आणि जन्मपत्रिका यांचं अतूट नातं आहे, असं म्हटलं जायचं. पण लग्न करण्यासाठी या पत्रिका जुळणं खरंच आवश्यक आहे का? याबद्दल तरुणांना काय वाटतं हे सांगणारा ‘जन्मपत्रिकेचा अट्टहास का?’ या शीर्षकाचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात आम्ही तुमचा विवाह पत्रिका जुळवून झाला की न जुळवता, याविषयी तुमचे अनुभव मागवले होते. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव खास आमच्या वाचकांसाठी..

केवळ घरच्यांसाठी ‘खोटी पत्रिका’
आमचा प्रेमविवाह. त्यामुळे पत्रिका पाहायचीच नाही, असं आम्ही दोघांनीही ठरवलं होतं. त्यात ती माझ्यापेक्षा वर्षभराने मोठी होती. ही गोष्ट केवळ आम्हा दोघांनाच माहीत होती; पण आमच्या घरच्यांना पत्रिका पाहायच्याच होत्या. दोघांच्याही घरच्यांकडून पत्रिका मागवण्याचं फर्मान निघालं. आता आली का पंचाईत? आमच्या दोघांच्याही घरची मंडळी जुन्या विचारांची असल्याने त्यांना आमचं म्हणणं पटणार नाही, याची खात्री होती. मग आम्ही दोघांनीही एक युक्ती केली. पत्रिकेच्या झेरॉक्स काढून त्यावरची तारीख काळ्या शाईने कमी-जास्त केली. त्यात तिचं वय कमी आणि माझं वय जास्त दाखवलं. त्यावर खाडाखोड केली आहे, याची कोणालाच काही कल्पना आली नाही. आम्ही ती पत्रिका आमच्या घरच्यांकडे दिली. घरच्यांच्या दृष्टीने ती आमची बरोबर पत्रिका होती. त्यांनी ती त्यांच्यापरीने तपासून पाहिली. पण ती आमची खरी पत्रिका नाही, हे आम्हाला दोघांनाच माहीत होतं. आज आमच्या लग्नाला दहा वर्ष झाली. आमचा संसार अगदी छान चालला आहे. त्यामुळे पत्रिका, ज्योतिष या सगळ्यावरचा अविश्वास अधिकच दृढ झाला.
– के. संजीवनी, लालबाग


स्वकर्तृत्वावर विश्वास!
आमचा विवाह पत्रिका किंवा कुंडली यापैकी काहीही न पाहता झाला. आमचं लग्न झालं तेव्हा माझ्याकडे स्वत:चं घरदार नव्हतं. बँकेत पैसा नव्हता; पण त्यामुळे माझं काही अडलं नाही. किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारच्या समस्या आल्या नाहीत. चारचौघांप्रमाणेच संसाराचे चटके झेलत गेली ३५ वर्ष आम्ही सुखाचा संसार करत आहोत. इतक्या वर्षात आपण पत्रिका पाहायला हवी होती, असं अजिबात वाटलं नाही. आज माझ्याकडे स्वत:चा बँक बॅलन्स आहे, सोबत पत्नी आहे. आता सूनही घरात आली आहे. थोडक्यात काय स्वत:च्या कर्तुत्वावर विश्वास असेल तर सगळं काही व्यवस्थित होतं. त्यासाठी ग्रह, तारे कशाला हवेत?
– अशोक परब, ठाणे


पत्रिकेतला मंगळ आमच्यासाठी मंगलच!
माझी पत्नी ही माझ्या सख्ख्या मामांची मुलगी. त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांना ओळखत होतो. आमचा लग्न करण्याचा विचार सुरू झाला तेव्हा आपण पत्रिका पाहायची नाही, असं मी ठरवलं होतं. पण गावाहून पत्रिका पाहायची आहे असं सांगण्यात आलं. तेव्हा आपणही पत्रिका पाहावी असं वाटायला लागलं. म्हणून मी मुलीची पत्रिका मागून घेतली. त्या वेळी आम्ही लालबागला राहात होतो. तिकडच्या ज्योतिषाला पत्रिका दाखवली असता मुलीच्या पत्रिकेत मंगळ असल्याचं समजलं. मात्र मुलीच्या घरच्यांनी पत्रिका पाहिली असता त्यात मंगळ नसल्याचं समजलं. हा तिढा सुटत नव्हता. हा प्रकार माझ्या मोठय़ा मामाच्या मुलाला समजला. त्याला त्याबद्दल चांगली माहिती होती. त्याने आम्हाला ठाण्यातल्या एका ज्योतिषाकडे नेलं. त्यांनी पंचागकर्त्यां दातेंची काही पुस्तकं वाचायला दिली. त्यावरून त्यांनी मंगळाविषयीची माहिती वाचायला दिली. त्यानुसार पत्रिकेतल्या कोणत्या घरामध्ये मंगळ असतो, हे तर सांगितलंच याशिवाय ज्योतिषांच्या अनेक गमतीजमती सांगितल्या. त्यांनी दिलेली माहिती ऐकून मीही आश्चर्यचकित झालो. आज आमच्या लग्नाला २० वर्षे झाली. माझ्या पत्नीच्या पत्रिकेतला मंगळ आम्हाला ‘मंगल’ ठरला.
– मनमोहन रोगे, ठाणे


एकमेकांप्रती प्रेम, विश्वास आवश्यक
माझा प्रेमविवाह आहे. म्हणजे सात वर्षापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने आमचा विवाह झाला. त्यावेळी माझ्या माहेरच्यांनी किंवा सासरच्यांपैकी कोणीही पत्रिका बघण्याची सक्ती केली नाही. मात्र मलाच आमची पत्रिका जुळते का हे बघायची इच्छा होती. मात्र माझ्या नव-याने त्यासाठी नकार दिला आणि आम्ही पत्रिका न बघताच लग्न केलं. आज माझ्या लग्नाला पाच महिने झाले आणि आम्ही दोघेही एकमेकांसोबत आनंदाने राहत आहोत. त्यामुळे पत्रिकेचा जीवनावर फरक पडतो असं मला वाटत नाही. फक्त दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, विश्वास आणि समजून घेण्याची ताकद असली पाहीजे.
– तृप्ती पवार आंबेकर, माहीम


केवळ माणसं महत्त्वाची
माझं सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबाचा एकमेकांशी आमच्या लहानपणापासूनच घरोबा होता. एकमेकांकडे जाणं-येणं होतं. त्यामुळे आम्हा मुलांचीही एकमेकांशी चांगली दोस्ती होती. हळूहळू या दोस्तीचं प्रेमात रूपांतर कधी झालं ते कळलंच नाही. आम्ही घरच्यांना आमच्या लग्नासंबंधी सांगितलं असता त्यांनाही आनंदच झाला. एकमेकांच्या घरच्यांशी चांगली ओळख असल्यामुळे त्यांनीही कधी पत्रिका बघण्याचा आग्रह धरला नाही. एकमेकांच्या सोयीने दिनदर्शिकेत दिलेला एक मुहूर्त ठरवून त्यावर लग्न केलं.
– निशा पी. बोरिवली

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version