Home महामुंबई नाशिकच्या यशाचे पेढे मनसेला आंबटच

नाशिकच्या यशाचे पेढे मनसेला आंबटच

0

नाशिक महापालिकेत महापौर पदावर मनसेने बाजी मारल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मनसेच्या मुंबईतील नगरसेवकांनी महापालिकेच्या सभेत सोमवारी पेढे वाटपाची तयारी केली होती.

मुंबई- नाशिक महापालिकेत महापौर पदावर मनसेने बाजी मारल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मनसेच्या मुंबईतील नगरसेवकांनी महापालिकेच्या सभेत सोमवारी पेढे वाटपाची तयारी केली होती. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये पुरात मृत्यू पावलेल्यांना आदरांजली वाहून मुंबई महापालिकेची सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे हे पेढे मनसेला परत न्यावे लागले. नाशिकच्या द्राक्षांप्रमाणे मनसेचे पेढेही आंबट ठरल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती.

नाशिक महापालिकेत मनसेने भाजपच्या मदतीने महापौरपद मिळवत सत्ता काबिज केली होती. परंतु यंदाच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने पाठिंबा काढून घेतल्यामुळे मनसेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या जोरावर पुन्हा सत्ता मिळवली.

आघाडीच्या मदतीने नाशिकमध्ये मनसेचे अशोक मरुतडकर निवडून आल्याने या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी मनसेने पेढे वाटण्याचा बेत आखत तशी तयारीही केली होती.

यासाठी तब्बल दहा किलो पेढे महापालिकेत आणण्यात आले होते. परंतु महापौरांनी जम्मू कश्मीरमधील नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी निवेदन केल्याने हे पेढे पुन्हा पक्ष कार्यालयात नेण्यात आले. मात्र हे पेढे वाटून शिवसेनेला भाजपपासून संभाळून राहण्याचा सल्ला देण्याची संधी मनसेच्या हातून निघून गेली. नाशिकमध्ये भाजपने जे केले, ते शिवसेनेच्या बाबतही होईल, त्यामुळे शिवसेनेने आतापासून भाजपचे खरे रूप ओळखावे, असे प्रेमाचे बोल मनसेचे महापालिका गटनेते संदीप देशपांडे या वेळी शिवसेनेला ऐकवणार होते. परंतु ते बोलायला संधी मिळाली नाही आणि पेढेही परत नेण्याची वेळ देशपांडे यांच्यावर आली. आता पुढच्या बैठकीत पेढे वाटले जातात का, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version