सजीव गाथा

1

काही प्रजाती नष्ट होण्याचा वेग इतका झपाटयाने वाढला आहे की आज आपल्या डोळ्यांसमोरच काही प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जगातील एकूण सर्व ज्ञात सजीव प्राण्यांच्या प्रजातींपैकी १७,३०० प्रजाती या धोक्याच्या कोणत्या ना कोणत्या वर्गात मोडणा-या आहेत. एखाद्या प्रजातीचं नामशेष होणं ही एक कायम सुरू असणारी प्रक्रिया असते. काही वेळा प्रजाती नामशेष होतात तर काही वेळा त्या उत्क्रांत होतात. एखादी प्रजाती नामशेष होणं किंवा उत्क्रांत पावणं ही सजीवांच्या जगातील एक सर्वात महत्वाची घडामोड आहे.

तुम्हांला ‘आईस एज’ या चित्रपटांची मालिका आठवतेय का? पृथ्वीवरील हिमयुगातील प्राण्यांच्या गोष्टी या चित्रपटांमध्ये दाखवल्या होत्या. खूप मनोरंजक असे या चित्रपटाचे चारही भाग होते. या चित्रपटांचं वैशिष्टय़ म्हणजे यात हिमयुगातील प्राणी त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी कोणकोणत्या संकटांना पार करून गेले असू शकतील याचं अ‍ॅनिमेटेड चित्रण पाहायला मिळतं. अर्थात ते केवळ चित्रपट असले तरी आजपर्यंत पृथ्वीतलावरच्या प्रजाती कशाप्रकारे नामशेष होत गेल्या याची एक झलक त्यात पाहायला मिळते.

मागील लेखात पाहिल्याप्रमाणे आययुसीएन या जागतिक संस्थेनं आतापर्यंत २०८ प्रजाती पूर्णपणे नामशेष झाल्या असल्याचा त्यांचा अंदाज जवळपास सत्य असल्याचं म्हटलं आहे. कारण गेली दशकभर या प्राण्यांचं अस्तित्व कुठेही आढळलेलं नाही. याचाच अर्थ या प्रजाती पृथ्वीतलावरून नष्ट झाल्या असतील असं म्हणता येऊ शकेल. अशी अनेक प्राण्यांची उदाहरणं देता येतील. जायंट स्लोथ हा अमेरिका प्रांताच्या परिसरात वस्ती असणारा  प्राणी साधारण ११ हजार वर्षापूर्वी नामशेष झाला. शिकारीमुळे तो नामशेष झाला. क्युबन रेड मकाव हा प्राणी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यत दिसायचा. हाही शिकारी व चोरटया व्यापारामुळे नामशेष झाला. पॅसेंजर पिजन हा कबुतराचा प्रकार. हे कबुतर देखील १९१४ साली शेवटचं दिसल्याची नोंद झाली आहे. उत्तर अमेरिकेत आढळणा-या या कबुतराची जात त्याचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे अस्तंगत झाली. टास्मानियन टायगर हा प्राणी देखील १९३० साली अखेरचा दिसला होता. तोही वाढती शिकार व अधिवासाची ठिकाणं नष्ट झाल्यामुळे नामशेष झाला. हा प्राणी टास्मानिया, ऑस्ट्रेलिया व न्यू गिनीमध्ये आढळायचा.

इ.स १५००पासून पृथ्वीवरील एकूण सर्व प्रजातींपैकी ८६९ प्रजाती अस्तंगत झाल्याची नोंद आहे. सजीव प्रजातींचं नामशेष होणं हे दोन प्रकारात मोडतं. एक तर प्रजाती सामूहिकरित्या पृथ्वीवरून नाहिशा होतात. तर काही प्रजाती एकेक करून नामशेष होतात. तर काही प्रजातींचं अस्तित्व नष्ट होणं हे एखाद्या जैविक साखळीवर देखील अवलंबून असतं.

सजीव नामशेष होण्याची कारणं

सध्या चिंतेची बाब म्हणजे नवनिर्माणाच्या वेगापेक्षा सजीव नामशेष होण्याचा वेग शंभर ते हजार पटीनं वाढला आहे असं संशोधकांच्या अभ्यासावरून दिसतं. ‘नेचर’ मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार २०५० सालापर्यंत जमिनीवरील १५ ते ३७ टक्के प्रजाती नष्ट होतील असा अंदाज आहे. खूप मोठया प्रमाणावर सजीवांच्या प्रजाती नष्ट झाले असे पाच कालखंड मानले जातात. आज आपण जिवंत आहोत तो सहावा कालखंड मानला जातो. या काळाला ‘होलोसिन एक्स्टिंक्शन’ असंही म्हटलं जातं. अखेरचं हिमयुग संपल्यानंतर साधारण तेरा हजार वर्षापूर्वी हा काळ सुरू झाला. याही कालखंडात अनेक प्राणी नामशेष झाले आहेत. उदाहरणार्थ- शिंग असलेली मगर, मोठे लेमूर माकड, मोआ पक्षी, अमेरिकन चित्ता, हास्ट्स इगल इत्यादी. प्राणी नामशेष होण्याच्या प्रमाणाचा वेग निश्चित करता येत नाही. तरीही यासंबंधीचा अभ्यास करताना संशोधक बहुतेकदा सागरी जीवांचे अवशेष हे चांगल्या स्थितीत व अधिक संख्येत सापडत असल्यामुळे हेच प्रमाण पुरावे म्हणून जास्त ग्राह्य धरतात. सजीव प्राणी दोन प्रकारे नामशेष होतात. एक तर सामूहिक नामशेष होणं व दुसरं म्हणजे टप्प्याटप्प्यात नाहिसं होणं. मिथेन वायूचा प्रादुर्भाव, समुद्राची पातळी कमी होणं, हिम युग, अशनी घात इत्यादींमुळे काही अब्ज वर्षापूर्वी काही प्रजाती एकत्रित नष्ट झाल्या असाव्यात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. परंतु आधुनिक काळात अनेक कारणं सजीवांच्या जाती नामशेष होण्यासाठी देता येतील. त्यापैकी काही कारणं पुढीलप्रमाणे-

प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणं : पूर, ज्वालामुखी, वणवा, वादळ इत्यादी कारणांमुळे प्राण्यांची वसतीस्थानं नष्ट होतात. हल्लीच्या काळात माणसं शिकारीच्या उद्देशानं प्राण्यांचे अधिवास नाहीसे करतात. शिवाय जंगलतोड, शेती, इत्यादी कारणांमुळे देखील प्राण्यांची घरं नष्ट होतात.

चोरटी शिकार व तस्करी : अनेक प्राण्यांची त्यांच्या कातडयासाठी, केसांसाठी, नखांसाठी व इतर अवयवांसाठी मोठया प्रमाणावर शिकार केली जाते. काहींची जिवंतपणी तस्करी केली जाते.

नवीन प्रजातींचा उदय : काही वेळा एखादा प्राणी राहत असलेल्या भागात दुस-या नवीन शिकारी प्राण्याचा प्रवेश झाला तरीही एखादी जात नाहीशी होऊ शकते. उदाहरणार्थ मॉरिशस बेटावर मानवी वस्ती वाढली व तिथं आलेल्या डुक्करं, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी डोडो या न उडणा-या बदकासारख्या प्राण्याला नेस्तनाबूत केलं.

प्रदूषण व वातावरणातील बदल यामुळे देखील काही सजीवांचे प्रकार नष्ट होत आहेत. उदाहरणार्थ समुद्रात तेलाचे तवंग पसरल्यानं अनेक जलचरांना मोठा धोका उद्भवतो. तसंच प्राण्यांमध्ये बर्ड फ्लू, मॅड काऊसारखे आजार पसरल्यानेही काही प्राणी धोक्यात येतात. मात्र फार पूर्वीपासून माणूसच सजीवप्राणी नष्ट होण्यासाठी मोठया प्रमाणावर कारणीभूत ठरत आलेला आहे. पर्यावरणाचा व जीवसृष्टीचा नाश करण्यात मानवाने मोठा हातभार लावलेला आहे. अतिरेकी व चोरटया शिकारीमुळे अनेक प्राण्यांचं अस्तित्व आज गंभीररीत्या धोक्यात आलेलं आहे. आज समुद्रातील शार्क, देवमासे, वाघ, गेंडा, कित्येक औषधी वनस्पती, गाणारे पक्षी यांचं प्रजनन व अस्तित्व मानवानेच धोक्यात आणलेलं आहे.

पाच कालखंड

ऑर्दोव्हिसियन- ४५० ते ४४० दशलक्ष वर्ष आधीचा हा कालखंड. या कालखंडात भूतलावरील ६० ते ७० टक्के सजीव नष्ट झाले असं म्हटलं जातं. हे प्रमाण पाहिलं तर सजीव नष्ट होण्याचा हा सर्वात मोठा दुसरा कालखंड होता.

लेट डिव्होनियन – ३७५-३६० दशलक्ष वर्षापूर्वीचा हा काळ. या काळात अनेक सजीव जाती टप्प्याटप्प्यात नष्ट झाल्या.

पर्मिअन- हे सुमारे २५१ दशलक्ष वर्षापूर्वीचं युग. नामशेष होण्याच्या प्रक्रियेतील हा सर्वात महत्वाचा व मोठा टप्पा. या काळात ९६ टक्के समुद्री जलचर व ७० टक्के जमीनीवरील सजीव नष्ट झाले. या काळाला ग्रेट डायिंग पिरिअड असंही संबोधलं जातं. या काळात मोठे सस्तन सरपटणारे प्राणी नष्ट झाले.

ट्रायसिक- २०० दशलक्ष वर्षापूर्वीच्या या काळातच डायनॉसॉर्स जन्माला आले. या काळात सुमारे ७५ टक्के सजीव प्रजाती नष्ट झाल्या.

क्रेटासिअस- हा अगदी अलीकडचा म्हणता येईल असा सुमारे ६५ दशलक्ष वर्षापूर्वीचा काळ. या काळात अशनीघातामुळे अनेक प्रजाती अस्तंगत झाल्या असाव्यात अशी मान्यता आहे. या काळात उडता न येणारे मोठे डायनॉसॉर्स वर्गातील प्राणी नष्ट झाले व तेव्हाच पक्षी व इतर सस्तन प्राण्यांचा उदय झाला.

आययुसीएनने जाहीर केलेली या शतकातली नामशेष झालेल्या व होणा-या सजीवांची यादी

जापनीज इल : जपानमधला सर्वात महागडा मासा. हा तिथं सर्वाधिक लोकप्रिय व खाल्ला जाणारा मासा आहे. याच्या शिकारीचं वाढतं व गंभीर प्रमाण, नैसर्गिक अधिवास नष्ट होणं, सागरी व नद्यांचं प्रदूषण अशा काही कारणांमुळे हा मासा कायमचा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

ब्राझिलियन थ्री : बँडेड आर्माडिलो- नुकत्याच झालेल्या फूटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बोधचिन्ह म्हणून दिसलेला हा प्राणी सर्वाच्याच परिचयाचा असेल. हा देखील एक अति संकटात असलेला प्राणी आहे. ब्राझिलमधील उस व सोयाबीनच्या शेतात याची वस्ती असायची. परंतु ही शेती कमी होत गेली तशी या प्राण्यांची संख्या देखील कमी होत गेली.

चायनीज क्रोकोडाईल लिझर्ड : हा प्राणी फक्त चीन व व्हिएतनाममध्ये आढळतो. हा जवळपास नामशेष झाला आहे. २००८ सालापासून यांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. याच्या कातडयासाठी होणारी तस्करी व नैसर्गिक अधिवासाची उणीव यामुळे ही मगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

बनाना ऑर्चिड : ही वनस्पती देखील आता रेडलिस्टमध्ये आलेली आहे. केमॅन आयलंडचं राष्ट्रीय फूल असलेली ही वनस्पती जंगल नाहीसं होत असल्यानं झपाटयाने नष्ट होत आहे.

यारकॉन ब्रीम : हा इस्त्राएलमध्ये पूर्वी आढळणारा मासा आता पूर्णपणे नामशेष झाला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version