Home संपादकीय अग्रलेख निसर्गाला जपा!

निसर्गाला जपा!

1

निसर्गाचा प्रकोप आणि त्यामुळे होणारी हानी काय असते, याचा अनुभव महाराष्ट्र गेले तीन दिवस होणा-या अविरत अतिवृष्टीने घेत आहे. पण या सर्वावर कहर करणारी घोर आपत्ती बुधवारी पुणे जिल्हय़ात आंबेगाव तालुक्यात घडली.

निसर्गाचा प्रकोप आणि त्यामुळे होणारी हानी काय असते, याचा अनुभव महाराष्ट्र गेले तीन दिवस होणा-या अविरत अतिवृष्टीने घेत आहे. पण या सर्वावर कहर करणारी घोर आपत्ती बुधवारी पुणे जिल्हय़ात आंबेगाव तालुक्यात घडली. आंबेगावातील माळीण गावावर डोंगर कोसळून संपूर्ण गाव या डोंगराखाली गाडले गेले. या दुर्दैवी घटनेत गावातील ६०-७० घरे गाडली गेली असून सुमारे २०० लोक आत अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून संततधारेमुळे या कामात व्यत्यय येत आहे. आतापर्यंत ३१ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या घटनेने महाराष्ट्रासह देशही सुन्न झाला आहे. गेले तीन दिवस पुणे व रायगड परिसरासह सतत होणा-या पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच ही दुर्दैवी घटना घडली. अतिशय दुर्गम गावात घडलेली ही घटना प्रथम कुणाला कळलीही नाही. सकाळी आठच्या सुमारास तेथे आलेल्या एका एसटी चालकाच्या नजरेस ही घटना आली व त्याने जिल्हा यंत्रणांना ही घटना कळवली. निसर्गाच्या प्रकोपाने ही घटना घडली, असा असा शिक्का मारून या घटनेला दुर्दैवी म्हटले तरी असे शिक्के मारून ही घटना सोडून देता येणार नाही आणि विसरूनही जाता येणार नाही. अतिवृष्टीमुळे या आधी घडलेल्या पूर आणि दरडी कोसळण्याच्या व जीवितहानीच्या घटना घडतच आहेत. त्यातून आपण धडा घेणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे.

आजची घटना उद्या विसरून जाण्याइतके आपण असंवेदनशील बनलो आहोत का? वारंवार घडणा-या अशा घटनांकडे दुर्लक्ष करणे हे भविष्यात आत्मघातकी ठरणार आहे, असा इशाराच जणू माळीण गावातील दुर्घटनेने दिला आहे. निसर्गाचा प्रकोप घडला असे आपण म्हणतो. पण या घटनेची वारंवारता गेल्या काही वर्षात वाढली आहे व ती दिवसेंदिवस वाढत आहे. पन्नास-साठ वर्षापूर्वी अशा घटना फारशा घडत नव्हत्या; मात्र अलीकडे अशा घटना वारंवार घडत आहेत. या आपत्ती वारंवार का कोसळत आहेत, याचा विचार आपण केला पाहिजे. प्रत्येक घटनेला काही तरी कारण असते व कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. कार्यकारण भाव असतो. जिला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो त्याला काही अंशी मानवच जबाबदार आहे.

२५ आणि २६ जुलै २००५ रोजी मुंबईत ढगफुटीमुळे अतिवृष्टी होऊन मुंबई जलमय झाली होती व दोन दिवस सारी मुंबई ठप्प होती. त्याचवेळी कोकणात महाड व पोलादपूर परिसरात हाहाकार उडाला होता. महाड व पोलादपूर तालुक्यातील अनेक गावे दरडीखाली नाहीशी झाली होती. दरडी कोसळून प्राणहानी होण्याचे सत्र दरवर्षी पावसाळ्यात कुठे ना कुठे सुरू आहे. ज्यांना पैसे देऊन जागा घेता येत नाहीत असे गरीब लोक, मजूर, भाजी व अन्य वस्तू विकणारे, मिळेल ते काम करून पोट भरणारे लोक डोंगर-टेकडयांखाली झोपडय़ा व घरे बांधून राहातात. अनेक दुर्गम गावातच नव्हे तर मुंबईसारख्या शहरातही डोंगर व टेकडयांखाली शेकडो लोक वर्षानुवर्षे वस्ती करून राहत आहेत. आपण सदैव मृत्यूच्या छायेखाली आहोत, हे त्यांच्या गावीही नसते.

मुंबईत शिवडी, वरळी, कुर्ला, घाटकोपर, भांडुप येथे लोक टेकडयांखाली राहत आहेत. या टेकडयांच्या दरडी कोसळून प्राणहानी झालेली आहे. पण असे अपघात होऊनही लोक या प्रत्यक्ष काळ ठरणा-या दरडींखाली राहत आहेत. ही परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. दरडी व डोंगर कोसळण्याचे प्रकार अलीकडे नित्याने घडत आहेत. कोकण रेल्वेचा मार्ग तर डोंगर-द-याखो-यातून जातो व तेथेही दरडी कोसळण्याचे भय असते. डोंगराळ भागातून जाणा-या सर्वच रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका असतो. बुधवारीच पहाटे मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

विकासासाठी माणूस निसर्गावर मात करतो, ही बाब एका मर्यादेपर्यंत समजण्यासारखी आहे. हा विकासही शिस्तबद्ध, निसर्गाशी मैत्री राखून आणि मानवाला उपकारक असलेला नैसर्गिक वारसा उध्वस्त न करता केला पाहिजे. पण हे न करता निसर्गाच्या विरुद्ध जाऊन निसर्गच उद्ध्वस्त करण्याचे जे ‘व्रत’ आपण घेतले आहे तेच आपणाला आज सर्व प्रकारे मारक ठरत आहे. पृथ्वीचे वाढते तापमान, कार्बनचे प्रमाणाबाहेर होणारे उत्सर्जन, ओझोनच्या आवरणाला पडलेले खिंडार व त्यामुळे मानवाला सहन करावे लागणारा अतिनीलकिरणांचा त्रास, बदललेले ऋतूचक्र, अनियमित पाऊस व त्यामुळे होणारी अतिवृष्टी वा अवर्षण, त्याचा शेतीवर होणारा हानीकारक परिणाम आज आपणाला सहन करावा लागतो आहे.

गेल्या तीन दशकात निसर्गाचा लाखो वर्षाचा वारसा नष्ट करण्यासाठी आपण काय केले नाही? भारतात गेल्या चार दशकात बेसुमार वृक्षतोड झाली, नद्यांच्या पात्रातील वाळू उपसण्यात आली व नद्यांमध्ये रासायनिक पाणी सोडण्यात आले, समुद्राचे पाणी भराव टाकून हटवण्यात आले, माशांसाठी व पर्यावरणासाठी पोषक असणारी खारफुटीची बेटे नष्ट केली, डोंगर आणि टेकडय़ा उद्ध्वस्त केल्या. मुंबई आणि पुण्यातच नव्हे तर जेथे हिरवाई होती तिचा बळी घेऊन त्या जागी गगनचुंबी इमारती आणि व्यापारी संकुले उभारण्यात आली. नवी मुंबईमध्ये असलेल्या टेकडय़ा आणि डोंगर खणून काढण्यात आले व तेथेही रहिवासी संकुले उभी राहिली. झाडे, डोंगर आणि टेकडयांमुळेही जमिनीची धूप होत नाही. पण डोंगर-टेकडयांचा हा ‘मूलाधार’च आपण काढून घेत आहोत. आज गावागावांचे शहरीकरण होत आहे व तेथील निसर्ग नष्ट केला जात आहे. या सर्वाला विकास म्हटले जात आहे.

महात्मा गांधींनी म्हटले होते की, ‘खेडय़ाकडे चला!’ पण खेडय़ात जायला खेडीच कुठे उरली आहेत? आज देशात चाललेला निसर्गाचा नाश हा विनाशाला कारणीभूत आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्याने उन्हाळ्याचा काळ आणि तीव्रता वाढली आहे. त्यामुळे लोकांना कमालीच्या उकाडय़ाला, तापमानाला तोंड द्यावे लागत आहे व अनेक आजारांना व कित्येक वेळा दुर्धर व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. या वाढत्या तापमानामुळे ऋतूचक्रही बदलले आहे व पाऊस अनिश्चित व अनियमित झाला आहे. त्यामुळे शहरातील लोकांपासून तो ग्रामीण भागातील शेतक-यांपर्यंत सर्वाना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. अवर्षण, अतिवर्षण, पूर, गारपीट यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे. निसर्गाशी आपण वैर असल्यासारखे वागत असल्याने ही सगळी संकटे ओढवत आहेत. दोन वर्षापूर्वी उत्तराखंडात पुराने जे थैमान घातले व विध्वंस केला त्याला हीच कारणे आहेत. उत्तराखंडात तेथील नद्यांवर खासगी कंपन्यांनी नियम धाब्यावर बसवून सहाशे वीज उत्पादन केंद्रे उभारली व त्यासाठी वृक्षतोड केली. हे विध्वंसक पुरांना निमंत्रण देणारे ठरले. देशाला विकास हवा आहे; पण तो निसर्ग भकास करून नव्हे. निसर्गाचा वारसा चिरंतन जपला तर निसर्गही माणसाला जपेल, हा धडा आपण आता तरी घेतला पाहिजे.
[EPSB]

खेळ आणि राजकारण

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून नुकताच एक वेगळा वाद नव्याने चर्चेत आला आहे. साउदॅम्प्टन येथे सुरू असलेल्या तिस-या कसोटीच्या पहिल्या दोन दिवशी इंग्लिश क्रिकेटपटू मोईन अली डाव्या हातात दोन रबरी कडी चढवून खेळायला उतरला.

[/EPSB]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version