Home क्रीडा आयपीएल पराभवांतून घेतलेला धडा आणि अफाट जिद्द

पराभवांतून घेतलेला धडा आणि अफाट जिद्द

1

आयपीएलच्या आठव्या हंगामात बाजी मारताना मुंबई इंडियन्सने दुस-यांदा जेतेपद पटकावले. खराब सुरुवातीनंतरही जेतेपदाला गवसणी घालता येते, हे रोहित आणि सहका-यांनी दाखवून दिले.

मुंबई- आयपीएलच्या आठव्या हंगामात बाजी मारताना मुंबई इंडियन्सने दुस-यांदा जेतेपद पटकावले. खराब सुरुवातीनंतरही जेतेपदाला गवसणी घालता येते, हे रोहित आणि सहका-यांनी दाखवून दिले. पराभवातून घेतलेला धडा आणि जिंकण्यासाठीची जिद्द त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. कुठल्याही संघासाठीही प्रेरणादायी अशी मुंबईची यंदाची कामगिरी आहे.

सुरुवातीच्या चार लढतींमधील पराभवानंतर मुंबई संघ बाद फेरीत पोहोचेल की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र २५ एप्रिलला घरच्या मैदानावर (वानखेडे स्टेडियम) सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. यानंतर तब्बल पाच विजय मिळवत मुंबईने जेतेपदासाठी दावेदारी पेश केली. शेवटच्या साखळी लढतींमध्ये आणि बाद फेरीत तर त्यांची कामगिरी कमालीची बहरली. अपयशी सुरुवातीनंतर दहा लढतींमध्ये तब्बल ९ विजय मिळवणा-या मुंबईचे कौतुक करावे तितके कमी आहे. मुंबईकडे ‘स्टार’ फलंदाज आणि गोलंदाज फार नाहीत. फलंदाजीत कर्णधार रोहित शर्मा, कीरॉन पोलार्ड, लेंडल सिमन्स आणि गोलंदाजीत वेगवान लसित मलिंगा आणि ऑफस्पिनर हरभजन सिंग इतकेच. त्यामुळे सांघिक कामगिरी उंचावण्यासाठी ‘स्टार’ क्रिकेटपटूंनी सातत्य राखण्यासोबत दुस-या फळीचे योगदान महत्त्वपूर्ण होते. मुंबईच्या उंचावलेल्या कामगिरीत हेच पाहायला मिळाले.

बाद फेरी आणि अंतिम फेरीत मुंबईने एका संघाला म्हणजे माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्जना हरवले. दोन्ही लढतींमध्ये प्रथम फलंदाजी करताना पुरेशा धावा जमवत रोहित आणि सहका-यांनी प्रतिस्पध्र्यावर दडपण आणले. पहिल्या ‘क्वॉलिफायर’मध्ये सिमन्स आणि पार्थिव पटेलची दमदार फलंदाजी आणि पोलार्डची फटकेबाजी निर्णायक ठरली. अंतिम फेरीत रविवारी पुन्हा एकदा सिमन् आणि पोलार्डने आपली भूमिका चोख बजावली. त्याला पोलार्ड आणि अंबाती रायडूची चांगली साथ लाभली. वेगवान मलिंगासह हरभजनने दोन्ही महत्त्वपूर्ण लढतींमध्ये अचूक आणि प्रभावी मारा केला. त्याला आणि आर. विनयकुमार आणि मिचेल मॅकक्लेनॅघनची सुरेख साथ लाभली.

सिमन्स, रोहित, पोलार्ड, मलिंगा आणि सिमन्स या ‘स्टार’ क्रिकेटपटूंनंतर दुस-या फळीतील मॅकक्लेनॅघन, हार्दिक पंडय़ा, रायडू आणि पटेलने मिळालेल्या संधीचे सोने केले. हार्दिक दोन ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला. रोहितचे नेतृत्व तितके प्रभावी वाटत नसले तरी त्याने सहका-यांमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास महत्त्वपूर्ण ठरला. हार्दिकसारख्या युवा क्रिकेटपटूंसह  मॅकक्लेनॅघन, रायडू आणि पटेलवर विश्वास दाखवण्याचे फळ त्याला मिळाले. तगडा आणि अनुभवी ‘सपोर्ट स्टाफ’मध्येही मुंबईच्या यशाचे मोठे गमक दडले आहे. विक्रमवीर सचिन तेंडुलकर त्यांचा ‘आयकॉन’ आहे. माजी महान लेगस्पिनर अनिल कुंबळे प्रमुख सल्लागार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला जाँटी -होड्स (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक), शेन बाँड (गोलंदाजी प्रशिक्षक), रॉबिन सिंग (सहप्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षक) असे एकाहून सरस माजी क्रिकेटपटू होते. या सर्वानी आपापल्या अनुभवांच्या जोरावर मुंबईच्या क्रिकेटपटूंमध्ये विजयासाठीची जिद्द निर्माण केली. मुंबईवगळता कुठल्याही फ्रँचायझीकडे इतका तगडा ‘सपोर्ट स्टाफ’ नाही. मात्र त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन कामी आले.

धोनी, गंभीर आणि आता रोहित

आयपीएलच्या आठ वर्षाच्या इतिहासात दोनदा जेतेपद पटकावणारा संघ म्हणून मुंबई इंडियन्सची नोंद झाली. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सनाच अशी करामत साधता आली. चेन्नई आणि कोलकाता दोन्ही जेतेपदे एकाच कर्णधाराने जिंकून दिली. महेंद्रसिंग धोनीचे नेतृत्व चेन्नईसाठी फलदायी ठरले आहे तर गौतम गंभीरच्या कर्णधारपदाखाली कोलकाता ‘चँपियन्स’ ठरला. या दुकलीनंतर आपल्या संघाला दोनदा ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार म्हणजे रोहित शर्मा. सहाव्या मोसमात पहिल्यांदा त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ अजिंक्य ठरला होता. त्यानंतर यंदा त्याची पुनरावृत्ती करण्यात रोहित आणि सहका-यांना यश आले.

हरभजन आणि हार्दिक प्रत्येकी दोनदा ‘मॅन ऑफ द मॅच’

मुंबई इंडियन्सतर्फे सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी दोन वेळा सामनावीर (मॅन ऑफ द मॅच) ठरण्याचा मान ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने मिळवला. या दुकलीशिवाय कणंधार रोहित शर्मा, लसित मलिंगा, अंबाती रायडू, लेंडल सिमन्स, मिचेल मॅकक्लेनॅघन आणि कीरॉन पोलार्डने प्रत्येकी एका सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. रोहित हा अंतिम फेरीत ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता.

एकूण षटकार ६९२, प्रत्येक सामन्यात सरासरी डझनभर

यंदा ६० लढतींमध्ये ६९२ षटकारांची नोंद झाली. सरासरी विचार केल्यास प्रत्येक सामन्यात १२ षटकार मारले गेले. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार = ख्रिस गेल, असे समीकरण आहे. आठवा हंगामही त्याहून वेगळा ठरला नाही. गेलने बंगळूरुतर्फे खेळताना १४ सामन्यांत ३८ षटकार ठोकले. तीसहून अधिक षटकार ठोकणारा गेल एकमेव फलंदाज आहे. दुस-या क्रमांकावर त्याचाच देशवासी अष्टपैलू कीरॉन पोलार्ड (मुंबई) आहे. त्याने १६ लढतींमध्ये २८ षटकार मारलेत. सर्वाधिक षटकार लगावणा-या अव्वल पाच फलंदाजांमध्ये बंगळूरुचा कर्णधार विराट कोहली आहे. त्याने १६ लढतींमध्ये २३ षटकार मारले.

एकूण संख्या १६०७, प्रत्येक लढतीत सरासरी २७ चौकार

आठव्या हंगामातील चौकारांची संख्या १६०७ इतकी आहे. सर्वच्या सर्व ६० लढतींचा विचार केल्यास प्रत्येक सामन्यामागे सरासरी २७ चौकार ठोकले गेले. सर्वाधिक चौकार ठोकण्यात ‘ऑरेंज कॅप’ ठरलेला सनरायझर्स हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर आघाडीवर आहे. त्याने १४ लढतींमध्ये ६५ चौकार ठोकलेत. दुस-या क्रमांकावर बंगळूरुचा एबी डेविलियर्स (६० चौकार) आहे. यंदाच्या हंगामात ५०हून अधिक चौकार लगावण्यात सहा फलंदाजांना यश आले. त्यात अजिंक्य रहाणेच्या (राजस्थान) रूपाने भारताचा एकमेव फलंदाज आहे. सर्वाधिक षटकार ठोकण्यात तो चौथ्या स्थानी आहे. अजिंक्यने १४ लढतींमध्ये ५३ चौकार मारलेत.

चेन्नईची उपविजेतेपदांची संख्या चारवर

रविवारी कोलकात्यात पराभूत व्हावे लागल्याने चेन्नई सुपर किंग्जची उपविजेतेपदांची संख्या चारवर गेली. पहिल्या मोसमानंतर (२००८) पाचव्या (२०१२) आणि सहाव्या (२०१३) हंगामात त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. मात्र कोलकाता आणि मुंबईने त्यांना जेतेपदांपासून रोखले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version