Home महामुंबई पालिका मुख्यालयात ‘भरत’ला प्रवेशबंदी!

पालिका मुख्यालयात ‘भरत’ला प्रवेशबंदी!

0

मुंबई महापालिकेतील मागील अनेक वर्षापासून कंत्राटदारांचा दलाल म्हणून वावरणा-या भरतभाईला अखेर महापालिका मुख्यालयात ‘प्रवेशबंदी’ करण्यात आली आहे.

मुंबई – मुंबई महापालिकेतील मागील अनेक वर्षापासून कंत्राटदारांचा दलाल म्हणून वावरणा-या भरतभाईला अखेर महापालिका मुख्यालयात ‘प्रवेशबंदी’ करण्यात आली आहे.

कंत्राटदारांना ब्लॅकमेल करून त्यांना नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारीवरून स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांनी भरतभाईला त्याच्या कार्यालयात बोलावून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. इतकेच नाही तर सुरक्षा अधिका-यांना त्याची ओळख पटवून यापुढे मुख्यालयात प्रवेश देण्यात येवू नये, असे बजावले.

भरतभाई व सपचे गटनेते रईस शेख यांच्यातील सलगी काही वर्षात वाढली आहे. या दोघांकडून होत असलेल्या त्रासाच्या तक्रारी कंत्राटदारांकडून आल्याने शांत स्वभावाच्या फणसेंनी उग्ररूप धारण केल्याचे बोलले जाते.

मुंबई महापालिकेतील विविध विकासकामांच्या निविदा काढल्यानंतर कमीत कमी बोली लावून पात्र ठरलेल्या कंपन्यांना कामे देण्यात येतात. मात्र पात्र कंपन्यांनी मंजुरीचे सर्व सोपस्कार सुरळीत पार पाडण्यासाठी कंत्राटदारांचा एक म्होरक्या काम करत असतो. मागील अनेक वर्षापासून पालिकेतील‘भरतभाई’ हा म्होरक्या सर्व कंत्राटदारांचे पालिकेतील सर्व घडी नीट घालून देण्यासाठी आर्थिक व्यवहार सांभाळत असतात.

त्यामुळे महापौर असो वा स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते असो वा गटनेते किंवा महापालिकेचे छोटे अधिकारी असो अथवा वरिष्ठ अधिकारी यांच्यात उठबस असल्याने भरतभाई पालिकेतील कंत्राटदारांचा मास्टरमाइंड मानला जातो. गेल्या काही वर्षापासून भरतभाईने सपचे गटनेते रईस शेख यांच्याशी सलगीस सुरूवात केली. त्यामुळे सपाच्या कार्यालयात कंत्राटदारांची गर्दी वाढू लागली आहे.

गेल्या काही दिवसांत रस्ते कंत्राटात एका कंत्राटदारालाच भरतभाईने ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्याकडे तक्रार केली होती. गुरुवारी फणसे यांनी भरतभाईला दालनात बोलावून त्याची खरडपट्टी काढली. त्यानंतर मुख्यालय इमारतीमधील सुरक्षा अधिका-याला बोलावून यापुढे भरतभाईला महापालिकेत प्रवेश देण्यात येऊ नये, असे निर्देशच
दिले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version