Home एक्सक्लूसीव्ह फेरीवाल्यांचे महापालिकेला ‘उघडे’आव्हान

फेरीवाल्यांचे महापालिकेला ‘उघडे’आव्हान

1

तब्बल दीड महिन्यापूर्वी दादरमधील केशवसुत उड्डाणपुलाखाली महापालिकेच्या वतीने बसवण्यात आलेले लोखंडी रेलिंगच फेरीवाल्यांनी तोडून टाकत पुन्हा एकदा पथारी पसरल्या आहेत. 

मुंबई – तब्बल दीड महिन्यापूर्वी दादरमधील केशवसुत उड्डाणपुलाखाली महापालिकेच्या वतीने बसवण्यात आलेले लोखंडी रेलिंगच फेरीवाल्यांनी तोडून टाकत पुन्हा एकदा पथारी पसरल्या आहेत. रात्रीच्या वेळी गर्दुल्ल्यांच्या मदतीने हे रेलिंग तोडून टाकत एक प्रकारे फेरीवाल्यांनी प्रशासनाला ‘उघडे’ आव्हान दिले आहे.

ज्या ठिकाणी रेलिंग बसवली आहेत, त्याशेजारीच शिवाजी पार्क पोलिसांची चौकी असून तेही डोळ्यावर पट्टी बांधून बसल्यामुळे रेल्वे प्रवासी आणि पादचा-यांनामात्र पुलाखालून मोठय़ा दिव्यातून जावे लागत आहे.दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावरील केशवसुत उड्डाणपुलाखालील सर्व गाळे रिकामे करून ते तोडण्यात आले.

[poll id=”746″]

हे सर्व गाळे तोडून तिथून वाहतूक सुरू करण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे तोडलेल्या गाळ्यांच्या ठिकाणी ना-फेरीवाला विभाग जाहीर करण्यात आला. तरीही या ठिकाणी मोठय़ा संख्येने फेरीवाले बसू लागले आहेत. एका बाजूला हे गाळे रिकामे करण्यात आलेले असतानाच दुसरीकडे रानडे मार्गावर जाणा-या पुलाखाली मोकळ्या जागेवर महापालिकेने लोखंडी रेलिंग बसवले होते.

दीड महिन्यापूर्वी बसवण्यात आलेले हे सहा रेलिंग आता तोडून टाकण्यात आले आहेत. स्थानकातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला एक रेलिंग पूर्णपणे काढून टाकण्यात आला, तर दुसरा अर्धवट तोडून ठेवण्यात आला. तर उजवीकडच्या बाजूला दुकानांच्या दिशेला तिन्ही रेलिंग अर्धवट तोडून टाकण्यात आले.

हे रेलिंग प्रवासी आणि पादचा-यांना सहजपणे बाहेर पडता यावे आणि फेरीवाल्यांनी ठाण मांडू नये म्हणून बसवण्यात आले होते. परंतु हे रेलिंगच फेरीवाल्यांनी तोडून टाकले आहेत. स्थानिक दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रेलिंग रात्रीच्या वेळेत तोडण्यात आले आहेत. काही गर्दुल्ल्यांना फेरीवाल्यांनी ते तोडायला सांगितले.

त्यासाठी त्यांना पैसेही दिले. शिवाय हे लोखंड विकून पैसे मिळणार असल्यामुळे गर्दुल्ल्यांनी टप्प्याटप्प्याने या रेलिंगचे भाग तोडून टाकले आहेत. या गाळ्यात पाटोळे, जाधव, सावकार आणि तपन शाह (बंगालीशेठ) यांच्या या जागा असून तेच जागा भाडय़ाने देऊन तिथे फेरीवाल्यांना बसवतात, असे समजते. त्यामुळे हे रेलिंग तोडण्यास हीच मंडळी कारणीभूत असावीत, असा अंदाज वर्तवला जात आहे.

या गाळ्याच्या शेजारीच शिवाजी पार्क पोलिस ठाण्याची चौकी असूनही त्यांच्याकडून या प्रकरणी कोणतीही दखल घेतली गेली नाही, की महापालिकेच्या अधिका-यांनीही या प्रकरणी कारवाई केली नाही. त्यामुळे प्रवासी आणि पादचा-यांना स्थानकातून ये-जा करण्यास जागाच शिल्लक नसल्यामुळे अनेकदा या फेरीवाल्यांशी लोकांचे खटकेही उडत आहेत.

यामुळे महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी महापालिकेने फेरीवाल्यांना रोखण्यासाठी पदपथावर झाडांच्या कुंडय़ा ठेवल्या होत्या. परंतु या कुंडय़ाही तोडून टाकत त्यावरच पथारी पसरून फेरीवाल्यांनी महापालिकेला आव्हान दिले होते. आता हे नवीन आव्हान जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांना दिले आहे. या आव्हानाचा समाचार आता महापालिका प्रशासन कशा प्रकारे देते, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

1 COMMENT

  1. ह्या फेरीवाल्यांनी ,महापालिकेने लावलेली झाडे उपटून टाकलीत,कुंड्याही फोडून टाकल्यांत, कारण,त्यांना ,माहित आहे,कि महापालिका त्यांचे काहीच उपटू शकत नाही ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version