Home महाराष्ट्र पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार

0

पुण्याच्या ग्रामीण भागात मात्र या अवेळी पावसामुळे द्राक्षासह टोमॅटो आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले.

पुणे- गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना सोमवारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला. पुण्याच्या ग्रामीण भागात मात्र या अवेळी पावसामुळे द्राक्षासह टोमॅटो आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, पिंपरीतील कासारवाडी येथे तीन ट्रक आणि दोन कार रस्त्यावर घसरल्याच्या घटना घडल्या.

थंडीचा कडाका कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. शहरातील काही ठिकाणी गाराही पडल्या. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन दिलासा मिळाला असला तरी चाकरमान्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. काही ठिकाणी वाहने घसरून पडल्याचा प्रकार घडला. अर्धा-पाऊण तास पडत असलेल्या पावसाने शहराला झोडपून काढले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुन्हा रिपरिप पावसाला सुरुवात झाली. या पावसाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा बहुतांश भाग व्यापला होता.

थंडी ओसरते आहे, तोच मस्त पावसाचा अनुभव शहरवासीयांना आला. सकाळपासूनच वातावरण ढगाळ असले तरी वातावरणात चांगलाच उकाडा होता. बाहेर ढगाळ हवामान असतानाच गारांचा पाऊस आला. आणि ओल्या मातीचा सुगंध वातावरणात दरवळला. हा पाऊस अनेकांची तारांबळ उडवणारा ठरला. वळवाचा पहिला पाऊस म्हणतच अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते.

बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोग पडण्याचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील थंडी काही प्रमाणात कमी झालेली असून आकाशात ढगांची वाढती वर्दळ हेच रोगराई पसरवण्याचे कारण ठरत आहे. याचा मुख्यत: ज्वारीच्या पिकावर मोठा परिणाम झालेला दिसत असून पीक काळे पडले आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतक-यांना सहन करावा लागत असल्याची परिस्थिती आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version