Home महाराष्ट्र कोकण पेण-अलिबाग रेल्वे मार्ग रखडला

पेण-अलिबाग रेल्वे मार्ग रखडला

0

मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणा-या अलिबागमध्ये रेल्वेचे आगमन व्हावे ही अलिबागकरांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे.

अलिबाग- मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणा-या अलिबागमध्ये रेल्वेचे आगमन व्हावे ही अलिबागकरांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. रायगडचे खासदार झाल्यानंतर अनंत गीते यांनी हा मार्ग करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या खासदारकीचा कालावधी संपला. ते पुन्हा निवडून येऊन केंद्रात मंत्री बनले, तरीही पेण-अलिबाग रेल्वेमार्गाचे काम सुरू झालेले नाही.

अलिबागला रेल्वे येण्यासाठी दिवंगत अ‍ॅड. दत्ताजीराव खानविलकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना पत्र पाठवले होते. अनंत गीते रायगडचे खासदार झाल्यानतर त्यांनी पेण-अलिबाग हा २९ किलोमीटरचा रेल्वेमार्ग टाकण्यात येईल व अलिबाग रेल्वेने जोडले जाईल, असे आश्वासन दिले.

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अलिबागला येऊन पाहणी केली. रेल्वे मंत्रालयाने त्याला मान्यताही दिली. सिडको आणि रेल्वे मंत्रालय यांच्या सहकार्याने पेण-अलिबाग रेल्वे मार्गाचे काम करण्यात येणार आहे. सहा वर्षे उलटून गेली तरी या रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात झाली नाही.

आरसीएफ प्रकल्पाने आपल्या मालवाहतुकीसाठी वडखळ ते आरसीएफ असा रेल्वेमार्ग टाकला आहे. या मार्गावरून ‘आरसीएफ’ची रेल्वे वाहतूक सुरू आहे. मालवाहतुकीसाठी टाकलेला आपला रेल्वेमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्याचा प्रस्ताव ‘आरसीएफ’ने रेल्वेकडे ठेवला आहे. त्याचे सर्वेक्षण करून हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही हे ठरवले जाणार आहे.

पेण-अलिबाग रेल्वे मार्गासाठी ३३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी आपण लवकरच चर्चा करणार आहोत, असे रायगडचे खासदार तथा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version