Home महामुंबई ठाणे पोलादपूरमध्ये भीषण पाणीटंचाई

पोलादपूरमध्ये भीषण पाणीटंचाई

1

एप्रिल महिन्यात दोन वेळेस पडलेल्या पावसामुळे शेतक-यांचे नुकसान झाले. मात्र, पाणीटंचाई लांबली.

पोलादपूर – एप्रिल महिन्यात दोन वेळेस पडलेल्या पावसामुळे शेतक-यांचे नुकसान झाले. मात्र, पाणीटंचाई लांबली. मात्र, त्यानंतर चढत्या तपमानामुळे नदी, नाले, ओढे कोरडेठाक पडले आहेत. आतापर्यंत ३ गावे, ५० वाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडला आहे. यात दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावपाडय़ांची संख्या अधिक असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकावे लागत आहे.

सद्यस्थितीत कातळी बंगला, पवारवाडी, काळवली, भोसलेवाडी, विठ्ठलवाडी, महाळगूर-मोरेवाडी, गोळेगणी, पिंपवळवाडी, आंबेमाची, पळचीळ-धनगरवाडी, कोसमवाडी, चिरेखिंड, महाळगूर, तामसरे, वाकण, वाडूवाडी, धामणेचीवाडी, सुरावाडी, गावठाण, सानेवाडी, बाबरवाडी, भगतवाडी, कदमवाडी, केवनाळे, पळचीळ-जळाचीवाडी, किनेश्वर-पेडावाडी, बोरघर-बौद्धवाडी, वाकण-बौद्धवाडी, वडघरबुद्रुक, कामचे आदिवासीवाडी, जांभाडी, कोडचे खोंड, चाळीचा कोंड, काळवली-तिवडेकर मोहल्ला, पाटीलवाडी, वळीके मोहल्ला, बौद्धवाडी, कुंभळवणे, क्षेत्रफळ, आमळेवाडी, तुटवली, धनगरवाडी व बौद्धवाडी, महादेवाचा मुरा, येळंगेवाडी, वडघर-सणसवाडी, देऊळवाडी, फौजदारवाडी, गोवेले, तळ्याची वाडी, जननीचा माळ, बारमाची, मोरसडे, पोकळ्या, चामुरा, देवळे, दाभीक, भोगाव-पार्टेवाडी या वाडय़ांसह साळवीकोंड, चांभारगणी बुद्रुक, गोवळे अशा ३ गावे व ५० वाडपाडय़ांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. या गाववाडय़ांना दोन दिवसाआड ४ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोलादपूर पंचायत समितीकडून पुरवण्यात येते, अशी माहिती गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी दिली.

मागील दहा वर्षात पाणीटंचाई निवारण कृती आराखडयाचा मागोवा घेतला. तर या गाववाडय़ांवर विंधन-विहिरी, विहिरींची दुरुस्ती, साठवण टाकी, नळ पाणीपुरवठा योजना, छोटे तलाव आदी विकासकामांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, आजमितीस एकाही गाववाडीची पाणीटंचाईची समस्या सोडवण्यास पूर्ण अपयश आले आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाची उदासीनता, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे तहानलेल्या गाव वाडय़ांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

1 COMMENT

  1. आमच्या क्षेत्रपाल आमलेवाडी मधेही दर वर्षी पाणी टंचाई असते. एप्रिल ते मे या दोन महिन्यात दर वर्षी पाणी टंचाई असते, ही पाणी टंचाई दुर करण्याकरीता काय तरी केल पाहिजे, असे माझे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version