Home महामुंबई प्रवाशांच्या मोबाईलवर चोरांची नजर

प्रवाशांच्या मोबाईलवर चोरांची नजर

0

रेल्वे स्थानकात गर्दी असल्याने घाई-घाईत लोकल ट्रेनमध्ये चढत आहात? मग जरा जपून. कारण तुमच्या खिशातील मोबाईल फोनवर चोरांची नजर आहे.

मुंबई- रेल्वे स्थानकात गर्दी असल्याने घाई-घाईत लोकल ट्रेनमध्ये चढत आहात? मग जरा जपून. कारण तुमच्या खिशातील मोबाईल फोनवर चोरांची नजर आहे. पूर्वी पाकीट मारणारे हे चोर आता मोबाईल चोरीकडे वळले आहेत.

प्रगत तंत्रज्ञानामुळे सध्या प्रत्येक प्रवाशाच्या खिशात स्मार्टफोन पाहावयाला मिळतो. या मोबाईल फोनवर डल्ला मारण्याचा प्रयत्न चोरांकडून केला जात आहे. यामध्ये ठाणे, कुर्ला, वडाळा, वाशी या स्थानकांमध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

सध्या प्रवाशांमध्ये एटीएम कार्ड वापरण्याचे प्रमाण वाढल्याने पाकीटमार चोरांनी मोबाईल चोरीची हातसफाई सुरू केली आहे. गर्दीत प्रवाशांचे मोबाईल सहजरित्या लंपास करता येत असल्याने आणि मोबाईल विकून त्याचा चांगला मोबदला मिळत असल्याने मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मात्र, प्रवाशांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून आपले मोबाईल सांभाळून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

मागील वर्षभरात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १ हजार ६८७ मोबाईल चोरीला गेल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे करण्यात आली असून त्यामधील ९१९ मोबाईलचा शोध घेण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. कुर्ला स्थानकात सर्वाधिक २८४ तर ठाणे स्थानकात २७८ आणि वडाळा स्थानकात २०३ मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

तर मागील महिनाभरात सीएसटी विभागात ४५, कल्याण विभागात ३६, वांद्रे ५१ आणि वसई विभागात १९ मोबाईल चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, स्थानकातील प्रवाशांची गर्दी हेरून चोरटे मोबाईल लंपास करीत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version