Home संपादकीय विशेष लेख सत्ताधारी निवडणुकीत, शेतकरी कुटुंब स्मशानात

सत्ताधारी निवडणुकीत, शेतकरी कुटुंब स्मशानात

1

महाराष्ट्रातील दुष्काळात कडोलोट झाला आहे. त्यात सरकारच्या संवेदनाहीनतेने परीसीमा गाठली आहे. आपल्या पाठीशी कुणी तरी आहे, असा दिलासा देण्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार अपयशी ठरले आहे. 

महाराष्ट्रातील दुष्काळात कडोलोट झाला आहे. त्यात सरकारच्या संवेदनाहीनतेने परीसीमा गाठली आहे. आपल्या पाठीशी कुणी तरी आहे, असा दिलासा देण्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार अपयशी ठरले आहे. आतापर्यंत शेतक-यांच्या आत्महत्या होत होत्या; मात्र आता ते लोण कुटुंबापर्यंत पोहोचत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी बुटीच्या एका शेतक-याने आत्महत्या केल्यानंतर त्याची पत्नी असणारी शांताबाई ताजणे हिने आपले जीवन संपवले. म्हणजे शेतक-यापर्यंत आत्महत्या न थांबता ती हतबलता शेतक-याच्या पत्नीपर्यंत गेली आणि आता या परिस्थितीने पुढचा टप्पा गाठला असून लातूर जिल्ह्यात एका शेतक-याच्या मुलीला महाविद्यालयात जाण्यासाठी केवळ २६० रुपये एसटी पाससाठी नव्हते म्हणून तिने आत्महत्या केली. दुर्दैवाची बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर १२ दिवसानंतरही त्या मुलीच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी एकही सरकारी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी पोहोचला नाही.
महाराष्ट्रातील ना पिकी, त्यामुळे सावकारी पाशात अडकलेला शेतकरी आणि त्यातून होणा-या आत्महत्या हे दुष्टचक्र गेल्या अनेक वर्षापासून घोंगावत आहेत; परंतु राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार आल्यापासून शेतक-यांच्या आत्महत्येमध्ये वाढ तर झाली आहेच, पण आता हे संकट फक्त शेतक-यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहे.

गेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी बुटी गावातील ताजणे नावाच्या शेतक-याने आत्महत्या केली होती. त्या शेतक-याच्या कुटुंबाला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटही दिली होती. मात्र त्यानंतरही निगरगठ्ठ अधिका-यांनी त्या शेतक-याच्या कुटुंबाकडे संवेदनशीलतेने पाहिले नाही. म्हणून त्या महिलेच्या खात्यात जमा झालेली रकम कशी काढायची, याची माहिती अधिका-यांनी तिला दिली नाही.

७० हजाराच्या कर्जासाठी सावकार दारावर येत होता आणि तिला सरकारी अधिका-यांकडून योग्य दिलासा मिळत नव्हता. अखेर सावकाराच्या रोजच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी एखाद्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर जर त्या कुटुंबाला न्याय मिळत नसेल तर इतर लोकांच्या बाबतीत अधिकारी कसे वागत असतील, असा प्रश्न पडू शकतो.

शेतकरी आत्महत्येचे हे लोण आता त्या शेतक-याच्या पत्नीपासून ते आता मुला-बाळापर्यंत पोहोचले की काय, अशी शंका येण्यासारखी अत्यंत हृदयद्रावक परिस्थिती लातूर जिल्ह्यात समोर आली आहे. एसटीच्या पासला लागणारे पैसे नसल्यामुळे स्वाती विठ्ठल पिटले या १६ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. आपल्या कुटुंबावर ओढवलेल्या अगतीक परिस्थितीचे वर्णन तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केले आहे.

मराठवाडयावर गेल्या चार वर्षापासून दुष्काळाचे सावट आहे. या वर्षीची परिस्थिती तर अत्यंत भीषण आहे. विशेषत: लातूर, उस्मानाबाद आणि बीड या दोन जिल्ह्याची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. येथे आत्महत्येच्या घटनाही वाढलेल्या आहेत. अशा वेळी त्या भागावर जरा सरकारने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

केवळ संकटाने कुणीही आत्महत्या करीत नाहीत, तर आपण एकटे आहोत आणि या संकटात आपल्या मदतीला कुणीही नाही, ही भावना अनेकदा आत्महत्येकडे घेऊन जाते. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील गोढाळा हे खेडे गाव. या गावात विठ्ठल पिटले हे आपल्या कुटुंबासह राहतात. एक मुलगा आणि दोन मुली असे त्यांचे कुटुंब आहे. विठ्ठल पिटले यांना मोजकीच जमीन आहे.

आपल्यासह इतर शेतक-यांच्या जमिनीची मशागत करणे, शेतमालाची वाहतूक करून त्यातून कुटुंबाला हातभार लावावा म्हणून विठ्ठल पिटले यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून ट्रॅक्टर घेतले होते. त्याशिवाय शेतीच्या कामासाठी घेतलेले दोन लाखांचे कर्ज होते ते वेगळेच. दिवस-रात्र मेहनत करून आपण ट्रॅक्टरचे हप्ते फेडू, शेतीच्या उत्पन्नातून घर खर्च भागेल, अशी पिटले यांची अपेक्षा होती.

मात्र प्रत्यक्षात गेल्या चार वर्षापासून मराठवाडयाला दुष्काळाने होरपळून काढले. शेतीतून अपेक्षित उत्पन्न निघत नव्हते. इतर शेतक-यांनाही उत्पन्न मिळत नसल्याने ट्रॅक्टरलाही काम मिळत नव्हते. त्यातूनच ट्रॅक्टरच्या कर्जाचे हप्ते वेळेवर गेले नाहीत. फायनान्स कंपनीचे वसुली एजंट येऊन पैशांसाठी तगादा लावत होते. गावात चार-चौघांसमोर त्यांची बेअब्रू होत होती, हे त्यांची कन्या स्वाती पाहत होती.

अखेर पैसे येण्याची शक्यता कमी असल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर जप्त केला. याचा मोठा धक्का पिटले कुटुंबाला बसला. राहिलेल्या खासगी कर्जासाठीही सावकाराचा तगादा सुरूच होता. कुटुंबाची होणारी ओढाताण पाहून विठ्ठल पिटले यांच्या मुलाने शिक्षण सोडून दिले आणि कामाच्या शोधात तो पुण्याला गेला. तिथे तो अत्यंत कमी पगारावर एका कंपनीत काम करीत आहे. पिटले यांची मोठी मुलगी बीएच्या दुस-या वर्षात शिक्षण घेत आहे तर धाकटी स्वाती अकरावीच्या वर्गात शिकत होती.

जवळच असणा-या किनगाव येथे ती अकरावीच्या वर्गात शिकत होती. गोढाळा येथून किनगावपर्यंत तिला दररोज एसटीच्या बसने प्रवास करावा लागत होता. गोढाळा ते किनगाव एसटीच्या पाससाठी तिला दर महिन्याला २६० रुपये खर्च येत असे. मात्र यावेळी पास संपला तेव्हा पुढचा पास काढण्यासाठी घरात पैसे नव्हते. तरीही तिच्या आईने सांगितले की, दोन-तीन दिवसांत मजुरीचे पैसे आले की, आपण पास काढू; परंतु या वर्षी पाऊस न झाल्यामुळे रब्बीची पेरणी झाली नाही, ज्या काही शेतात पेरणी झाली तिथले पीक करपून गेले.

आता रब्बीच्या पेरणीसाठी तर पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतातही मजुरीची कामे मिळेनात. मुलीच्या पासासाठी पैसे मिळवण्यासाठी स्वातीच्या आईने खूप धडपड केली. आईची धावपळ, वडिलांची धमछाक यामुळे तिच्या कोवळया मनावर खोल परिणाम झाला आणि १४ ऑक्टोबर २०१५ रोजी तिने कापसावर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती वाचल्यानंतर पाषाण हृदयाच्या माणसालाही पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. तिने लिहिले आहे. ‘बाबा, दादा, घरची परिस्थिती आता मला पाहावत नाही.

दादा हुशार असतानाही त्याला केवळ पैशावाचून शिक्षण अर्धवट सोडावे लागले. माझ्या पाससाठी आईला दगदग करावी लागली. ताई लग्नाला आल्याचे टेन्शन बाबांच्या चेह-यावर दिसते. एसटीच्या पाससाठी पैसे नसल्यामुळे मी गेल्या पाच दिवसांपासून कॉलेजला जाऊ शकलेली नाही. तुमची होणारी घालमेल मला पाहावत नाही. म्हणून मी हे जग सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही एकुलत्या एका ताईचे शिक्षण पूर्ण करा आणि तिचे थाटात लग्न करून द्या.’

एका मुलीला केवळ २६० रुपयांसाठी आत्महत्या करावी लागते आणि त्यापेक्षा खेदाची गोष्ट म्हणजे १२ दिवस उलटून गेल्यानंतरही एकही लोकप्रतिनिधी किंवा सरकारी कर्मचारी त्या कुटुंबाला जाऊन भेटत नाही. त्यांना दिलासा देत नाही. कारण सत्ताधारी नेत्यांना आता लोकांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ नाही. कारण त्यांना कल्याण-डोंबिवली, कोल्हापूरची महानगरपालिका आणि अन्य नगरपालिकांच्या निवडणुका जिंकायच्या आहे. नेते प्रचारात गुंतले आहेत आणि शेतकरी आणि त्यांचे कुटुंब स्मशानात जात आहेत. ही आजच्या महाराष्ट्राची भीषण अवस्था आहे.

1 COMMENT

  1. महाराष्ट्रातील दुष्काळात कडोलोट झाला आहे. त्यात सरकारच्या संवेदनाहीनतेने परीसीमा गाठली आहे. आपल्या पाठीशी कुणी तरी आहे, असा दिलासा देण्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार अपयशी ठरले आहे. कारण त्यांना कल्याण-डोंबिवली, कोल्हापूरची महानगरपालिका आणि अन्य नगरपालिकांच्या निवडणुका जिंकायच्या आहे. नेते प्रचारात गुंतले आहेत आणि शेतकरी आणि त्यांचे कुटुंब स्मशानात जात आहेत. ही आजच्या महाराष्ट्राची भीषण अवस्था आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version