Home महाराष्ट्र कोकण फसवणूक करून मिळवली परवानगी

फसवणूक करून मिळवली परवानगी

0

‘विजय सावंत शुगर अँड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट’ या साखर कारखान्यासाठी परवानगी मिळवताना राज्य आणि केंद्र सरकारची फसवणूक करून कारखान्याला परवानगी मिळविली आहे, असा गौप्यस्फोट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केला.
कणकवली – आमदार विजय सावंत यांनी शिडवणे येथे ‘विजय सावंत शुगर अँड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट’ या साखर कारखान्यासाठी परवानगी मिळवताना राज्य आणि केंद्र सरकारची फसवणूक करून कारखान्याला परवानगी मिळविली आहे, असा गौप्यस्फोट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केला.

विजय सावंत यांची सव्‍‌र्हे नं. १७३१ मध्ये फक्त ४३ गुंठे जमीन आहे. तर सव्‍‌र्हे नंबर १७८८ ही जागा ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ मठ खुर्द यांच्या मालकीची असून, ती जागा स्वत:ची आहे, असे दाखवत ही परवानगी त्यांनी मिळविली आहे. या कामासाठी त्यांनी शिडवणे येथील मंडल अधिका-याला हाताशी धरून खोटय़ा पद्धतीने नोंदणी केली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला चुकीची माहिती त्यांनी फसवणूक केली असल्याचे यावेळी तेली यांनी सांगितले.

एखादा साखर कारखाना काढण्यासाठी दोन कारखान्यांमधील हवाई अंतर २५ किलोमीटरपेक्षा जास्त असावे ही महत्त्वपूर्ण अट असते. मात्र, सावंत यांनी गगनबावडा साखर कारखान्यापासूनचे हवाई अंतर २५ किलोमीटरपेक्षा जास्त भरावे यासाठी ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक मंडळाची जमीन ही आपलीच आहे, असे कागदोपत्री दाखवून साखर कारखान्याची निशाणी रोवली. ज्या ठिकाणी साखर कारखान्याची ‘चिमणी’ बसणार आहे तो स्तंभ ब्राह्मणेश्वर मंडळाच्या जागेत आहे. ही जागा साखर कारखान्याला देण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही किंवा अद्यापपर्यंत तशा प्रकारची परवानगीही घेतलेली नाही, असा आरोप तेली यांनी केला.

तेली पुढे म्हणाले की, साखर कारखाना व्हावा मात्र त्यात फसवणूक होऊ नये, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र, ज्या ठिकाणी साखर कारखाना मंजूर झाला आहे, त्याठिकाणी पाण्याची परिस्थिती फारच गंभीर आहे. त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पाण्याची टंचाई असल्याची माहिती कणकवली पंचायत समितीच्या सभापतींनीही दिलेली आहे. त्यामुळे साखर कारखान्याला परवानगी मिळाली म्हणजे साखर कारखाना उभा झाला, असे होत नाही. साखर कारखान्याबरोबरच अन्य उत्पादने घेण्यासाठी प्रतिदिवशी सात लाख लिटर पाण्याची गरज अपेक्षित आहे. हे पाणी कसे उपलब्ध करणार याबाबत कोणतेही नियोजन नाही. मोठ्या प्रमाणात समभाग विकण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात उसाचे क्षेत्र आणि एक लाख २० हजार टन एवढे होणारे उसाचे उत्पादन लक्षात घेता साडे तीन लाख टन ऊसनिर्मिती जेव्हा होईल तेव्हाच साखर कारखाना चालवणे फायद्याचे ठरेल. शिवाय डी. वाय. पाटील साखर कारखाना, भोगावती आणि गवसे साखर कारखाना यांच्याशी जिल्ह्यातील ऊस उत्पादन शेतकऱ्यांचे करार झाले आहेत. त्यामुळे उत्पादनाचीही मर्यादा या साखर कारखान्यांवर येणार आहे.

तरीही हा साखर कारखाना सुरू होण्यासाठी त्या पद्धतीने आराखडा करण्यात आला किंवा अन्य परवानग्या घेणे गरजेचे होते. ते काम अद्याप झालेले नाही याचा अर्थ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाच्या हेतूने या साखर कारखान्याचे काम विजय सावंत आणि जिल्ह्यातील विरोधक करत आहेत. प्रतिदिवशी साखर कारखान्याला लागणारा पाण्याचा प्रश्न, त्या संदर्भातील व्यवस्था या गोष्टी बाजूला सारून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारखान्यातील यंत्रसामुग्री, शेड किंवा अन्य बांधकामाविषयी कोणत्याही प्रकारची प्रगती नसताना समभाग विकून, विरोधकांना हाताशी धरुन विजय सावंत हे राजकारण करत आहेत. तसेच आमदार सावंत हे सूडबुद्धीने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याबाबत अपप्रचार करत आहेत. हे सर्व आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील विरोधकांच्या संगनमताने सुरू असलेले षड्यंत्र असल्याचा आरोप तेली यांनी केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version