Home मध्यंतर भन्नाट बाणकोट ऊर्फ हिंमतगड

बाणकोट ऊर्फ हिंमतगड

1

हरिहरेश्वरजवळ सावित्री नदी सागराला मिळते त्या ठिकाणी सागरतीरी खाडीच्या मुखाशी एका टेकडीवर बाणकोट हा एक छोटेखानी पण बळकट प्राचीन दुर्ग उभा आहे. बाणकोट किल्ल्याचं दुसरं नाव ‘हिंमत गड’. लहान असला तरी त्याचा इतिहास खूप मोठा आहे. शिवकाळात हिंमतगड आदिलशाहीत होता. त्यानंतर तो पेशवे आणि पुढे इंग्रजांनीही ताब्यात घेतला होता. सागराच्या साक्षीनं, वारा अंगावर घेत केलेला हा बाणकोटचा फेरफटका मनाला निवांत करून गेला.

पिल्नी या ग्रीक तज्ज्ञानं इसवीसनाच्या पहिल्या शतकात मंदगोर किंवा मंदारगिरी या नावाने बाणकोटचा उल्लेख केलेला आहे. बाणकोटहून तराफ्याने खाडी ओलांडून आपण बागमांडल्याला आल्यावर जवळच पेशव्यांचं कुलदैवत हरिहरेश्वर हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्व असलेलं क्षेत्र आहे. हरिहरेश्वर हे माझ्या मोठय़ा साडूंचे प्रकाश क्षीरसागरांचे गाव. मे महिन्याच्या सुट्टीत त्यांच्या गावच्या घरी जातोच. या वेळी आम्ही चांगली आठ दिवसांची सहलच आयोजित केलेली होती.

शुक्रवारी सकाळी बरोबर सहा वाजता आम्ही सारे जण बोरिवलीला क्षीरसागरांच्या घरी जमलो. सकाळी सात वाजता आम्ही हरिहरेश्वरसाठी प्रयाण केलं. दुपारी एक वाजता आम्ही मांडगावला पोहोचलो. मांडगाव ते हरिहरेश्वर हे अंतर ५६ कि.मी. एवढं आहे. हा प्रवास पूर्णपणे वळणावळणाच्या घाटांचा आहे. या वाटेवर करवंद, रायवळ आंबा, काजू व इतर जंगली झाडांचं गच्च रान आहे. साई मोरबा वाटेने आम्ही डोंगरमाथ्यावर येताच ठिकठिकाणी करवंदांच्या जाळीवर काळीभोर करवंदं लगडलेली पाहताच आम्ही सारे लहान मुलांप्रमाणे गाडी थांबवून उडय़ा मारत करवंदं काढायला धावत सुटलो. मनमुराद करवंदं तोडली. खाता येतील तेवढी खाऊन उरलेली सोबत घेतली. शेवटी मोहाला आवर घालून पुढील प्रवासास निघालो. प्रवासात कोणतंही विघ्न न येता सुखरूपपणे दुपारी चार वा. आम्ही घरी पोहोचलो. क्षीरसागरांचे घर मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आहे. थोडा आराम करून संध्याकाळी हरिहरेश्वराचे दर्शन घ्यायला मंदिरात निघालो. हरिहरेश्वर हे स्थान नेहमीच पर्यटकांनी गजबजलेलं असतं. पुरातन काळी साक्षात अगस्ती ऋषींनी या देवांची येथे स्थापना केली होती, अशी आख्यायिका आहे. देवांचे दर्शन घेऊन ब्रह्माच्या डोंगराला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघालो. मंदिराच्या पाठीच काही पाय-या चढून आम्ही ब्रह्माच्या डोंगरावर पोहोचलो. इथे दोन्ही डोंगराच्या मधून खाली उतरण्यासाठी दगडी पाय-यांचा जिना आहे. त्यावरून आम्ही खाली उतरलो. तिथे आम्ही शुक्लतीर्थ पाहिले. विष्णुपद पाहिले. सागराच्या लाटांनी सगळा डोंगर पोखरून काढला आहे. सागराच्या पाण्याने दगडावर कोरलेले ते अप्रतिम जाळीदार नक्षीकाम पाहून आपण आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. सागराचे ते विशाल रूप पाहून भान हरपून जातं. समुद्र किना-यावरच्या कातळावर आम्ही सागरांच्या लाटांचा खेळ पाहत रमून गेलो. संध्याकाळचा सूर्यास्त पाहून आम्ही घरी परतलो.

आसमंतात अधिक काळोख होण्याच्या आत आम्ही गाडीने बागमांडल्याला निघालो. हरिहरेश्वरच्या पाठीजवळच दोन कि. मी. अंतरावर बागमांडला आहे. आम्ही बागमांडल्याला खाडीच्या जेट्टीवर पोहोचलो तेव्हा चहुबाजूंनी काळोख दाटून आला होता. किना-यावर सर्वत्र शुकशुकाट होता. बाणकोटच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणारा तराफा दूर जाताना दिसत होता. खाडीच्या पलीकडे डोंगरावर गच्च झाडीमधून विजेचे दिवे लुकलुकताना दिसत होते. थोडा वेळ आम्ही जेट्टीवरच थांबलो. तराफ्याच्या परतीच्या प्रवासात मासे मिळतील हीच आशा होती. आम्ही तराफ्याची वाट पाहत थांबलो. अध्र्या तासाने तराफा बाणकोटवरील माणसांना त्यांच्या वाहनांसकट घेऊन बागमांडल्याच्या किना-यावर लागताच त्यातून बरेच प्रवासी लगबगीने बाहेर येऊ लागले. त्यातील आठ-दहा तरुण मोटारसायकल घेऊन एक-एक करत आमच्या शेजारी येऊन उभे राहिले. त्यांच्यापाठीवर जड सॅक व ट्रेकिंगचं बरेचसं सामान होतं. त्यांना पाहून मी मासे विसरून गेलो. मी सरळ त्यांच्यातल्या एकापाशी जाऊन ओळख करून घेतली. मी पण गड, किल्ले फिरतो म्हणताच तिथेच आमचा गोतावळा जमला. ते सारे जण कोल्हापूरहून कोकणातल्या सागरी किल्ल्यांच्या सफरीवर आले होते. आता ते सारे जण समोरच्याच डोंगरावर असणारा बाणकोटचा किल्ला सर करून हरिहरेश्वरला वास्तव्याला आले होते. हरिहरेश्वरपासून एवढय़ा जवळ बाणकोटचा किल्ला आहे हे मला तेव्हा माहीत नव्हतं. आज मी चोवीस ते पंचवीस वष्रे हरिहरेश्वरला येतो आहे, पण मला बाणकोटचा किल्ला पाहता आला नव्हता. बाणकोटची माहिती घेऊन त्या दुर्गवीरांचा निरोप घेतला, तो मनात एकच निर्णय करून की सर्वप्रथम उद्या बाणकोटचा किल्ला सर करायचाच.

बाणकोटचा किल्ला सर करण्यासाठी आम्ही सर्वानी शनिवारी दुपारी तीन वाजता बागमांडल्याकडे कूच केलं. जेट्टीवर तराफा बाणकोटला जाण्यासाठी तयारच होता. आमच्या गाडीसकट आम्ही तराफ्यात चढलो. दहा मिनिटांतच खाडी पार करून आम्ही बाणकोटच्या किना-यावर उतरलो. सुरुवातीला कच्च्या वाटेने आमचा प्रवास सुरू झाला. पण लवकरच उभ्या चढणीच्या वाटेवर आमची गाडी धावू लागली. रस्ता खूपच खराब होता. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा गडाच्या पायथ्यापर्यंत कलमी आंब्यांची बागायत होती. झाडांवर हाताला लागतील एवढय़ा अंतरावर आंबे लगडले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. समुद्राचे पाणी व डोंगर तापून वातावरण भयंकर तप्त झालेले होते.

अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. शरीराची लाही-लाही होत होती. शेवटी आम्ही गड माथ्यावर येऊन पोहोचलो. येथे गडाच्या समोरच डाव्या हाताला किल्ले बणकोट हे गाव दिसतं. गावाच्या वेशीवरच वडाचे प्रचंड झाड मुळासकट उन्मळून पडलेलं होतं. विशेष म्हणजे तरीसुद्धा ते जिवंत होतं. उजव्या हाताला किल्ले बाणकोट दिसत होता. किल्ल्याच्या तटबंदीच्या खाली सावलीत गाडी उभी करून गड पाहण्यास निघालो. डाव्या हाताला तटबंदीच्या कडेकडेने दोन मिनिटे चालत गेल्यावर आम्ही बाणकोटच्या प्रवेशद्वारात पोहोचलो. प्रवेशदार पाहून आम्ही थक्क झालो. आजही प्रवेशद्वार, दाराची कमान रेखीव व सुस्थितीत आहे. चि-याचे आयताकृती दगड तासून चुनखडीच्या लेपावर एकावर एक बसवून तटबंदी व बुरूज उभारलेले आहेत. बाणकोटचा दरवाजा दक्षिणाभिमुख असून खाली समोर अथांग समुद्र पसरलेला आहे. सूर्याच्या प्रखर किरणांनी समुद्राचे पाणी चमचम चमकत होते. प्रवेशदारातून आत आल्यावर दोन्ही हाताला गोलाकार देवडय़ा आहेत. प्रवेशदाराच्या समोरच प्रशस्त मोकळे आवार आहे. उजव्या हाताच्या देवडीत छोटी िभत उभारून सहा छोटे हौद बांधलेले दिसतात. बाणकोट हा तसा छोटेखानी आयताकृती किल्ला आहे. मात्र याची तटबंदी प्रशस्त व खणखणीत आहे. चारचाकी छोटे वाहन आरामात या तटबंदीवरून जाईल एवढी ही तटबंदी रुंद आहे. तटावर चढण्यासाठी उजव्या हाताला प्रशस्त दगडी जिना आहे. प्रवेशदाराच्या उजव्या हाताला तटबंदीच्या खाली एक दालन पाहायला मिळतं. या दालनात दगड, माती पडून ते बरेचसे गाडले गेलेले आहे. तिथून थोडं पुढे गेल्यावर दक्षिण दिशेच्या तटबंदीत गडाचा दुसरा छोटा दरवाजा पाहण्यास मिळतो. या दरवाजातून खाली उतरण्यास पाय-या आहेत. खाली आल्यावर तिथे एक मोठी विहीर पाहायला मिळते. पण माती व दगड पडून विहीर अर्धी अधिक बुजलेली आहे. या ठिकाणी एक मोठा बुरूज बांधलेला आहे. या बुरुजाला एक चोरवाट आहे. तसंच तिथे छोटा खंदकही पाहायला मिळतो. चोरवाटेच्या थोडं पुढे तटाला लागूनच एक दालन पाहायला मिळतं. किल्ल्याच्या आत बरेच उद्ध्वस्त अवशेष आहेत. तसेच काही ठिकाणी शेंदूर फासलेले देवसदृश्य दगड रचून ठेवलेले आहेत. त्यावर भगवे ध्वज लावलेले आहेत. प्रत्येक बुरुजांवर तोफांसाठी मोठमोठय़ा जंग्या, झरोके ठेवलेले आहेत. पण तोफा मात्र नजरेस पडत नाहीत. किल्ल्याच्या आत आवारात प्रचंड मोठमोठी झाडे वाढलेली आहेत. इतर गड, किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्याच्या तटबंदीला व बुरुजांना बांडगूळ, झाडांच्या मुळांचा विळखा पडलेला आहे. त्यांची वेळीच छाटणी करायला हवी. गडाचा विस्तार तसा लहान आहे. गड पाहायला जास्त वेळ लागत नाही. गडाच्या तटबंदीवरून चौफेर एक प्रदक्षिणा मारून थकून-भागून घामाघूम होऊन आम्ही सारे प्रवेशद्वाराच्या दरवाजात सागरावरून येणा-या भन्नाट वा-यावर सागराचे विलोभनीय दृश्य पाहण्यात गुंग झालो. सांज वेळ झाली होती. सूर्यनारायण मावळतीकडे झुकू लागला होता. आसमंतात काळोख दाटून आला होता. निरव शांतता, बेधूंद वारा, या प्रसन्न वातावरणातून उठू नये, असंच वाटत होतं. पण जेट्टीवर तराफा वाट पाहत होता. त्याची शेवटची फेरी संपायच्या आत आम्हाला पोहोचायचं होतं. डोळेभरून बाणकोटला नजरेत सामावून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. 

बाणकोट किल्ला लहान असला तरी त्याचा इतिहास खूप मोठा आहे. या गडाचं दुसरं नाव ‘हिंमत गड’. शिवकाळात हिम्मतगड आदिलशाहीत होता. आदिलशहाकडून शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. संभाजी महाराजांच्या वधानंतर बाणकोट व मंडणगड जंजिरेकर सिद्दीने जिंकून घेतलं. पेशव्यांनी सिद्दीविरुद्व मोहीम उघडेपर्यंत सन १७३३ पर्यंत हा गड सिद्दीच्याच ताब्यात होता. पुढे सन १७३३ मध्ये पेशव्यांचे पराक्रमी सरदार बंकाजी महाडिकने बाणकोट सिद्दीकडून काबीज केला. लगेचच दोन वर्षानी सिद्दीने आरमरी हल्ला करून सन १७३५ मध्ये बाणकोट पुन्हा जिंकून घेतला. पुढे पेशव्यांचे शूर सरदार पिलाजीराव जाधवांनी १७३६ ला बाणकोट जिंकून घेतला. मराठय़ांनी या छोटय़ा गडाचे महत्त्व लक्षात घेऊन गडाच्या संरक्षणासाठी ८०० लोकांची नेमणूक करून खबरदारी घेतली होती. पुढे बाणकोट आग्य्रांच्या ताब्यात आला. पेशवे व तुळाजी आंग्रे यांचे बिनसल्यानंतर पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने तुळाजीचा पराभव करून त्याचे आरमार नष्ट केलं. ऑक्टोबर १७५६ मध्ये पेशवे व इंग्रज यांच्यात तह होऊन पेशव्यांनी हा गड व आजूबाजूची गावे इंग्रजांना दिली. इंग्रजांनी बाणकोट ऊर्फ हिंमतगडाचे ‘फोर्ट व्हिक्टोरिया’ असं नामकरण केलं. पुढे इंग्रजांनी बाणकोट त्यांना फायदेशीर ठरत नसल्याचं पाहून बाणकोट पेशव्यांना परत दिला. पुढे डिसेंबर १८१७ मध्ये सिद्दीच्या दोनशे लोकांची मदत घेऊन इंग्रजांनी हिम्मतगड ऊर्फ बाणकोट कायमचा मराठय़ांकडून जिंकून घेतला तर अशा या शिवकालीन गडाला धारक-यांनी एकवार अवश्य भेट द्यावी.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version