Home संपादकीय अग्रलेख बेशरम! विरुद्ध प्रामाणिक!!

बेशरम! विरुद्ध प्रामाणिक!!

1

विजय मल्ल्या पळाला. तो पळणारच होता. एकटा मल्ल्या नव्हे, तर आणखीन पाच-पंचवीस उद्योगपती असेच पळणार आहेत. ज्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांचे तीन लाख कोटी कर्ज नुसते ठकवले नाही तर चक्क बुडवले. ते १३२ उद्योगपती आहेत. तीन लाख कोटी रुपये बुडाल्यामुळे बँका बुडीत निघाल्या. याच बँकांनी सरकारला कल्पना देऊन उद्योगपतींना कर्जाचे वाटप खिरापतीसारखे केले. ऐपत, दानत, परतफेडीची कुवत हे काही न तपासता नावे बघून कर्ज दिलेली. अर्थात बँकेच्या उच्च अधिका-यांनी सुखासुखी कर्ज दिलेली नाहीत. तर त्यांची ‘मिलीभगत’ त्यात आहेच.

खरं म्हणजे ‘रिझर्व्ह बँके’लाच जबाबदार धरले पाहिजे. ‘रिझर्व्ह बँके’चे रघुराम राजन यांचे खूप मोठे कौतुक केले जाते आणि त्यांच्या कौतुकावर अग्रलेख लिहिले जातात. आता ते रघुराम राजन आणि ती ‘रिझर्व्ह बँक’ तीन लाख कोटी रुपये कर्ज बुडत असताना काय करत होते? कर्ज बुडवणारे बदमाश आहेतच. पण ज्या बँकेच्या अधिका-यांनी संगनमत करून हे कर्ज दिलं त्या पाच-पन्नास अधिका-यांना खडी फोडायला पाठवाल का? ज्या रघुराम राजन यांनी हा सगळा व्यवहार होईपर्यंत डोळ्यांवर कातडी ओढून घेतली ते बँकेचे गव्हर्नर किंवा त्यांच्या पूर्वीचे गव्हर्नर हे सगळे याला जबाबदार आहेत. हा व्यवहार एकतर्फी नाही, दुतर्फी नव्हे तर चारतर्फी झाला आहे. बदमाश उद्योगपती + बँकेचे उच्च अधिकारी + रिझर्व्ह बँक + त्यांचे गव्हर्नर या सगळ्यांना या संदर्भात ‘ईडी’वाल्यांनी खेचलं पाहिजे. पण यातलं काही होणार नाही. कारण मल्ल्या काही सुखा-सुखी पळाला नाही. हा ठरवून प्रयोग केला गेला. मल्ल्याला पळवण्यात भाजपाचे केंद्रातील सरकार, केंद्रीय अर्थमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय तेवढेच जबाबदार आहे. तीन लाख कोटी रुपये कर्ज बुडवल्याचा आकडा आला तेव्हा अर्थमंत्री जेटली यांच्या हातात यादी होती. या सगळ्यांचे पासपोर्ट ताबडतोब गोठवणे गरजेचे होते. त्यांच्या बँकांची खाती गोठवणे गरजेचे होते. आता तोंड वर करून लोकसभेत मिजाशीत बोलणा-या जेटलींना हे निर्णय का घेता आले नाहीत? त्यामुळे ज्या चार जणांना जबाबदार धरायचे त्यात पाचवा माणूस हा जेटली आहे. मल्ल्या कसा पळू शकतो? जेटली तोंड वर करून सांगताय की, ‘मल्ल्याला कर्ज काँग्रेसच्या काळात दिलं.’ दिलं असेल. नाही कोण म्हणतं? पण तुमच्या काळात तो पळाला. आक्षेप कर्ज देण्यापेक्षा परदेशात तो पळून जाण्यावर आहे. वकील असलेल्या जेटलींना एवढी साधी गोष्ट कळत नाही. यांच्या बुद्धीची कीव वाटते.

कोण आहे मल्ल्या? मल्ल्या हा एक जातिवंत बदमाश आहे. बंगळूरुमधला मद्यनिर्माता आहे. आयपीएल सामन्यात त्याने एक संघ खरेदी केला आणि सामना चालू असताना त्याचे थेट चित्रीकरण होत असताना हा मल्ल्या चार मवाली जसे दारू पितात तसा सगळ्यांसमक्ष दारू पितानाचे चित्रण देशाने पाहिले. बंगळूरु विधानसभेत एकही आमदार मल्ल्याच्या मागे नसताना मल्ल्या राज्यसभेत निवडून गेला. त्याने काही चिंचुके वाटले नाहीत. त्याने वाटलेली रक्कम सगळ्यांना माहीत आहे. भ्रष्टाचाराविरोधात बोलणारे जे जे आहेत त्यांनी मल्ल्यासारख्या प्रवृत्तीला पोसलं. या मल्ल्याने ‘किंगफिशर’ विमान कंपनी काढली. या विमान कंपनीने जेट इंजीन असलेले काही छोटी विमाने घेतली. अशी चार विमाने मल्ल्याकडे होती. आसन संख्या १०. ही विमाने मल्ल्याने देशातल्या मोठय़ा मोठय़ा नेत्यांना कुटुंब सहलीसाठी फुकट देऊन टाकली. सत्तेत बसलेल्या सगळ्यांना मिंधे करण्याची ही युक्ती मल्ल्याजवळ होती. त्यामुळे मल्ल्याच्या बारा भानगडींना सगळ्यांनी पाठीशी घातले. कुणा एकावर आरोप करता येणार नाही. या देशातील कोणत्याही राजकीय पक्षाचा एकही नेता असा नाही. जो मल्ल्याच्या ताटात जेवला नाही आणि मल्ल्याच्या विमानातून फिरला नाही. मल्ल्याची उठबस अशीच मोठी. त्यात बँकेच्या अधिका-यांना त्यांनी जाळ्यात ओढले आणि या अधिका-यांच्या कुटुंब सहली फुकटात घडल्या. मग ते अधिकारी मल्ल्याला आपली बँक मोकळी करून का देणार नाहीत? ‘किंगफिशर’ कंपनी असताना मल्ल्याने ‘एअर इंडिया’शी सूत जमवलं. मल्ल्या मोठा चलाख. विमान उतरले की विमानाला लावण्यासाठी जी शिडी लागते त्या शिडय़ा किंगफिशरजवळ कधीच नव्हत्या. आता अ‍ॅरोब्रीज आलेले आहेत. ते मल्ल्याच्या किंगफिशर काळात नव्हते. मल्ल्याने एअर इंडियाशी सूत जमवून मुंबई टर्मिनलला ‘ए’वर आणि दिल्लीला टर्मिनल ‘ए’वर आपली विमाने उतरायला परवानगी मिळवली आणि त्याला ज्या शिडय़ा लागल्या त्या शिडय़ा लावणारे कर्मचारी एअर इंडियाचे. शिडय़ा एअर इंडियाच्या आणि त्याचे लाखो रुपयांचे भाडे मल्ल्याने बुडवले. नंतर या मल्ल्याने एक स्कीम टाकली. जो प्रवासी किंगफिशरने सकाळी दिल्लीला जाईल आणि किंगफिशरच्या विमानाने संध्याकाळी परत येईल त्या प्रवाशाला परत येताना एक हजार रुपये रोख परत दिले जातील. दिल्लीचं काम आटपून संध्याकाळी परतताना लोक हजार रुपये घेऊन मल्ल्याचे कौतुक करत बसले आणि तीन महिन्यांनंतर मल्ल्याने मुंबई-दिल्ली प्रवासदरात हळूच तीन हजार रुपयांनी वाढ केली आणि हजार रुपये परत देण्याची योजना बंद करून टाकली. असा हा सर्व बाजूंनी बदमाशी करण्यात पटाईत असलेला मल्ल्या सात हजार कोटी रुपये बँकांचे देणे आहे आणि ते डुबल्यात जमा आहेत. किंगफिशर कंपनीची हँगरला उभी असलेली विमाने धूळ खात पडली होती. ती मल्ल्याने कधी कुणाला विकून टाकली याचा पत्ताही नाही.

असा हा मल्ल्या परदेशात पळून गेलाय. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की, त्याला दोन आठवडय़ांत भारतात आणा. सर्वोच्च न्यायालय काही म्हणो. मल्ल्या आता काही सापडत नाही. मल्ल्या एकच नाही, असे अनेक मल्ल्या आहेत. ज्यांनी करोडो रुपयांनी बँकेला, देशाला बुडवले आहे आणि ते मिजाशीत वावरत आहेत.

केवढा हा विरोधाभास आहे बघा! या महाराष्ट्रात ७ हजार रुपयांपासून ४० हजार रुपयांपर्यंत कर्ज फेडता आलं नाही म्हणून ३ हजार ३३९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. ३० मार्च २०१५ ते १ मार्च २०१६ पर्यंत म्हणजे एका कॅलेंडर वर्षात १८०० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. का केल्या? तर आपण कर्ज फेडू शकत नाही म्हणून. परवा यवतमाळ जिल्ह्यातील ज्या शेतक-यांच्या आत्महत्येची बातमी आली त्याने ७ हजार रुपये फेडू शकलो नाही म्हणून आत्महत्या केली. ही पापभिरू माणसं आहेत. बदनामीला घाबरतात. कुणाचे पैसे थकवले, उसने घेतले तर ती रक्कम परत करेपर्यंत अशा सरळ जगणा-या मंडळींना टोचणी असते. पाच-पन्नास हजार रुपयांसाठी आत्महत्या करणारा या देशातला कष्टकरी शेतकरी आणि हजारो कोटी रुपये बुडवणारा मल्ल्या, एवढा मोठा विरोधाभास या देशात आहे. ३ लाख कोटी रुपये कर्ज बुडवणा-या १३२ उद्योगपतींपैकी एकानेही आत्महत्या केलेली नाही. कारण हे अट्टल गुन्हेगार आहेत. राष्ट्रीयीकृत बँका बुडवायच्या हे ठरवून त्यांनी खोटय़ा कंपन्या काढलेल्या आहेत. असे निगरगट्ट जगणारे हे कर्जबुडवे, देशाचे खरे शत्रू आहेत. प्रामाणिकपणे कष्ट करून जगणारा शेतकरी, अन्न-धान्याच्या बाबतीत देशाला स्वाभिमानी करणारा शेतकरी, ५-१० हजार रुपये कर्ज फेडू शकलो नाही म्हणून त्याला जगावेसे वाटत नाही. त्याच्या श्रमाचे मोल नाही. त्याच्या पिकाला भाव नाही. दुष्काळ, अनेक महापूर, याचा सामना करून तो कष्ट करत आहे. सचिन तेंडुलकरने २२ यार्डात धावून शतक केले तर आम्ही टाळ्या पिटतो. का? तर सचिनचे शतक झाले. या देशातल्या कष्टकरी शेतक-याने हातात नांगर घेऊन शेताच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत हजारो यार्डात किती शतके काढली? त्याची गणती नाही. पण त्याच्यासाठी आम्ही एकही टाळी मारत नाही. तो कष्टकरी शेतकरी हा देशाचा भाग्यविधाता आहे. ‘कर्ज फेडू शकलो नाही’ याची त्याला लाज आहे म्हणून तो गळफास लावून घेऊ शकतो आणि मल्ल्या आणि त्याच्या जातीचे हे सारे कर्जबुडवे उद्योगपती यांना कसलीच लाज नाही. ‘प्रामाणिक विरुद्ध बेशरम’ असा या देशातील खरा संघर्ष आहे. त्या संघर्षात सरकार प्रामाणिक लोकांच्या बाजूने उभे राहत नाही आणि बदमाशांची बाजू सरकार घेते. म्हणून मल्ल्या पळू शकतो. या सरकारला काही लाज असेल तर मुसक्या बांधून मल्ल्याला १५ दिवसात हजर करा. जेटली महाराज, मल्ल्याला कर्ज कुणी दिले? हा शब्दच्छल करत बसू नका. तुम्ही आता सत्तेवर आहात कर्ज वसूल करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमचं सरकार असताना मल्ल्या पळून गेला आहे. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. नाही तर ‘बेशरम लोकांची बाजू घेणारे सरकार’ असा तुमच्यावरचा ठपका कायम राहील.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version