Home क्रीडा भारताने वेळीच सावरण्याची गरज

भारताने वेळीच सावरण्याची गरज

0

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत कोचीत सपाटून मार खाल्यानंतर यजमान भारताने वेळीच सावरण्याची आवश्यकता आहे. 

मुंबई – वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत कोचीत सपाटून मार खाल्यानंतर यजमान भारताने वेळीच सावरण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजांची कामगिरी सुमार ठरली तरी उर्वरित मालिकेत फलंदाजांची कामगिरी निर्णायक राहील. त्यामुळे फलंदाजी सुधारली तरच भारताला प्रतिस्पर्ध्याना रोखता येईल.

जवाहरलाल नेहरू स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती. त्यामुळे यजमानांकडून जशास तशी फलंदाजी अपेक्षित होती. मात्र भारताच्या प्रमुख फलंदाजांनी खेळपट्टीवर थांबण्याचे धाडस दाखवले नाही. चुकीचे फटके मारून विकेट फेकल्या. ३२२ धावांचे आव्हान गाठताना वर्ल्डकप विजेता संघांचा डाव केवळ १९७ धावांत आटोपतो. परिणामी १२४ धावांनी पराभूत व्हावे लागते.

हरल्याचे दु:ख नाही. मात्र फलंदाजांनी जिंकण्यासाठी प्रयत्न केलेच नाहीत, याचे वाईट वाटते. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनने धडाकेबाज सुरुवात करून दिली नसली तरी आश्वासक सलामी दिली. त्यातच धवनला सूर गवसला होता. जवळपास १५ षटके आणि अडीच तास किल्ला लढवल्यानंतर त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित होती.

धवन टिकून राहिला. त्याची खेळी यजमानांतर्फे सर्वाधिक ठरली तरी एका क्षणी धवनचाही संयम सुटला. रहाणे, धवननंतर भारताची भिस्त डावखुरा सुरेश रैनावर होती. मात्र तो वरचढ ठरणार नाही, याची पुरेशी काळजी पाहुण्यांनी घेतली. तो आल्यापावली परतल्यानंतर भारताचा मोठा पराभव निश्चित झाला. स्वैर मा-यानंतर कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने गोलंदाजांची बाजू घेतली तरी ३० धावांच्या ‘बोनस’चे काय? १७ वाइड आणि १ नोबॉल म्हणजे भारताने ५० नव्हे तर ५३ षटके टाकली.

लांबलेल्या ‘स्पेल’मुळे मोहित शर्मा, मोहम्मद शामी या मध्यमगती दुकलीसह लेगस्पिनर अमित मिश्रा महागडे ठरले. एकटय़ा भुवनेश्वरला अचूक आणि टप्प्यावर गोलंदाजी करता आली. अन्य गोलंदाजांनी भुवनेश्वरचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.

उर्वरित दोन लढतीत याच क्रिकेटपटूंसह ढोणीला खेळायचे असल्यामुळे ढोणीने घेतलेली सहका-यांची बाजू समजू शकतो. मात्र ‘वनडाउन’ विराट कोहलीला लवकर फॉर्म गवसणे, आवश्यक आहे. तसेच मधल्या फळीत रैनासह ढोणी, जडेजाने अधिकाधिक योगदान देण्याची गरज आहे. गोलंदाजीत ऑफस्पिनर आर. अश्विनची अनुपस्थिती जाणवली. मात्र मोठय़ा प्रमाणात अवांतर धावा जाणार नाहीत, याची काळजी सर्वच गोलंदाजांना घ्यावी लागेल. उर्वरित दोनपैकी एक लढत पाहुण्यांनी जिंकली तर भारताला मालिकेत ‘कमबॅक’ करणे, कठीण होऊन बसेल.

कुठल्याही दौ-यातील सलामीची लढत प्रत्येक परदेशी संघासाठी महत्त्वपूर्ण असते. सुरुवात चांगली तर सर्व काही चांगले, असे म्हणतात. अपेक्षेप्रमाणे विजयी प्रारंभ करता आल्याने ड्वेन ब्राव्हो आणि सहकारी आनंदी आहेत. मात्र अष्टपैलू मार्लन सॅम्युअल्सची उंचावलेली कामगिरी त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली.

सॅम्युअल्सला फलंदाजीत दिनेश रामदीन आणि ड्वायेन स्मिथची चांगली साथ लाभली. गोलंदाजीत त्याच्यासह रवी रामपॉल आणि ड्वेन ब्राव्होने अचूक मारा केला. विजयी सलामी दिली तरी हुरळून जाणे, पाहुण्यांना महागात पडेल.

सातत्य राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. पहिल्या वनडेत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी नियंत्रित मारा केला तरी सॅम्युअल्सच्या फटकेबाजीमुळे पूर्वार्धातच त्यांचा विजय नक्की झाला होता. भारतातील फलंदाजीला अनुकूल खेळपट्टय़ा पाहता उर्वरित मालिकेत फलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरेल, असे वाटते.


वेस्ट इंडिज बोर्डाने मानले क्रिकेटपटूंचे आभार
सेंट जोन्स (अँटिगा) : मानधनावरील वाद बाजूला ठेवत व्यावसायिकपणा दाखवताना पहिली वनडे खेळल्याबद्दल वेस्ट इंडिज बोर्डाने (डब्लूआयसीबी) क्रिकेटपटूंचे आभार मानलेत. करारातील मानधनात कपात केल्यावरून पहिल्या वनडेवर अनिश्चिततेचे सावट होते. मात्र वाद बाजूला ठेवत आमच्या क्रिकेटपटूंनी व्यावसायिकपणा दाखवला. सर्व क्रिकेटपटूंनी दाखवलेल्या व्यावसायिकपणामुळे बोर्ड आणि चाहते खूष झालेत. उर्वरित दौ-यात अशीच कृती अपेक्षित आहे, असे वेस्ट इंडिज बोर्डाच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.


‘लॉइड, रिचर्ड्स यांचा सल्ला उपयोगी पडला’

महान क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉइड आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा सल्ला उपयोगी पडला. त्याच्या ‘टिप्स’मुळे आत्मविश्वास उंचावला. त्यातूनच पहिल्या वनडेत शतकी खेळी उभारता आली, असे वेस्ट इंडिजचा अष्टपैलू मार्लन सॅम्युअल्सने सांगितले.

‘‘पहिल्या वनडेच्या पूर्वसंध्येला लॉइड आणि रिचर्ड्स सरांचे मी मार्गदर्शन घेतले. भारतातील खेळपट्टय़ा आणि गोलंदाजांबाबत त्यांचा अनुभव जाणून घेतला. दोघांचीही यापूर्वी मला खूप मदत झालीय. मला कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये सूर गवसला. त्यात सातत्य राखण्यात मला यश आलेय. मात्र भारताचा दौरा मोठा आहे. त्यामुळे सातत्य राखताना कस लागेल,’’ असे सॅम्युअल्सने सांगितले.


मालिका सुरळीत होईल
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्ध सध्या सुरू असलेली मालिका सुरळीत पार पडेल, असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी स्पष्ट केले. ‘‘भारत वि. वेस्ट इंडिज यांच्यातील सध्या सुरू असलेली मालिका सुरळीत पार पडेल. माझे विंडिज क्रिकेट बोर्डाच्या पदाधिका-यांशीही बोलणे झाले आहे. विंडिज क्रिकेट बोर्डाचे चेअरमन डेव कॅमेरुन यांनीदेखील बीसीसीआयचे सहकार्य दिल्याबद्दल आभार मानले आहेत. ते पाहता पाच वनडे, एक टी-२० आणि तीन कसोटींची मालिका नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल,’’ असे पटेल यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version