Home क्रीडा भारताला विजयाचा ‘चौकार’ शक्य

भारताला विजयाचा ‘चौकार’ शक्य

0

सलग तीन विजयांसह माजी विजेता भारताने आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी निश्चित केली आहे. 

मिरपूर – सलग तीन विजयांसह माजी विजेता भारताने आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी निश्चित केली आहे. गटवार साखळीतील (ग्रुप २) शेवटच्या लढतीत रविवारी (३० मार्च) फॉर्मात नसलेल्या ऑस्ट्रेलियाला हरवून ढोणी आणि सहका-यांना विजयाचा ‘चौकार’ लगावण्याची सुवर्णसंधी आहे.

पाचव्या वर्ल्डकपमध्ये साखळीतील पहिल्या तीन लढती जिंकणारा तसेच उपांत्य फेरी निश्चित करणारा भारत एकमेव संघ आहे. माजी विजेता पाकिस्तानसह गतविजेता वेस्ट इंडिज आणि यजमान बांगलादेशला हरवल्याने भारताच्या क्रिकेटपटूंचे मनोधैर्य उंचावले आहे.

भारताने सातत्य राखले तरी प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सुरुवातीच्या दोन्ही लढतींमध्ये (वि. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज) सपाटून मार खावा लागल्याने जॉर्ज बेली आणि कंपनीचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. भारताची उपांत्य फेरी निश्चित झाली आहे. ‘ग्रुप बी’मधून दुस-या स्थानासाठी वेस्ट इंडिज (३ लढतींमधून ४ गुण) प्रबळ दावेदार आहे.

त्यानंतर पाकिस्तानला (२ लढतींमधून २ गुण) संधी आहे. पहिल्या दोन पराभवानंतर अंतिम चार संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदारी पेश करायची असल्यास ऑस्ट्रेलियाला भारताला मोठय़ा फरकाने हरवावे लागेल. शिवाय शेवटची लढतही मोठय़ा फरकाने जिंकावी लागेल.

मजबूत फलंदाजी हे भारताचे बलस्थान आहे. मात्र पहिल्या तिन्ही लढतीत फिरकी गोलंदाज ‘मॅचविनर’ ठरलेत. लेगस्पिनर अमित मिश्रा (३ लढतीत ७ विकेट) खूपच फॉर्मात आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (३ विकेट) आणि डावखुरा रवींद्र जडेजाची (४ विकेट) त्याला उत्तम साथ लाभली आहे. मोहम्मद शामी आणि भुवनेश्वर कुमारनेही बऱ्यापैकी मारा करताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना वरचढ होऊ दिलेले नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धही कर्णधार ढोणी आपल्या फिरकीपटूंचा वापर प्राधान्याने करेल. गोलंदाजांनी विजय सुकर केल्याने फलंदाजांना फार काम उरले नाही. मात्र ‘वनडाउन’ विराट कोहलीसह सलामीवीर रोहित शर्मा (प्रत्येकी दोन अर्धशतके) आणि सुरेश रैनाने चांगली फलंदाजी केलीय. सलामीवीर शिखर धवन आणि युवराज सिंगचा फॉर्म चिंतेची बाब आहेच. उपांत्य फेरी निश्चित झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला राखीव क्रिकेटपटूंना खेळवण्याची संधी आहे.

फलंदाजांचे अपयश ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे प्रमुख कारण बनले आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसह अष्टपैलू शेन वॉटसन सातत्याने अपयशी ठरलेत. अन्य अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने सातत्य राखले तरी ब्रॅड हॉजवगळता त्याला कुणाची साथ मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनाही कामगिरी उंचावता आलेली नाही.

डग बोलिंजर, मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू जेम्स फॉकनरला धावा रोखण्यात अपयश आले आहे. बांगलादेशातील ‘टर्निग’ खेळपट्टीवर हुकूमत गाजवेल, असा चांगला स्पिनरही ऑस्ट्रेलियाकडे नाही. परिणामी गोलंदाजीही कमकुवत झाली आहे.
वेळ : रा. ७ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३ वर.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version