Home मनोरंजन मराठी सिनेमात तीन रंग

मराठी सिनेमात तीन रंग

1

‘लक्ष्मी.. तुझ्याविना’

मराठी चित्रपट सृष्टीनं गुढीपाडव्याच्या आधीच्या शुक्रवारी तीन चित्रपट प्रदर्शित करून एक हॅटट्रिक केली आहे. हे तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या रंगांचे, ढंगांचे आहेत. त्यामुळे आता मराठी प्रेक्षकांनाही तीन वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. मराठीत ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांच्या एकाच वेळी पसंतीस येतील असे चित्रपट अपवादाने निर्माण होतात, हेच लक्षात घेऊन सर्वाचे मनोरंजन होईल या दृष्टीनं निर्माते सतीश आणि विशाल तेलंग यांनी ‘लक्ष्मी.. तुझ्याविना’ या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या पण रहस्य, नाटय आणि रोमांचक थरार यांनी भरलेला असा विविधांगी चित्रपट प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट एकाच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटाची कथा एका छोटया गावात घडते. त्यातही दोन काळ दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटातली प्रेमकथा एकाच वेळी दोन वेगवेगळ्या काळात घडते. म्हणजेच १९७०-८० च्या दशकात घडलेली एक प्रेमकथा ही २०१३ सालात उलगडते. सिनेमाचा नायक क्रिश आणि त्याच्या आयुष्यात घडणा-या काही रहस्यमय गोष्टी. त्या गोष्टींचा त्याचा असलेला संबंध व त्यातून निर्माण झालेली नाटयमयता हे या चित्रपटाचं एक वैशिष्टयच म्हणावं लागेल. या चित्रपटात केवळ रहस्य व गंभीर प्रसंगच नव्हेत, तर त्याच्या जोडीला हलक्याफुलक्या प्रसंगांची चांगली रचना या चित्रपटातून पाहायला मिळते. त्याच्या जोडीला असलेल्या गाण्यांमुळे हा एक परिपूर्ण व्यावसायिक व कौटुंबिक चित्रपट झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून लहान शहरातल्या महिलांच्या सबलीकरणाचा संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

दीपक कदम दिग्दर्शित  या चित्रपटाचा नायक संजय शेजवळ असून त्याला यापूर्वी ‘प्रिया बावरी’ या नाटकासाठी राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टीव्ही मालिका विश्वातली आघाडीची अभिनेत्री सई रानडे तसंच मराठी व तामिळ चित्रपटातली प्रियांका ज्ञानलक्ष्मी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या नव्या ता-यांमुळे या चित्रपटाला एक फ्रेश लूक मिळाल्याचे दिसून येत आहे.

त्रिलोक चौधरी यांचे छायांकन तर संगीत जगदीश पाटील यांनी दिले आहे. गीते सतीश तेलंग यांची असून नृत्यदिग्दर्शन महेश चव्हाण यांचे आहे.


‘अरे सोडा बाटली बाई’

समाजात घडणा-या विविध गोष्टींचा परिणाम हा चित्रपटांच्या कथानकांवर होत असतो. अशाच प्रकारे समाजात वाढत चाललेल्या व्यसनाधिनतेवर भाष्य करणारा ‘अरे सोडा बाटली बाई’ हा चित्रपट या आठवडयात प्रदर्शित झाला आहे.

कॅड मीडियाची प्रस्तुती असलेल्या ‘अरे सोडा बाटली बाई’ ची निर्मिती किसन लोखंडे, ऑल्वीन परेरा, धवल शाह या निर्मात्यांनी केली आहे. रंगभूमीवरील परिचित नाव असलेल्या कय्युम काझी यांनी ‘अरे सोडा बाटली बाई’चं दिग्दर्शन केलं असून कथा-पटकथा-संवाद-गीतेही त्यांनीच लिहिली आहेत. सिनेमाची कथा सर्वसामान्य तरुणाभवती गुंफण्यात आली आहे. चित्रपटाचा नायक दिगंबर शेती व्यवसाय करणारा तरुण आहे. प्रचंड जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर शेतात सोन्यासारखं पीक घेण्याचा विचार करणा-या दिगंबरची कथा यात आहे. त्याचं दीपालीवर प्रेम आहे. ही प्रेमकथा मांडत असतानाच या चित्रपटातून शेतीचं होणारं व्यापारीकरण, गावातील राजकारण, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे गरसमज, व्यसनांधता, अशा विविध अंगांना स्पर्श करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक कय्युम काझी यांनी केला आहे.

अभिनेता संजय मोहिते हा दिगंबरच्या मुख्य भूमिकेत असून दीपालीची भूमिका वेदश्री दळीने केली आहे. सध्याचा आघाडीचा विनोदी कलावंत भाऊ कदम या सिनेमामध्ये एका महत्त्वपूर्ण व विनोदी भूमिकेत दिसलाआहे. याबरोबरच या चित्रपटात विजय चव्हाण, सुहास पळशीकर, किशोर नांदलस्कर, भूषण घाडी, किशोर चौगुले, आदी कलाकारांच्या विविध भूमिका आहेत.


‘तप्तपदी’

खास सुटीकालीन प्रेक्षकांचा विचार करून तयार करण्यात आलेला ‘तप्तपदी’ हा बिग बजेट मराठी चित्रपटही या आठवडयात प्रदर्शित होत आहे. आर्यमान पब्लिसिटी्र प्रस्तुत व व्हाइटपेपर कम्युनिकेशन्स निर्मित हा चित्रपट भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करणारा असल्याचा निर्माता व दिग्दर्शकांचा दावा आहे.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवरून प्रेरित असलेली १९३०-४० च्या दशकातील कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. असं असलं तरी या चित्रपटाची पटकथा आजच्या काळानुरूप लिहिलेली आहे. त्यात भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचे आकलन करण्याचा प्रयत्नही केलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन बळीराम नागरगोजे यांनी केलं आहे. गीतं वैभव जोशी यांची तर संगीत सुमीत बेल्लारी आणि रोहित नागभिडे यांनी दिलं आहे. ही गीतं सावनी शेंडे यांनी गायली आहेत.

‘तप्तपदी’ हा मराठी सिनेमा मुहूर्तापासूनच चच्रेचा विषय झाला होता. त्याच्या ट्रेलर, प्रोमो व गाण्यांच्या माध्यमातून या सिनेमाची चांगलीच हवा करण्यात आली होती. युटय़ूब तसेच फेसबुक यांसारख्या सोशल साइट्सवरही या चित्रपटाला अनेकांनी पसंती दिली होती. महाराष्ट्रातील परंपरा आणि सामाजिक रितीरिवाजांचा सखोल अभ्यास करून दिग्दर्शक सचिन बळीराम नागरगोजे यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ‘दृष्टिदान’ ही मूळ कथा मराठी प्रेक्षकांसमोर मांडली आहे. त्यांनी व हेमंत भाईलाल भावसार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मधुगंधा कुलकर्णी यांनी नागरगोजे यांना संवादलेखनात साथ दिली आहे.

‘तप्तपदी’चा बाज प्रेमकथेचा असून यात कश्यप परूळेकर, वीणा जामकर आणि श्रुती मराठे मुख्य भूमिकेत आहेत. याखेरीज नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, अंबरिश देशपांडे, राहुल वैद्य यांसारख्या मराठीतील गाजलेल्या कलाकारांच्याही दमदार भूमिका या सिनेमात आहेत. सिनेमाची कथा जरी १९३०-४० च्या दशकात घडत असली तरी ती आजच्या प्रेक्षकांना आपलीशी वाटेल याची काळजी दिग्दर्शक सचिन बळीराम नागरगोजे यांनी घेतली आहे. या चित्रपटासाठी देवदास भंडारे यांनी कलादिग्दर्शन केले असून त्यांनी या चित्रपटाला आवश्यक असलेला काळ अगदी योग्य पद्धतीने उभा केला आहे. या चित्रपटाचं छायांकन संतोष स्वरणकर यांनी केले असून एका वेगळ्याच प्रकारचा प्रकाश या चित्रपटात त्यांनी वापरला आहे. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीला मिळालेली एक मेजवानीच ठरली आहे.

या चित्रपटाच्या संगीतातही अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यात आले असून गीतकार वैभव जोशी यांनी पहिल्यांदाच रुबाई हा काव्यप्रकार चित्रपट संगीतात आणला आहे. रहिम शेख आणि धनश्री तिवरेकर यांनी या चित्रपटासाठी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे, तर रंगभूषेची जबाबदारी अमित म्हात्रे यांनी सांभाळली आहे. रवींद्रनाथांची मूळ कथा व त्याचे केलेले सुरेख मराठीकरण यामुळे हा चित्रपट एक चांगला अनुभव देणारा असा झाला आहे.

1 COMMENT

  1. Hi….all the best to Sachin Nagargoje for there effort.
    I would like to see such kind of periodic films in future. Last but not least I will say I would like to be part of their upcoming films.

    Regards
    Ram

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version