Home संपादकीय तात्पर्य भारतीय स्वातंत्र्याची ७१ वर्षे

भारतीय स्वातंत्र्याची ७१ वर्षे

0

भारतीय स्वातंत्र्याला ७१ वर्षे झाली आहेत. त्या कालावधीचे तीन टप्पे हे भारतीय व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला टप्पा २५ वर्षाचा, दुसरा २५ वर्षाचा आणि आता अमृतमहोत्सवाच्या दिशेने वाटचाल असलेला तिसरा टप्पा २५ वर्षाचा सुरू झाला आहे. काळातील स्थित्यंतरे आज समजून घेणे आवश्यक आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे पूर्ण झालेली आहेत. हा फार मोठा कालावधी आहे असे नाही, परंतु फार कमी आहे असेही नाही. या ७१ वर्षात अनेक स्थित्यंतरे झाली. देशाच्या विकास उन्नतीत अनेक संकटे आली, मात्र त्या सर्व संकट व समस्यांवर मात करीत देश पुढे-पुढे जात आहे. विशेष म्हणजे भारतात लोकशाही आजही टिकून आहे, हे मोठे साध्य आहे.

या ७१ वर्षाच्या कालावधीचे २५-२५-२५ वर्षाचे तीन टप्पे केले व प्रत्येक टप्प्यातील देशाच्या सर्वागीण विकासासाठीचा विचार केल्यास देशाची स्थिती डोळ्यांसमोर येईल. पहिली २५ वर्षे तर देश व देशवासीय सावरण्यात गेली. या काळात देशाने स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. हरित क्रांतीसाठी नियोजन, सामाजिक स्थिती संतुलित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, औद्योगिक पायाभरणी करण्यात आली, लोकांना स्वातंत्र्य समजायला थोडा अवधी लागला, भारत स्वातंत्र्यानंतर थोडा फार विसावत नाही तोच देशावर मोठ-मोठी संकटं आली. शेजारील राष्ट्रांना भारताची शांतता व सुव्यवस्थित बसत असलेली घडी त्यांच्या डोळ्यांत खुपू लागली. १९६२ साली चीन, १९६५ पाकिस्तान व पुन्हा १९७१-१९७२ पाकिस्तानबरोबर युद्ध करावे लागले (बांगला देशसाठी). यामुळे भारताला पुन्हा दहा वर्षे मागे जावे लागले. सुदैवाने या तिन्ही युद्धांत भारताची शान टिकून राहिली.

या युद्धानंतर भारताने परराष्ट्रीय संबंध अधिक बळकट करण्यावर जोर दिला. आराम हराम हैचा नारा देणारे पाहिले पंतप्रधान व जय जवान जय किसानचा नारा देणारे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा बराच काळ या २५ वर्षात गेला. त्यांनी देशाच्या सर्वागीण विकासासाठी सर्वकष प्रयत्न केले.

दुसरी २५ वर्षे मात्र देशासाठी बरीच फलदायी ठरली. अनेक देशहिताचे निर्णय घेण्यात आले. या कालावधीत बँकांचे राष्ट्रीयीकरण तसेच तनखे बंदी, अणुस्फोट, संगणक क्रांती, औद्योगिक क्रांती या काळात झाली. देशातील गरिबी दूर करण्यासाठीही मोठय़ा प्रमाणात प्रयत्न झाले, शैक्षणिक क्षेत्रातही अनेक बदल झाले. या काळात देशाच्या परराष्ट्र संबंधात मोठय़ा सुधारणा झाल्या, राजकीय बदलही याच दुस-या २५ वर्षाच्या कालावधीत झाले. देश प्रगती, विकासामध्ये अग्रेसर असतानाच देशांतर्गत स्थिती खूपच विस्फोटक बनत होती. याच काळात सुवर्ण मंदिरात घुसलेल्या अतिरेक्यांविरुद्ध कार्यवाही झाली. नक्षलवादी, अतिरेकी, याच काळात उदयास आले, सीमावाद उद्भवले, शेजारील राष्ट्राला हे सर्व सहन कसे होणार? म्हणून त्यांच्या कुरापती चालूच होत्या. अशात पुन्हा युद्ध करावेच लागले, यातही भारतीय जवानांनी आपल्या देशाच्या संरक्षणात मोठी कामगिरी करून विजय मिळविला. याच काळात अनेक दहशतवादी कारवाया झाल्या. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, या सर्व बाबी म्हणजे देशाच्या विकासात अडथळे होते. पण यावर मात करीत देशाने अनेक क्षेत्रात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली.

पुढील २५ वर्षाचा कालावधी सध्या चालू आहे. याचा पाया मागच्या २५ वर्षाच्या काळातच रचला गेला आहे. हे वर्ष साधारणपणे २००१ पासून गृहीत धरल्यास त्या वर्षापासून देशाने अंतराळात झेप घेण्यापासून ते जमीन, समुद्र अशा विविध क्षेत्रांत अत्युच्य कामगिरी करून देशाला इतर देशांच्या तुलनेत खूपच उच्च शिखरावर नेण्यात यश प्राप्त झालेले आहे. अलीकडच्या काळात तर देशाने सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती गाठलेली आहे. अनेक धाडशी निर्णय सरकारने घेऊन देशाला जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत खूप पुढे नेलेले आहे. मात्र याही काळात विघातक कृती मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. दहशतवाद पराकोटीला पोहोचलेला आहे. जम्मू-काश्मीर धुमसत आहे, सीमेवर अनेक कठीण प्रसंग उद्भवले आहेत. देशात महिला व मुलींवर अन्याय, अत्याचार वाढलेले आहेत. कायद्याचा धाक कमी झाला की काय असे वाटत आहे.

अलीकडील नोटाबंदी, जीएसटी या बाबी व अनेक जनहिताच्या गोष्टी यांचा उल्लेख करणे गरजेचे आहे. परराष्ट्रीय संबंधही सुधारलेले आहेत. तरुणांचा हा देश म्हणवला जातो; परंतु अजून बरेच काही करण्याची गरज देशात आहे, येत्या काळात देशाची सामाजिक, शैक्षणिक, कृषीविषयक, औद्योगिकविषयक, महिलाविषयक, परिस्थिती निश्चित सुधारेल व भारत देश आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महाशक्ती म्हणून ओळख बनवेल, अशी अपेक्षा.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version